Join us  

इम्फाच्या मंचावर थिरकले तारे

By admin | Published: December 27, 2015 12:36 AM

इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हलचा (इम्फा) बार्सिलोना येथे नॉर्वेजियन एपिक क्रुझ वर रंगलेला सोहळा कलर्स मराठी चॅनलवर पाहण्याची संधी रविवारी ( २७ डिसेंबर)

मुंबई : इंटरनॅशनल मराठी फिल्म फेस्टिव्हलचा (इम्फा) बार्सिलोना येथे नॉर्वेजियन एपिक क्रुझ वर रंगलेला सोहळा कलर्स मराठी चॅनलवर पाहण्याची संधी रविवारी ( २७ डिसेंबर) आज सायंकाळी ७.०० वाजता रसिकांना मिळणार आहे. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते सचिन पीळगावकर यांचा ‘द रियल हिरो’ या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अभिनेत्री सोनाली कुलकणीर्ने सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि प्रसिद्ध चेहेरा हे दोन पुरस्कार पटकावले.या इम्फा सोहळ्याची किमयाच न्यारी होती. बिग बॉस या कार्यक्रमातून नावारूपाला आलेली बॉलीवूड अभिनेत्री सनी लिओनिने तिच्या प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर केले. शिवाय मराठमोळी नऊवारी साडी नेसून ‘मला लागली कोणाची उचकी’ आणि ‘वाजले की बारा’ या गाण्यांवर लावणी सादर केली. बॉलीवूड अभिनेत्री इशा कोप्पीकरने देखील तिच्या काही प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर केले. बॉलीवूड अभिनेत्री तनिशाने आई तनुजा यांच्यावर चित्रीत झालेल्या प्रसिद्ध गाण्यांवर नृत्य सादर करून जुन्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री सोनाली कुलकणीच्या ‘हिप-हॉप’ नृत्याने सर्वांनाच दंग केले. अभिनेत्री पूजा सावंत आणि अभिनेता वैभव तत्ववादी यांचा ‘फ्लेमिंगो’ नृत्यप्रकार आगळा ठरला. अभिनेत्री मानसी नाईक हिने थिरकण्यातून जणू मायकल जॅक्सनलाच श्रध्दांजली अर्पण केली. यासाठी तिने तब्बल एक महिना रियाझ केला होता. गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांच्या गायनाने रसिकांचे कान तृप्त झाले. त्यातच स्वप्नील बांदोडकरने आणखी भर घातली. प्रख्यात अभिनेते श्रेयस तळपदे आणि सुमीत राघवण यांच्या सूत्रसंचालनाने कार्यक्रमाची लज्जत आणखी वाढली. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि अभिनेता संतोष जुवेकर यांनी या प्रेक्षकांना क्रुझची सैर करवली. अभिनेता अतुल परचुरे आणि अभिनेत्री मानवा नाईक यांनी देखील सूत्रसंचालनात साथ दिली. अभिनेता प्रियदर्शन जाधव याच्या मिमिक्रीवर प्रेक्षक लोट-पोट झाले.इम्फाने मराठी सिनेसृष्टीचे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर अभूतपूर्व प्रतिनिधित्व केले आहे. हा केवळ एक सिनेपारितोषक वितरण सोहळा नसून मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांसाठी विचार-विनिमय करण्याचे एक हक्काचे व्यासपीठ आहे. - चिदंबर रेगे, इम्फाचे डायरेक्टर कलर्स मराठी ने कायम महाराष्ट्राकडे असलेल्या उत्तम आणि दर्जेदार कलाकृतींसाठी एक हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्यावर भर दिला आहे. इम्फा २०१५ निमित्त राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर आम्ही महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. क्रुझवर असा कार्यक्रम करणे खूप कठीण असते पण हे शिवधनुष्य इम्फासोबत आम्ही पेलले़- अनुज पोद्दार कलर्स मराठीचे प्रमुख