Join us  

वृशिका मेहताने भूमिकेसाठी घेतली सेक्स वर्कर्सच्या मुलींची भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 3:25 PM

आपली व्यक्तिरेखा वास्तववादी वाटावी यासाठी वृशिका मेहताने विशेष तयारी केली आहे. वृशिकाने सेक्स वर्कर्सच्या मुलांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या क्रांती फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला आणि सेक्स वर्कर्सच्या मुलींची भेट घेतली.

‘झी टीव्ही’वरील ‘ये तेरी गलियाँ’ या आगामी मालिकेत कोलकात्यातील रेड लाईट एरियातील एका सेक्स वर्करच्या मुलीची म्हणजेच पुचकीची कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ही भूमिका अभिनेत्री वृशिका मेहता साकारणार आहे. ती या भूमिकेसाठी सध्या प्रचंड मेहनत घेत आहे. आपली व्यक्तिरेखा वास्तववादी वाटावी यासाठी तिने विशेष तयारी केली आहे. वृशिकाने सेक्स वर्कर्सच्या मुलांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या क्रांती फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेशी संपर्क साधला आणि या मुलांची भेट घेतली.त्या परिसरात तिने अशा काही मुलींची भेट घेतली, ज्यांच्या जीवनावर तिची व्यक्तिरेखा आधारित आहे. मालिकेतील पुचकी या मुलीच्या भूमिकेप्रमाणेच सेक्स वर्कर्सच्या या मुलींनी आपल्या जीवनातील ध्येय निश्चित केले असून त्यासाठी मनाची तयारी केली आहे. आपल्यातील क्षमता ओळखून त्यांनी आपले भवितव्य उज्ज्वल करण्यासाठी त्या ध्येयासाठी अथक प्रयत्न केले आहेत. 

आपल्या संघटनेत वृशिकाला काम करताना पाहून या मुलींना खूप आनंद झाला आणि वृशिकाला एक चांगला अनुभव येईल, याची त्यांनी काळजी घेतली. त्यांनी वृशिकाची आवडती गाणी तर गायलीच, तसेच काही लोकप्रिय गीतांवर नाचही केला आणि त्यात वृशिकालाही सहभागी करून घेतले. वृशिका स्वत: उत्तम नर्तकी असून तिनेही या मुलींना ‘झुम्बा’ नृत्य करून दाखवले आणि तंदुरुस्त राहण्याच्या काही टिप्स दिल्या. यापैकी काही मुली अभिनय, रंगभूमी, नृत्यदिग्दर्शन यासारख्या क्षेत्रात कारकीर्द करू पाहात असून काहींनी थेट नोकरीचा मार्ग स्वीकारला आहे. काही जणी नर्सेस आणि केबिन क्रू म्हणूनही काम करत आहेत. पण यापैकी प्रत्येक मुलीने आपल्या भवितव्याची दोर आपल्या हाती धरून ठेवली असून आपल्या आधीच्या पिढीच्या व्यवसायाशी नाते तोडून टाकण्याचा आणि आपले ध्येय साध्य करण्याचा कठोर निर्धार केला आहे.

या भेटीच्या आपल्या अनुभवाविषयी वृशिका सांगते, “जीवनविषयक काही धडे इतक्या अल्पावधीत मला शिकविणाऱ्या काही मुलींशी माझी भेट झाली, याबद्दल मी स्वत:ला अतिशय सुदैवी समजते. त्यांच्याशी बोलल्यावर मला जाणवलं की, या मुलींना रोजच्या जीवनात, पदोपदी जो मानसिक ताण सहन करावा लागतो, त्या तुलनेत मला जाणवणारा मनावरचा ताण काहीच नाहीये. इतकं करूनही त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मित कायम असतं. त्यामुळे मला मिळालेलं आयुष्य मी गृहित धरता कामा नये किंवा किरकोळ गोष्टींचा बाऊ करणं सोडून दिलं पाहिजे, याची मला जाणीव झाली आहे. आता या मुलींमधील जीवनविषयक विधायक दृष्टी, नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न आणि कधीही हार न मानण्यची ही वृत्ती मला माझ्या पुचकीची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना नक्कीच उपयोगी पडेल आणि ही व्यक्तिरेखा जास्तीत जास्त परिपूर्ण साकारता येईल. एखाद्या भूमिकेसाठी संशोधन करताना मला पूर्वी कधीच इतका आनंद झाला नव्हता. त्यामुळे आता ही व्यक्तिरेखा उभी करण्यास मी आतुर झाले असून त्याद्वारे प्रेक्षकांनाही एक वेगळी व्यक्तिरेखा पाहिल्याचा आनंद मिळेल.”