Join us  

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांची ही इच्छा राहिली अपुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 2:43 PM

कवी कुमार आझाद यांना तारक मेहता मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ते एक चांगले कलाकार असण्यासोबतच एक चांगले कवी होते. त्यांच्या कवितांचे पुस्तक देखील प्रकाशित झाले होते.

तारक मेहता का उल्टा चष्मा फेम डॉ हाथी म्हणजेच कवी कुमार आझाद यांनी नुकताच मीरा रोड मधील रुग्णालयात शेवटचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले. कवी कुमार आझाद यांनी छोट्या पडद्याप्रमाणे मोठ्या पडद्यावर देखील काम केले आहे. मेला या चित्रपटात आमिर खान सोबत ते झळकले होते. त्यांना तारक मेहता मुळे खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. ते एक चांगले कलाकार असण्यासोबतच एक चांगले कवी होते. त्यांच्या कवितांचे पुस्तक देखील प्रकाशित झाले होते. 

कवी कुमार आझाद यांना एक भोजपुरी चित्रपट बनवण्याची इच्छा होती. त्यांनी चित्रपटाची कथा देखील लिहिली असून लवकरच त्यावर काम करायला सुरुवात करणार होते. पण त्यांची आता ही इच्छा अपुरी राहणार आहे. 

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी प्रेक्षकांचे प्रचंड लाडके होते. ही भूमिका साकारणारे कवी कुमार आझाद यांची आज तब्येत बरी नसल्याने ते चित्रीकरणासाठी येऊ शकणार नाहीत असा त्यांनी सकाळी निरोप कळवला होता. त्यांना सकाळ पासूनच अस्वस्थ वाटत होते. घरातच त्यांना हृदय विकाराचा धक्का आल्याने त्यांना नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आले होते. पण तिथे त्यांचे निधन झाले.  

तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेला लवकरच दहा वर्ष पूर्ण होणार आहेत. त्यानिमित्ताने आज एक मीटिंग मालिकेच्या सेट वर आयोजित करण्यात आली होती. पण त्या आधीच हि दुःखद बातमी मालिकेच्या सेट वर आली. त्यांच्या निधनाने मालिकेच्या टीमला चांगलाच धक्का बसला आहे. या कार्यक्रमाचे निर्माते असित कुमार मोदी यांना या गोष्टीचा धक्का बसला आहे. ते सांगतात, कवी कुमार आझाद एक चांगले कलाकार आणि व्यक्ती होते. त्यांना बरे नसेल तरी ते चित्रीकरणाला यायचे. आज सकाळी ते येणार नसल्याचा निरोप त्यांनी दिला होता. पण आता जी बातमी आली त्याने आम्हाला सगळयांनाच मानसिक धक्का बसला आहे. 

टॅग्स :कवी कुमार आझादतारक मेहता का उल्‍टा चश्‍मा