Join us  

आजच्या तरुणाईचे ई-प्रतिबिंब

By admin | Published: July 05, 2015 3:16 AM

इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली; नव्हे त्याच्या आहारी गेलेली आजची तरुण मुले हा एकूणच चिंतेचा विषय आहे आणि घराघरांत त्यावरून होणारे वाद आता सार्वत्रिक झाले आहेत.

'आॅनलाइन बिनलाइन' मराठी चित्रपट- राज चिंचणकर

इंटरनेटच्या जाळ्यात अडकलेली; नव्हे त्याच्या आहारी गेलेली आजची तरुण मुले हा एकूणच चिंतेचा विषय आहे आणि घराघरांत त्यावरून होणारे वाद आता सार्वत्रिक झाले आहेत. मुलांच्या या व्यसनाचा पालकांना प्रचंड ताप झालेला आहे. याच विषयाला स्पर्श करत ‘आॅनलाइन बिनलाइन’ हा चित्रपट वर्तमान समस्येवर प्रकाश टाकतो आणि हे करताना आज जग जवळ आले असले, तरी माणसे एकमेकांपासून दुरावत चालली असल्याची जाणीवही करून देतो.सिद्धार्थ ऊर्फ सिद हा शहरी तरुण आणि ईश्वर ऊर्फ आयडिया हा ग्रामीण तरुण एकाच कॉंलेजात शिकत असतात. सिद आणि आयडिया या दोघांचे जमत नाही व त्यांच्यात प्रत्येक गोष्टीबाबत स्पर्धा रंगते. सिद हा इंटरनेटच्या आहारी गेलेला आहे आणि त्याच्या पालकांसाठीही तो चिंतेचा विषय बनला आहे. कॉलेजमधली किमया सिदला आवडत असते; परंतु इंटरनेटचे व्यसन जडलेल्या सिदला भावना व्यक्त करण्यात अडचण येत राहते. तिच्याशी संपर्क वाढवण्यासाठीही तो इंटरनेट जवळ करतो आणि वेगवेगळ्या साइट्सवर उपलब्ध होणाऱ्या सल्ल्यांनुसार वागत राहतो. पुढे या सिदचे आणि त्याच्या व्यसनाचे काय होते याची हलक्याफुलक्या पद्धतीने मांडणी करत हा चित्रपट सामाजिक संदेश देण्याची भूमिकाही बजावतो.हेमंत एदलाबादकर यांनी आजच्या तरुणांचा वीकपॉइंट लक्षात घेऊन ही कथा बेतली आहे आणि केदार गायकवाड यांनी ती दिग्दर्शित केली आहे. आजच्या पिढीचा आणि आजच्या तरुणांना आपलासा वाटेल असा हा विषय त्यांनी मांडला आहे. पण हे करताना त्यांनी गांभीर्याचा आव न आणता साध्या आणि गमतीशीर पद्धतीने तो रंगवला आहे. त्यामुळे एकप्रकारचा ताजेपणा या चित्रपटाला आहे. सिद्धार्थ चांदेकर याचा यातला सिद आणि हेमंत ढोमे याचा आयडिया, ही जोडी चित्रपटात फुल फॉर्मात आहे. कॉलेज जीवनाच्या पार्श्वभूमीवर या दोघांनी यात धमाल केली आहे. विशेष उल्लेख करावा लागेल तो चित्रपटात किमया साकारणाऱ्या ऋतुजा शिंदे हिचा ! तिने रंगवलेली किमया आश्वासक आहे आणि तिच्या रूपाने एक फ्रेश चेहरा मराठी चित्रपटाला मिळाला असल्याचे तिने ठसवले आहे. चित्रपटाची गाणी चांगली जमून आली आहेत. थोडक्यात, तरुणांच्या भावविश्वावर आधारलेला हा चित्रपट असून त्यांच्या सद्य:स्थितीवर त्याने फोकस टाकण्याचे काम केले आहे.