Join us  

सोनाक्षीच्या अभिनयाला ‘नूर’ आला

By admin | Published: April 22, 2017 3:08 AM

मधुर भांडारकरच्या ‘पेज ३’ या चित्रपटाद्वारे पत्रकारितेवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. ‘पेज ३’मध्ये अडकून न राहता समाजासाठी पत्रकारिता करण्याची इच्छा असलेल्या

- प्राजक्ता चिटणीस

हिंदी चित्रपट - नूर

मधुर भांडारकरच्या ‘पेज ३’ या चित्रपटाद्वारे पत्रकारितेवर प्रकाशझोत टाकण्यात आला होता. ‘पेज ३’मध्ये अडकून न राहता समाजासाठी पत्रकारिता करण्याची इच्छा असलेल्या एका मुलीची कथा आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळाली होती. या चित्रपटानंतर अनेक वर्षांनंतर सुन्हिल सिप्पी यांनी पत्रकारिता आणि पत्रकार यांच्या आयुष्यावर ‘नूर’ हा चित्रपट बनवला आहे.आपल्या जगात रमणारी, एखाद्या सामान्य मुलीप्रमाणे आयुष्य जगणारी नूर (सोनाक्षी सिन्हा) एक पत्रकार असते. तिची मैत्रीण झारा (शिबानी दांडेकर), मित्र साद (कनन गिल) आणि तिचे वडील हेच तिचे जग असते. तळागाळातील लोकांसाठी पत्रकारिता करायची, समाजातील समस्यांवर आवाज उठवायचा अशी नूरची इच्छा असते. पण ती जिथे काम करत असते, त्या वाहिनीचा मालक हा केवळ टीआरपीच्या मागे धावत असतो. त्यामुळे हातावर चालणारा माणूस, सतत हेल्मेट घालणारी बाई अशा फुटकळ बातम्या तिला करायला सांगत असतो. या सगळ्याला कंटाळून नूर नोकरी सोडते. नोकरी गेल्यावर आता आपले काय होणार या चिंतेत असतानाच तिची ओळख अयान बॅनर्जी (पुरब कोहली) सोबत होते. अयान हा अतिशय प्रसिद्ध पत्रकार असतो. अयानसोबत कामानिमित्त फिरत असताना ती नकळत त्याच्या प्रेमात पडते. अयान आयुष्यात आल्यामुळे ती प्रचंड खूश असते. याच दरम्यान तिच्या मोलकरणीच्या आयुष्यात एक संकट येते. मालती (स्मिता तांबे)च्या भावाची किडणी एका डॉक्टरने त्याला धोका देऊन काढून घेतली असल्याचे नूरला कळते. यावर ती आवाज उठवण्याचे ठरवते. पण हे करत असताना तिच्याच जवळच्या लोकांकडून तिची फसवणूक होते. या सगळ्याला ती कशी तोंड देते आणि तिच्या मोलकरणीला कशा प्रकारे न्याय मिळवून देते हे प्रेक्षकांना नूर या चित्रपटात पाहायला मिळते.नूर या चित्रपटाची सुरुवात ही अतिशय संथ आहे. मध्यांतर व्हायला दहा-पंधरा मिनिटे असेपर्यंत चित्रपटात काहीही नवीन घडत नाही. पण चित्रपटात नूरच्या मोलकरणीच्या घरातील ट्रक सुरू झाल्यावर चित्रपटाला वेगळे वळण मिळते. मध्यांतरांनंतर चित्रपटाच्या कथेत अनेक चढउतार पाहायला मिळतात. पण तरीही चित्रपटाची कथा काहीशी ढिसाळच आहे. असे असले तरीही एक चित्रपट म्हणून नूर निराशा करत नाही.सोनाक्षी सिन्हाने ‘दबंग’ या चित्रपटापासून तिच्या कारकिर्दीला सुरुवात केली. आजवरच्या तिच्या कारकिर्दीत ‘अकिरा’ वगळता तिला कोणत्याच नायिकाप्रधान चित्रपटात काम करण्याची संधी मिळालेली नाही. पण नूर हा चित्रपट पूर्णपणे सोनाक्षीने आपल्या अभिनयाच्या जोरावर पेलला आहे. एक अभिनेत्री म्हणून तिने या चित्रपटातून स्वत:ला सिद्ध केले आहे. तिच्यासोबत पुरब कोहली, कनन गिल, शिबानी दांडेकर यांनी चांगला अभिनय केला आहे. स्मिता तांबेने तर मालती ही व्यक्तिरेखा खूपच चांगल्या प्रकारे उभी केली आहे. तिच्या संवादफेकीसाठी आणि तिने संवादावर घेतलेल्या मेहनतीसाठी तिला शाबासकी देणे गरजेचे आहे. आजच्या युगात पत्रकार, वाहिन्यांचे मालक हे टीआरपीच्या मागे धावताना आपल्याला पाहायला मिळतात. समाजाच्या दृष्टीने गरजेच्या असलेल्या बातम्यांपेक्षा टीआरपी जास्तीतजास्त मिळवणाऱ्या बातम्यांना सध्या अधिक महत्त्व दिले जाते हे या चित्रपटाद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. आजच्या पत्रकारितेवर आणि पत्रकारांवर या चित्रपटातून भाष्य करण्यात आले आहे. सोनाक्षीच्या आजवरच्या करियरमधील एक चांगला चित्रपट म्हणून या चित्रपटाकडे नक्कीच पाहता येईल.