Join us  

सेन्सॉरचा अतिरेक, चित्रपटातील लेस्बियनचा 'आवाज'ही दाबला

By admin | Published: March 04, 2015 11:29 AM

आक्षेपार्ह शब्दांची लांबलचक यादी जाहीर करुन वाद निर्माण करणा-या सेन्सॉर बोर्डाने आता चक्क चित्रपटातील संवादात लेस्बियन शब्दाचा वापर करण्यास निर्बंध घातल्याचा प्रकार समोर आला आहे.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ४ -  सिनेमातील संवादांमधील आक्षेपार्ह शब्दांची लांबलचक यादी जाहीर करुन वाद निर्माण करणा-या सेन्सॉर बोर्डाने आता चक्क चित्रपटातील संवादात लेस्बियन शब्दाचा वापर करण्यास निर्बंध घातल्याचा प्रकार समोर आला आहे. चित्रपटातील प्रत्येक शब्दावर आक्षेप घेऊन सेन्सॉर बोर्डाला नेमके काय साधायचे आहे असा सवाल सोशल मिडीयावर उपस्थित होत आहे. 
गेल्या आठवड्यात दम लगा कै हैश्शा हा चित्रपट प्रदर्शित झाला असून या सिनेमात आयुषमान खुराणा व भूमी पेडणेकर ही जोडी प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटात कोर्टातील एका दृश्यात लेस्बियन हा शब्द वापरण्यात आला होता. सेन्सॉर बोर्डाने या शब्दावर आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे. संवादातील लेस्बियन हा शब्द म्यूट करण्याची सक्ती सेन्सॉर बोर्डाने केली असा दावा केला जात आहे. या सिनेमासंदर्भात सेन्सॉर बोर्डाने घेतलेल्या आक्षेपाची यादी ट्विटरवर झळकली आहे. यामध्ये 'हरामखोर'ऐवजी 'कठोर', घंटा ऐवजी ठेंगा असे शब्द वापरण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने केल्याचे दिसते. सेन्सॉर बोर्डाचे सदस्य अशोक पंडीत यांनीदेखील या निर्णयाचा विरोध दर्शवला आहे. 
बाबा राम रहिम यांच्या मॅसेंजर ऑफ गॉड या सिनेमाला हिरवा कंदील दिल्यापासून सेन्सॉर बोर्ड वादाच्या भोव-यात सापडला आहे. एमएसजीला हिरवा कंदील दाखवल्याच्या निषेधार्थ सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्ष लीला सॅमसन यांनी राजीनामा दिला होता. यानंतर पंकज निहलानी यांची सेन्सॉर बोर्डाच्या अध्यक्षपदावर वर्णी लागली होती. निहलानी अध्यक्ष झाल्यापासून सेन्सॉर बोर्डाने वादग्रस्त निर्णयांची मालिकाच सुरु केली आहे.काही दिवसांपूर्वी सेन्सॉर बोर्डाने शिवराळ शब्दाची यादी जाहीर करत हे शब्द वापरण्यास मज्जाव केला होता. या निर्णयावर चोहोबाजूंनी टीका झाल्यावर बोर्डाला यादी मागे घ्यावी लागली होती.