‘डबल सीट’ (मराठी चित्रपट)
- राज चिंचणकरएखाद्या चित्रपटात आपल्याच आयुष्याचे तंतोतंत प्रतिबिंब जर दिसले, तर त्यातल्या व्यक्तिरेखांमध्ये आपणच आपल्याला नकळत शोधू लागतो; आणि मग त्यांच्याशी समरस होणे ही अजिबातच कठीण गोष्ट उरत नाही. हे सांगण्याचे मूळ कारणच ‘डबल सीट’ या चित्रपटात दडलेले आहे. मध्यमवर्गीय आयुष्य जगण्यात हयात घालवणाऱ्या, त्यातूनही काही स्वप्ने पाहण्याची उमेद मनाशी बाळगून असणाऱ्या आणि त्यासाठी जमेल तितकी लांब उडी मारण्यासाठी प्रसंगी धैर्य गोळा करणाऱ्या माणसांची गोष्ट सांगत या चित्रपटाने गतकाळातल्या आठवणी अधिक गहिऱ्या तर केलेल्या आहेतच; पण त्यावर हळुवार फुंकरही घातली आहे. परिणामी, आयुष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहायला लावणारी ही सुफळ संपूर्ण कहाणी म्हणजे तुमच्या-आमच्या जगण्याची गोष्ट ठरली आहे.ज्या मंडळींनी चाळीतले आयुष्य अनुभवले आहे, त्यांच्यासाठी तर हा चित्रपट म्हणजे ‘आंखो देखा हाल’ म्हणायला लागेल. मुंबईची चाळसंस्कृती आणि तिथल्या चाळकऱ्यांच्या जीवनाचा पट मांडत या ‘डबल सीट’ने मुक्त सैर घडवून आणली आहे. लालबागच्या चाळीतल्या अमितशी लग्न करून मंजिरी तिथे राहायला आली आहे. मूळची रोह्याची असल्याने मंजिरीला मुंबईविषयी स्वाभाविकच प्रचंड कुतूहल आहे. त्यातच अस्सल मुंबई जिथे अनुभवायला मिळते, अशा चाळीत तिचा संसार सुरू झाला आहे. अमित कुरिअर कंपनीत नोकरी करतो; तर मंजिरी खाजगी विमा एजंट म्हणून काम करते. या घरात अमितचे आई-बाबा, भाऊ असे कुटुंब आहे आणि या लोकांत मंजिरीने कुठलीही कुरबुर न करता स्वत:ला सामावून घेतले आहे. पण अमितला तिची होणारी कुचंबणा हळूहळू लक्षात येत जाते आणि एका क्षणी तो वेगळे राहण्याविषयीचा पर्याय मंजिरीला सांगतो. अर्थातच मंजिरी हरखून जाते. इथून या दोघांचा घर घेण्यासाठी आटापिटा सुरू होतो आणि दोघे कंबर कसून कामाला लागतात. चित्रपटाची गोष्ट म्हणावी तर इतकीच आहे, पण वास्तवाचे अचूक भान राखत तिची केलेली मांडणी या गोष्टीच्या पार प्रेमात पडायला भाग पाडते.अतिशय साधी-सरळ, परंतु मनाला चटकन भावेल अशी कथा व पटकथा क्षितिज पटवर्धन आणि समीर विध्वांस या दोघांनी मिळून लिहिली आहे. मुळात चित्रपटाचा पायाच दमदार जमून आल्यावर त्यावर उभ्या राहणाऱ्या इमारतीला कोणताही धोका निर्माण होणे संभवतच नाही. त्यातच क्षितिजच्या चटपटीत, तसेच संवेदनशील संवादांची करण्यात आलेली पेरणी या इमारतीला उजळून टाकण्याची कामगिरी फत्ते करते. दिग्दर्शक समीर विध्वांसने मुंबईची चाळसंस्कृती यात जशीच्या तशी उभी केली असून, चाळकऱ्यांच्या केवळ घरात डोकावण्यापर्यंतच नव्हे; तर त्यांच्या मनाचे तळ धुंडाळण्याइतके भन्नाट सादरीकरण त्याने केले आहे. त्यादृष्टीने क्षितिज व समीर या जोडीने मिळून केलेले हे कोरीवकाम आखीव-रेखीव झाले आहे.चाळीतल्या दोन खोल्यांच्या घरात आणि एकत्र कुटुंबात नवदाम्पत्याची होणारी घुसमट, आवश्यक त्या स्पेसचा अभाव, घर घेण्याचा विषय निघाल्यावर होणाऱ्या विरोधापासून पुढे येणारा टर्निंग पॉइंट, परस्पर नात्यांतली ओढ आणि विश्वास, वेळप्रसंगी पाठीशी उभे राहण्याची मानसिकता हे सारं सारं काही ज्या प्रकारे या चित्रपटातून मांडले गेले आहे, त्याला आपसूक दाद देणे एवढेच आपल्या हाती उरते. म्हणजे अशा प्रकारची दाद देण्याजोगी कामगिरी लेखक आणि दिग्दर्शकद्वयीने मुळातच करून ठेवली आहे. यातल्या व्यक्तिरेखा कमालीच्या ताकदीने या दोघांनी सजवल्या आहेत आणि यातल्या कलावंतांनीही त्यांचा विश्वास सार्थ ठरवला आहे. अर्जुन सोरटे यांचे छायांकन आणि जसराज-सौरभ-हृषीकेश यांचे संगीतही उत्तम झाले आहे.अंकुश चौधरी आणि मुक्ता बर्वे ही जोडी प्रथमच या चित्रपटाद्वारे एकत्र आली आहे खरी; पण यावर सहज विश्वास बसू नये, असा तगडा परफॉर्मन्स त्यांनी मिळून दिला आहे. टिपिकल चाळीत वाढलेला, पण मंजिरीची जबाबदारी आल्यावर प्रगल्भ झालेला, स्वप्नपूर्तीसाठी धावणारा अशी विविध रूपे अंकुशने या चित्रपटातल्या अमितमध्ये साकारली आहेत. अंकुशच्या आतापर्यंतच्या भूमिकांपेक्षा बऱ्यापैकी चाकोरीबाहेरची व्यक्तिरेखा त्याने दमदार रंगवली आहे. मंजिरीच्या भूमिकेत मुक्ताने लाजवाब अदाकारी पेश करत एक लव्हेबल व्यक्तिरेखा उभी केली आहे. चाळीच्या विश्वात प्रवेश केलेली, मुंबईबद्दलचे कुतूहल आपल्या कवेत सामावून घेऊ पाहणारी, नवऱ्याला पदोपदी साथ देणारी, वेळप्रसंगी त्याचे मनोधैर्य उंचावणारी, हे आणि असे अनेक विभ्रम तिने कमालीच्या ताकदीने आविष्कृत केले आहेत. वंदना गुप्ते यांनी मंजिरीची सासू, म्हणजे मालतीबाई ज्या गोडव्याने रंगवली आहे, ती केवळ आणि केवळ अनुभवण्याची गोष्ट आहे. विद्याधर जोशी यांनी साकारलेले वडील यातल्या काही प्रसंगांतून थेट मनावर ठसत जातात. इतर भूमिकांमध्ये शुभंकर तावडे, संदीप पाठक, आरती वडगबाळकर आदींनी आपली कामगिरी चोख बजावली आहे. मनाच्या आत, अगदी खोलवर उतरत जाणारी गोष्ट आणि समर्थ आविष्कार दाखवण्याची चित्रपटाची किमया निव्वळ अनुभवण्याजोगी आहे.