Join us  

धक्कादायक ! मुल विकण्यासाठी बलात्कार

By admin | Published: March 25, 2017 10:14 AM

जन्माला येणारं मुल बाजारात विकता यावं यासाठी महिलांवर बलात्कार करुन गरोदर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - दिल्लीमधील प्लेसमेंट एजन्सीच्या मालकाने झारखंडमधील सिमडेगा जिल्ह्यातील एका महिलेवर गरोदर होण्यासाठी जबरदस्ती केली. इतकंच नाही तर यासाठी नकार दिल्यानंतर तिला मारहाणही करण्यात आली. यानंतर या महिलेवर दुस-या प्लेसमेंट एजन्सीमधील एजंटनी सलग दोन दिवस बलात्कार केला आणि तिला गरोदर केलं. हे सर्व जन्माला येणारं मुल बाजारात विकता यावं यासाठी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली. 
 
30 वर्षीय पीडित महिलेसोबत पश्चिम बंगालमधील 40 वर्षीय महिलेने या एजन्सीमधून आपली सुटका करुन घेत महिला आयोगाकडे धाव घेतल्यानंतर ही घटना उघडकीस आली आहे. आपल्यावर झालेले सर्व अत्याचार या महिलांनी आयोगाला सविस्तरपणे सांगितले. आपण दिड महिन्याची गरदोर असल्याचं या महिलेने सांगितलं. तसंच प्लेसनेंट एनज्सीच्या मालकाने मुल विकण्याची योजना आखली असल्याचीही माहिती दिली. 
 
यानंतर महिला आयोगांची एक टीम दिल्ली पोलिसांसोबत प्लेसमेंट एजन्सीमध्ये पोहोचली. या ठिकाणहून दोन एजंटला अटक करण्यात आली आहे. सोबतत सहा महिला ज्यांच्यामधील काही गरोदर होत्या त्यांची सुटका करण्यात आली आहे. एजन्सीच्या मालकाला अटक करुन त्याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. 
 
पीडित महिलेने महिला आयोगाकडे दिलेल्या माहितीनुसार, 'विरेंद्र साहू नावाची एक व्यक्ती तिला सिमडेगाहून दिल्लीला नोकरी लावण्याच्या बहाण्याने घेऊन आली होती. सुरुवातीला तिला एका प्लेसमेंट एजन्सीच्या कार्यालयात ठेवण्यात आलं होतं. तिकडे तिचं आधार कार्ड आणि फोन काढून घेण्यात आला होता. यानंतर तिला निहाल विहार परिसरातील प्लेसमेंट एजन्सीमध्ये नेण्यात आलं. ही एनज्सी आरती आणि तिचा पती बाबू राज चालवतात'.
 
महिलेने सांगितलं की, 'जेव्हा मी गरोदर होण्यास नकार दिला तेव्हा मला मारहाण करण्यात आली. एका एजंटने सलग दोन दिवस माझ्यावर बलात्कार करुन मला गरोदर केलं. एजन्सीचा मालक एका गरोदर महिलेला रुग्णालयात घेऊन जात असताना दरवाजाला कुलूप लावायला विसरला. आणि हिच संधी साधत मी तिथून पळ काढला'. दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी 'महिलेने दिलेल्या जबाबावरुन तरी त्यांना जबरदस्ती गरोदर केलं जात होतं, जेणेकरुन मुल विकता यावं हे स्पष्ट होत असल्याचं', सांगितलं आहे.