Join us  

सुशांत-क्रितीचा "राबता" सेन्सॉरच्या कात्रीत

By admin | Published: June 08, 2017 11:30 AM

सिनेमा रिलीज व्हायला दोन दिवस राहिले असताना सेन्सॉर बोर्डाने सिनेमाच्या अनेक सीनवर कात्री चालवली आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 8- हिंदी सिनेमे आणि सेन्सॉर बोर्ड हे नवं समिकरण सध्या बॉलिवूडमध्ये बघायला मिळतं आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून अनेक नवीन सिनेमे सेन्सॉर बोर्डाच्या कात्रीत सापडलेले बघायला मिळत आहेत. यातच आता भर पडते आहे सुशांत सिंग राजपूत आणि कृती सनॉन यांच्या राबता या सिनेमाची. हा सिनेमा प्रदर्शित व्हायला फक्त दोन दिवस राहिले असताना सेन्सॉर बोर्डाने सिनेमाच्या अनेक सीनवर कात्री चालवली आहे. सेन्सॉर बोर्डाच्या काही अधिकाऱ्यांनी मागील आठवड्यात हा सिनेमा पाहिला आणि सिनेमातील सुशांत आणि क्रितीचे काही किसिंग सिन्स आणि अश्लील भाषा हटवण्याचा निर्णय घेतला आहे. सेन्सॉरच्या या भूमिकेमुळे राबताच्या संपूर्ण टीममध्ये सध्या प्रचंड नाराजी आहे. 
 
दिनेश विजान दिग्दर्शित या सिनेमात अनेक ठिकाणी शिव्यांचा वापर केला आहे, हे सिन्स दाखवता येणार नाही, असं म्हणत बोर्डाने ते सीन हटवायला सांगितले आहेत.  तसंच सिनेमातील काही दृश्यांमध्ये अश्लील भाषा वापरण्यात आल्यामुळे, सेन्सॉर बोर्डाच्या मते, "ही एक साधी प्रेमकहाणी असून त्यात शिव्यांची काहीच आवश्यकता नाही." असं मत सेन्सॉर बोर्डाने मांडलं आहे.  ‘जर तुम्हाला यू/ए सर्टिफीकेट हवं असेल तर काही दृश्यांमध्ये बदल करावा लागेल, तसं न केल्यास सिनेमाला ए प्रमाणपत्र देण्यात येईल,असं सेन्सॉर बोर्डाने  सांगितल्याची माहिती मिळते आहे. 
 
राबता सिनेमाच्या प्रदर्शनाच्या वाटेत अनेक अडचणी येत आहेत. याआधी काही दिवसांपूर्वी एस.एस राजामौली यांचा तेलुगू सिनेमा ‘मगधीरा’ची कथा चोरल्याचा आरोप सिनेमावर केला गेला होता. यानंतर पंजाबी गायक जे स्टारनेही सिनेमातले ‘मैं तेरा बॉयफ्रेंड’ हे गाणं चोरल्याचा आरोप केला होता. त्याच्या या आरोपानंतर यू-ट्यूबवरून हे गाणं हटवण्यात आलं होतं.