मुंबई : मारहाणप्रकरणी अभिनेता सैफ अली खानविरोधात दाखल असलेल्या तक्रारीत तडजोड करण्यास तक्रारदार इक्बाल मीर शर्मा यांनी नकार दिला आहे. त्यामुळे सैफच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण यात दोषी आढळल्यास सैफला सात वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते.ही घटना २२ फेब्रुवारी २०१२ रोजी घडली. सैफ, त्याची पत्नी करिना व त्याचे मित्र कुलाबा येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये गेले होते. तेथे शर्मा व त्यांचे सासरे यांच्याशी सैफची बाचाबाची झाली होती. त्या वेळी शर्मा यांनी सैफ व त्याच्या मित्रांविरोधात मारहाणीची तक्रार दाखल केली. शर्मा हे एनआरआय आहेत. त्यांच्या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला व याचे आरोपपत्रही दाखल केले.मात्र जून २०१५मध्ये महानगर दंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणात शर्मा व सैफ यांना मध्यस्थासमोर तोडगा काढण्याची सूचना केली. त्यानुसार सैफ मध्यस्थासमोर हजर झाला. तेव्हा शर्मा हे हजर झाले नाहीत. पण त्यानंतर त्यांनी या प्रकरणात मी तडजोड करण्यास तयार नाही, असे प्रतिज्ञापत्र मध्यस्थासमोर सादर केले. त्यामुळे आता याचा रीतसर खटला चालेल व सैफला तो निर्दोष असल्याचे सिद्ध करावे लागेल. शर्मा यांनी माझ्यासोबत असलेल्या महिलेची छेड काढल्याचा दावा सैफने केला आहे. (प्रतिनिधी)
सैफच्या अडचणी वाढल्या!
By admin | Updated: September 5, 2015 00:46 IST