लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जय्यत तयारी सुरू केली आहे. महामार्गावरील अपघातांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सरकारने १.४३ कोटी रुपये खर्चुन चार हाय-एंड अॅम्ब्युलन्स खरेदी केल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली. या अत्याधुनिक रुग्णवाहिकांपैकी दोन उत्तर गोव्यात आणि दोन दक्षिण गोव्यात आपत्कालीन सेवांसाठी तैनात केल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
राज्य राज्यातील आपत्कालीन यंत्रणा सशक्त करण्यासाठी सोमवारी झालेल्या आपत्कालीन व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. बैठकीस राज्याचे मुख्य सचिव डॉ. व्ही. कांडावेलू, पोलिस महासंचालक अलोक कुमार, महसूल सचिव संदीप जॅकिस, दक्षिण व उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी, अग्निशामक दलाचे संचालक, कोस्टगार्ड अधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्र्यांनी मान्सूनपूर्व तयारीच्या अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी आपत्कालीन निधीचीही घोषणा केली आहे. यात ग्रामपंचायतींना ३५ हजार ते ४० हजार रुपये, 'ब' आणि 'क' वर्गातील नगरपालिकांना ६० हजार ते ७० हजार रुपये, तर पणजी महानगरपालिकेला १.१० लाख ते १.२० लाख रुपयांचा विशेष निधी मंजूर करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांनी पावसाळ्याच्या काळात होणारे अपघात टाळण्यासाठी राज्यात रस्ते खोदण्यावर पूर्णपणे बंदी लागू केली आहे. पावसाळ्यात पाण्याचा अंदाज येत नसल्याने नागरिकांनी खाणींच्या खड्यांमध्ये किंवा बंद पडलेल्या दगडांच्या खाणींमध्ये पोहण्यासाठी उतरू नये, असे आवाहन केले. अशा काही धोकादायक ठिकाणांभोवती प्रशासनाने आधीच कुंपण घातले असून, धोक्याचे फलकही लावले आहेत, असे स्पष्ट करण्यात आले.
सर्पदंशावरील लस उपलब्ध
आरोग्य यंत्रणेचा आढावा घेताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, सर्पदंशावरील अँटी-व्हेनम सिरम सध्या सर्व जिल्हा रुग्णालये आणि गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपलब्ध आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुविधेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरही हे सिरम उपलब्ध करून देण्याबाबत आरोग्य संचालकांकडून माहिती घेतली जाईल.
'एनडीआरएफ' दाखल
आगामी मान्सूनची परिस्थिती पाहता सरकारने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) दलाला राज्यात पाचारण केले आहे. हे दल राज्यात किमान चार महिने तरी तैनात राहील, याची खबरदारी घेण्यात आली असून, आपत्कालीन परिस्थितीत हे दल तत्काळ धाव घेईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. आपत्ती व्यवस्था बळकटी करणासाठी ३८ कोटी रुपये खर्च केल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वाचे निर्णय
आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी पोहोचण्याचा वेळ १८ मिनिटांवरून ९ मिनिटांवर आणण्यात आला आहे.
राष्ट्रीय महामार्गावर चार हाय-एंड रुग्णवाहिका आणि मिनी वॉटर टेंडर तैनात.
आपत्ती निवारणासाठी १७२ जवान, आपत्ती मित्रांना प्रशिक्षण.
आपत्ती व्यवस्थापन पथकात नवीन १० डायव्हर्स समावेश.
नागरिकांनी पावसाळ्यात पाण्याने भरलेले निकामी खड्डे, खाणी किंवा इतर असुरक्षित पाणवठ्यांवर जाऊ नये.
अशा धोकादायक ठिकाणी लोकांना सावध करण्यासाठी इशारा फलक लावले आहेत.
पावसाळ्याच्या पूर्वतयारीसाठी ग्रामपंचायतींना निधी.
Web Summary : Goa CM announces four new ambulances for accident victims ahead of monsoon. Local bodies receive emergency funds. Road digging banned. NDRF deployed. Anti-venom serum available. Disaster response time reduced.
Web Summary : गोवा के मुख्यमंत्री ने मानसून से पहले दुर्घटना पीड़ितों के लिए चार नई एम्बुलेंस की घोषणा की। स्थानीय निकायों को आपातकालीन निधि प्राप्त हुई। सड़क की खुदाई पर प्रतिबंध। एनडीआरएफ तैनात। एंटी-वेनम सीरम उपलब्ध। आपदा प्रतिक्रिया समय कम किया गया।