Daily Top 2Weekly Top 5

हरवलेली चार मुले सापडली; दृष्टी जीवरक्षकांकडून दोन जणांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2026 12:28 IST

वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमध्येही मदत केली.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: राज्याच्या विविध समुद्रकिनाऱ्यांवर आठवड्याच्या अखेरीस दृष्टी मरीन जीवरक्षकांनी तत्परता दाखवत दोन जणांना बुडण्यापासून वाचवले तर चार हरवलेल्या मुलांचा शोध लावत त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले. तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितींमध्येही मदत केली.

बागा समुद्रकिनाऱ्यावर महाराष्ट्रातील १२ वर्षीय मुलगा हरवल्याची माहिती मिळाल्यानंतर दृष्टी मरीनच्या जीवरक्षकांनी गोवा बीच पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. जीवरक्षक सौरभ कुमार, संदेश पर्येकर, रिद्रेश महाले आणि विनय सावळ यांच्या प्रयत्नांतून मुलाचा शोध घेण्यात आला आणि आवश्यक पडताळणीनंतर त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले.

मिरामार किनाऱ्यावर अर्धबेशुद्ध

अवस्थेत आढळलेल्या एका व्यक्तीस जीवरक्षकांनी मदत केली. संबंधित व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. जीवरक्षक धनराज टिक्कम आणि रमेश भोमकर यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेला संपर्क साधून त्या व्यक्तीस वैद्यकीय पथकाकडे सुपूर्द केले.

फोंड्यात माय-लेकाची भेट

होलंट किनाऱ्यावर राज्यातील १० वर्षीय मुलीच्या पायाला खडकांवर चालताना गंभीर दुखापत झाली. जीवरक्षकांनी तिला प्राथमिक उपचार देत पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेद्वारे पाठवले. कोलवा किनाऱ्यावर हैदराबादहून आलेला नऊ वर्षीय मुलगा हरवल्यानंतर स्थानिक जीवरक्षकांनी शोध घेऊन त्याला सुरक्षित शोधून नातेवाईकांच्या ताब्यात दिले. याच किनाऱ्यावर फोंड्यातील सहा वर्षीय मुलालाही आईपासून वेगळे झाल्यानंतर सुरक्षितपणे आईकडे सुपूर्द करण्यात आले.

लाटांमुळे वाहत गेला....

बाणावली किनाऱ्यावर बेळगावातील ११ वर्षीय मुलगी कुटुंबापासून हरवल्यानंतर तिचा शोध घेण्यात आला. तसेच पुण्यातील ३४ वर्षीय व्यक्ती समुद्रातील जोरदार लाटांमुळे वाहत गेला, त्यांना जीवरक्षक सुदर्शन यांनी रेस्क्यू बोर्डच्या साहाय्याने सुरक्षित किनाऱ्यावर आणून त्याचे प्राण वाचवले.
 

English
हिंदी सारांश
Web Title : Rescues and Reunions: Goa Lifeguards Save Lives, Find Lost Children

Web Summary : Goa's lifeguards rescued two from drowning and reunited four lost children with their families across various beaches. They also provided medical assistance and rescued a man from strong currents, ensuring beach safety.
टॅग्स :गोवापर्यटन