Join us

'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून बाहेर पडला 'टप्पू'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2017 14:04 IST

छोटया पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून लवकरच भव्य गांधी म्हणजे टप्पू एक्झिट घेणार आहे.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 28 - छोटया पडद्यावरील लोकप्रिय मालिका 'तारक मेहता का उल्टा चष्मा'मधून लवकरच भव्य गांधी म्हणजे टप्पू एक्झिट घेणार आहे. मागच्या नऊ वर्षांपासून टप्पूची भूमिका साकारणा-या भव्यने  काही कारणांमुळे ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. गडा कुटुंबातील टप्पू या मालिकेतील मुख्य पात्र आहे. 
 
मागच्या नऊ वर्षात टप्पूच्या खोडकरपणातून निर्माण झालेल्या वादांनी  प्रेक्षकांना भरभरुन हसवले. मालिका सुरु झाली तेव्हा शाळेत जाणारा टप्पू आता कॉलेज कुमार झाल्याचे मालिकेत दाखवण्यात आले आहे. भारतात विविध जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र राहून आपली संस्कृती जपतात तसेच या मालिकेत दाखवण्यात आले. त्यामुळे ही मालिका प्रेक्षकांना विशेष भावली. निखळ विनोदातून सामाजिक संदेश हे या मालिकेचे आणखी एक वैशिष्टय आहे. त्यामुळे या मालिकेचा एक प्रेक्षकवर्ग आहे. 
 
गडा कुटुंब हे या मालिकेचे प्राण असून आता टप्पूच्या एक्झिटने त्याचे चाहते निराश होणार आहेत. टप्पूला सध्या स्क्रिनवर फारशी संधी मिळत नव्हती. महिन्यातून तीन ते चार दिवसांचे त्याचे शूट असायचे त्यामुळे त्याने मालिका सोडली अशी चर्चा आहे. टप्पूच्या एक्झिटनंतर मालिकेमध्ये आणखी काही बदल होऊ शकतात. दीर्घकाळ चाललेली ही मालिका अजूनही आपला प्रेक्षकवर्ग टिकवून आहे.