Join us  

EXCLUSIVE! 'मन उडू उडू झालं' फेम ही अभिनेत्री झळकली साउथ स्टार दुलकीर सलमानसोबत

By संजय घावरे | Published: September 26, 2022 10:26 AM

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'चुप : रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' या चित्रपटात मन उडू उडू झालं फेम अभिनेत्री पाहायला मिळाली.

जाहिरातींसोबत मराठी मालिकांमध्ये झळकल्यानंतर मोठया पडद्यावर थेट हिंदीत ब्रेक मिळावा... तोही दिग्दर्शक आर. बाल्कींच्या सिनेमात... त्यात दुलकर सलमान मुख्य भूमिकेत असावा... आणि त्याच्यासोबत एकाच फ्रेममध्ये दिसण्याची संधी मिळावी... हे कोणत्याही नवोदीत कलाकारासाठी स्वप्नवत वाटावं असंच आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'चुप : रिव्हेंज ऑफ द आर्टिस्ट' या चित्रपटानं मन उडू उडू झालं फेम अभिनेत्री प्राजक्ता परबचं स्वप्न साकार केलं आहे. समोरून चालून आलेल्या संधीचं सोनं करणाऱ्या प्राजक्तानं 'लोकमत'शी केलेली खास बातचित...

- संजय घावरे

'चुप'मध्ये तुझी एंट्री कशी झाली?- गुरुदत्त यांच्या गाजलेल्या गाण्यांवर बनवलेली रील मी इन्स्टाग्रामवर पोस्ट केली होती. ती पाहून श्रुती महाजनांच्या टिममधील ईशानं इन्स्टावर मेसेज मेसेज करून माझा मोबाईल नंबर मागितला. कॅाल करून तिनं आर. बाल्कींच्या चित्रपटासाठी मला ऑडीशन द्यायची असल्याचं सांगितलं. मी नवखी असल्यानं बाल्कीसरांना ओळखतही नव्हते. विदाऊट मेकअप किचनमध्ये गाबोळी तळताना ऑडीशन शूट करून पाठवली. ऑडीशन आवडल्यानं महिन्याभरानंतर बोलावून फोटोशूट करण्यात आलं. त्यांना अपेक्षित असणाऱ्या माझ्या रिअॅक्शन्स फोटोमध्ये कैद झाल्या आणि 'चुप'मध्ये एंट्री झाली.

गुरुदत्तबाबत तुला कितपत माहित आहे?- आपण जे युनिव्हर्समध्ये पेरतो तेच आपल्याला परत मिळतं यावर माझा विश्वास आहे. या सिनेमाचा गुरुदत्त यांच्याशी संबंध असेल असं माहित नव्हतं. गुरुदत्त यांची गाणी माझा नवरा अंकुश सतत घरी ऐकत आला आहे. त्याच्यामुळेच मी गुरुदत्त यांचे 'कागज के फूल' आणि 'प्यासा'सारखे चित्रपट पाहिले. मला वाटतं माझ्या वास्तूनं तथास्तु म्हटल्यानं मला 'चुप' मिळाला असावा. माझ्या घरात वाजणारी निम्मी गाणी 'चूप'मध्ये आहेत.

तुला पाहिल्यावर बाल्कींचं काय म्हणणं होतं?- खरंच तू हा रोल करणार का? असं बाल्कीसरांनी मला बोलवून विचारलं. तुला वयस्कर दाखवलं जाणार आहे. स्मिता पाटील, नर्गिस, शबाना आझमी यांनी ऐन तारुण्यात वयस्कर व्यक्तिरेखा साकारल्यानं मलाही त्यात काही वावगं वाटत नसल्याच्ं मी त्यांना सांगितलं. माझे विचार त्यांना खूप आवडले आणि 'चुप'द्वारे रुपेरी पडद्यावर खऱ्या अर्थानं माझ्या करियरचा श्रीगणेशा झाला.  

कोणती भूमिका साकारली आहेस?- यात मी दुलकीरच्या सिनेमातल्या आईची भूमिका साकारली आहे. 'ये महलों, ये तख्तों, ये ताजों की दुनिया...' या गाण्यात माझा परफॅार्मंस आहे. सुरुवातीला तरुण असल्यानं मला फार मेकअप नव्हता, पण शेवटचे तीन दिवस मेकअपसाठी दोन तास लागायचे. खूप पेशन्स ठेवावे लागायचे. त्याचा रिझल्ट पडद्यावर दिसत आहे. माझ्या ओळखीतल्या बऱ्याच जणांनी मला ओळखलंच नाही.

तुला वास्तवात पाहिल्यावर दुलकरची रिअॅक्शन कशी होती?- मी गेटअपमध्ये असताना दुलकरशी फार बोलणं झालं नाही. आमचा पहिलाच सीन तो वडीलांच्या मागे धावतो आणि मी त्याला मागून येऊन पकडून रडते असा होता. दुसऱ्या दिवशी जेव्हा त्यानं मला नॉर्मल लुकमध्ये पाहिलं, तेव्हा चकीत झाला. रॅप-अप पार्टीमध्ये भेटल्यावर तू हा रोल का केलास? असं त्यानं मला विचारलं. मी माझा पहिला सिनेमा करतेय. अॅक्ट्रेस म्हणून माझ्याकडे जे चांगलं आलं ते मी स्वीकारलं असं त्याला उत्तर दिलं. माणूस म्हणून तो खूप छान असल्यानं आमची चांगली गट्टी जमली आहे.

या सिनेमाबाबत थोडक्यात काय सांगशील?- हा सिनेमा खरं बोलणारा आहे. सिनेमा हा रिव्ह्यूजवर चालत नसून, वर्ड ऑफ माऊथनं चालतो. सिनेमा चांगला असेल तर लोकं तिकिट काढून तो नक्कीच पाहतात. या सिनेमाच्या बाबतीतही तेच घडत आहे.

टॅग्स :दुलकर सलमान