Join us  

दुष्काळाच्या झळांना ताऱ्यांच्या मदतीची सावली

By admin | Published: May 01, 2016 2:23 AM

पाऊस नाही... पाणी नाही... कोरड्या पडलेल्या जमिनी, उन्हाच्या तडाख्यात जळून खाक झालेली पिके अन् कर्जाच्या डोंगराखाली आत्महत्येस मजबूर होऊन या संपूर्ण

पाऊस नाही... पाणी नाही... कोरड्या पडलेल्या जमिनी, उन्हाच्या तडाख्यात जळून खाक झालेली पिके अन् कर्जाच्या डोंगराखाली आत्महत्येस मजबूर होऊन या संपूर्ण परिस्थितीशी झगडून होरपळलेला शेतकरी, असे चित्र सध्या दुष्काळी भागात पाहायला मिळत आहे. दोन घोट पाण्यासाठी गमवावा लागणारा जीव अन् ओसाड जमिनीकडे पाहत हतबल झालेल्या शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या पाहता, सरकारची मदतदेखील अपुरी पडत आहे. अशाच आपल्या शेतकरी बांधवांसाठी व दुष्काळग्रस्त भागासाठी कलाकारांनी त्यांच्या झगमगाटी दुनियेतून बाहेर येऊन मदतीचा हात दिला आहे. त्यामुळेच या कलाकारांच्या कार्यावर सीएनएक्सने टाकलेला प्रकाश व त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी काही कलाकार व दिग्दर्शक यांच्याशी साधलेला संवाद.नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी दुष्काळग्रस्त भागासाठी केलेले काम आपल्या सर्वांच्या समोर आहे. नामने दिलेल्या मदतीच्या हाकेला आज राज्यभरातून लाखो लोक पुढे सरसावत आहेत. नाना आणि मकरंद यांच्या कामाचे कौतुक तर होतच आहे; परंतु भरभक्कम रकमेचे चेकदेखील नामच्या माध्यमातून दुष्काळग्रस्त भागात पोहोचत आहेत. या पैशांच्या मदतीमुळे उद्ध्वस्त झालेला शेतकरी अन् त्याचा मोडकळीस आलेला संसार पुन्हा फुलण्याची आस आहे. नाम संस्थेच्या कार्याला वेग आला असून अगदी गल्लीबोळातील छोटी मंडळेसुद्धा नामला मदत करण्यासाठी धडपडत आहेत. म्हणूनच नाना आणि मकरंद यांनी उचलेला हा सामाजिक कार्याचा विडा सफल होताना दिसत आहे.बॉलीवूडमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटविणारा लय भारी अभिनेता रितेश देशमुख याने नुकतेच त्याचे गाव लातूरमधील जलयुक्त लातूर अभियानासाठी २५ लाख रुपयांची देणगी दिली आहे. सध्या दुष्काळाच्या झळांनी होरपळलेल्या लातूरला जलयुक्त करण्यासाठी गावकऱ्यांच्या मदतीला रितेशने हातभार लावला आहे. तर स्वत: लातूरमध्ये जाऊन त्याने जलयुक्त लातूरचे काम पाहिले आहे. बॉलीवूडचा परफेक्शनिस्ट आमीर खान हादेखील दुष्काळग्रस्त भागासाठी पुढे सरसावला आहे. आमीरने महाराष्ट्रातील तळ आणि कोरेगाव ही दोन दुष्काळग्रस्त गावे दत्तक घेतली आहेत. महाराष्ट्रातील काही गावांचा आमीरने दौरा करून पाणी वाचवण्यासाठी काय केले पाहिजे, याविषयी गावकऱ्यांना मार्गदर्शन केले. नुकतीच आमीरने औरंगाबाद, बीड या गावांची पाहणी केली व तेथे तो महाराष्ट्र सरकारचे जलयुक्त शिवार अभियान राबविणार आहे. एवढेच नाही तर बॉलीवूडचा खिलाडी अक्षयकुमार यानेदेखील जलयुक्त शिवार अभियानासाठी ५० लाख रुपयांची मदत केली आहे.‘देऊळ बंद’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे प्रवीण तरडे याविषयी म्हणाले, ‘‘मी स्वत: शेतकरी कुटुंबातील आहे आणि त्यामुळे दुष्काळग्रस्त भागातील व कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या शेतकऱ्यांच्या भावना मी जास्त जवळून समजू शकतो. माझे आई-वडील आजही मुळशी येथील माझ्या जातेड गावात शेती करतात. मीदेखील कधीकधी त्यांना शेतात मदत करण्यासाठी जातो. नाम फाउंडेशनच्या माध्यमातून नाना आणि मकरंद जे काम करतात, ते कौतुकास्पद आहे. मकरंद माझा अतिशय चांगला मित्र आहे. मागे एकदा त्याचा मला फोन आला आणि तो म्हणाला, ‘मी एका विद्यार्थ्याला तुझ्याकडे पाठवतो. त्याच्याकडे फी भरायला पैसे नाहीत. पुण्याच्या एका कॉलेजमध्ये तो इंजिनीअरिंग करतोय.’ तर त्या मुलाची फी आम्ही भरली. अशा प्रकारे मकरंद दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांसाठीदेखील कार्यरत आहे.’’कलाकारदेखील माणूसच आहेत. या समाजाचा घटक आहे. सामाजिक कार्य आपले सर्वांचेच कर्तव्य आहे. त्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळी स्थिती असताना आपण पाणी वाचविले पाहिजे. त्यातच नळ चालू ठेवू नये, शॉवरखाली आंघोळ करू नये अशा छोट्या-छोट्या गोष्टी केल्या, तर बरेच परिवर्तन घडेल. तसेच आज जर तुम्ही झाडांना जगविले, तर ती उद्या तुम्हाला जगवतील. नाना आणि मकरंद यांचे काम फार अभिमानास्पद आहे आणि आम्हाला आनंद वाटतो, की कलाकार त्याच्याशी जोडले जात आहेत. - स्वप्निल जोशीआपण समाजासाठी काम करतोय, यात कसलाच मोठेपणा नाही. आम्ही कलाकार या समाजाशी जोडलेलो आहोत. जर समाज आनंदी असेल, तर तो आमची कलाकृती पाहायला येईल; अन्यथा कोण चित्रपटगृहात चित्रपट पाहील? माझ्या आगामी ‘देऊळ बंद-२’, ‘आता परीक्षा देवाची’ या चित्रपटांच्या नफ्यातून निर्माते कैलास वाणी आत्महत्या केलेल्या ५० शेतकऱ्यांची कुटुंबे दत्तक घेणार आहेत.- प्रवीण तरडेआपण या देशाचे नागरिक आहोत आणि कोणतीही दुष्काळी परिस्थिती आली, की तिचा सामना आपल्या सर्वांना एकजुटीने करावा लागतो. ती आपली जबाबदारीच आहे. देवाच्या दयेने कलाकाराकडे दुष्काळग्रस्त भागातील पीडितांसाठी योगदान देण्याकरिता पैसे आहेत अन् बरेच कलाकार पुढे येऊन त्यासाठी मदत करीत आहेत, ही नक्कीच चांगली बाब आहे.- सई ताम्हणकर---------------

Focus :
priyanka.londhe@lokmat.com