Join us  

कशी आहे रोहित शेट्टीची Indian Police Force? वाचा, नव्या कोऱ्या वेब सीरिजचा रिव्ह्यू

By कोमल खांबे | Published: January 29, 2024 5:20 PM

Indian Police Force ही सीरिज धुमशान ॲक्शनसोबतच धमाल मनोरंजनही करते का? हे जाणून घेण्यासाठी आधी हा रिव्ह्यू वाचा. 

Release Date: January 19, 2024Language: हिंदी
Cast: शिल्पा शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, विवेक ओबेरॉय, शरद केळकर
Producer: रोहित शेट्टी, सुशवंत प्रकाशDirector: रोहित शेट्टी
Genre:
लोकमत रेटिंग्स

बॉलिवूड कलाकारांची दमदार फौज, मराठी कलाकारांचा ताफा आणि रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असलेली इंडियन पोलीस फोर्स (Indian Police Force) ही वेब सीरिज नुकतीच प्रदर्शित झाली. या सीरिजच्या नावाप्रमाणेच तीन दमदार ऑफिसर सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला येतात. एका मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याच्या शोधात असलेले हे ऑफिसर त्यांचं ध्येय गाठण्यात यशस्वी होतात का?, Indian Police Force ही सीरिज धुमशान ॲक्शनसोबतच धमाल मनोरंजनही करते का? हे जाणून घेण्यासाठी आधी हा रिव्ह्यू वाचा. 

Indian Police Force वेब सीरिजची सुरुवातच देशाची राजधानी दिल्लीतील बॉम्बस्फोटाने होते. एकामागोमाग एक ६ साखळी बॉम्बस्फोट राजधानी दिल्लीत घडवले जातात. आणि मग प्रवास सुरू होतो तो यामागचा मास्टरमाइंड शोधण्याचा. दिल्लीतील बॉम्बस्फोटांचं कनेक्शन गुजरातमधील साखळी स्फोटाशी निघतं. त्यानंतर हळूहळू गोष्टीतील रहस्य उलगडत जातात. दिल्लीनंतर जयपूरमध्येही सेम पॅटर्नमध्ये बॉम्बस्फोट घडतात. त्यानंतर मग ठिकाण ठरतं गोवा! या संपूर्ण प्रवासात दिल्ली पोलिसांचा मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा शोध सुरूच असतो. 

रोहित शेट्टीचं दिग्दर्शन असल्यामुळे ॲक्शन आणि स्टंटची जराही कमतरता नाही. काही वेळा प्रेक्षकांवर त्याचा माराच केला जातोय असंही वाटतं. पण, 'शेट्टी का स्टाईल' म्हणून ते आपण ते समजून घेऊ. मात्र, या सीरिजची कथा थोडी कमजोर वाटते. प्रेक्षकांची उत्सुकता वाढवण्यासाठी आणि कथा पुढे सरकवण्यासाठी अनेक ट्वीस्ट त्यात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण, एका पॉइंटनंतर Indian Police Force मधील या ट्विस्टमध्ये नाविन्य राहत नाही. पोलिसांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच दहशतवाद्याची लव्ह स्टोरी दाखवून थोडा भावनिक टच देण्याचा प्रयत्नही करण्यात आला आहे. एका सामान्य घराण्यात जन्मलेल्या मुलाचा दहशतवादी होण्याचा प्रवासही दाखविण्यात आला आहे. पण, कथा फुलवता न आल्यामुळे शेवटपर्यंत जोडून ठेवण्यात हा प्रयत्न अपुरा पडतो. 

विवेक ओबेरॉय या सीरिजमध्ये विक्रम बक्षी या सीनियर पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेत आहे. तर सिद्धार्थ मल्होत्राने कबीर मलिक ही दिल्ली पोलीस स्पेशल फोर्समधील अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. मयांक तांडवने या सीरिजमध्ये दहशतवाद्याची भूमिका केली आहे. संपूर्ण सीरिजमध्ये एखाद्या मॉडेलसारखी वावरणारी शिल्पा शेट्टी गुजरात एटीएस प्रमुख तारा शेट्टीच्या भूमिकेत आहे. दमदार ऑफिसरच्या भूमिकेत विवेक आणि सिद्धार्थ एकदम चोख बसले आहेत. पण, सुडौल शिल्पा शेट्टी या भूमिकेत थोडीशी खटकते. डॅशिंग पोलिसाच्या अंगी असलेला करारी बाणा, तिखट नजर शिल्पा शेट्टीच्या अभिनयात दिसत नाही. या सगळ्यात भाव खाऊन जातो तो म्हणजे राणा ही भूमिका साकारलेला निकितीन धीर. त्याला पाहून सीआयडीमधला दया आठवल्याशिवाय राहत नाही. रोहित शेट्टीची सीरिज असल्यामुळे बॉलिवूड कलाकारांच्या तगड्या फौजेच्या जोडीला मराठी कलाकारांचीही मांदियाळी पाहायला मिळते. वैदेही परशुरामी, सुचित्रा बांदेकर, मृणाल कुलकर्णी, आदिश वैद्य, शरद केळकर, शर्वरी लोहकरे या कलाकारांच्या एन्ट्री तुम्हाला अनपेक्षितपणाचा किंचितसा सुखद धक्का देऊन जातात. 

Indian Police Force वेब सीरिजचा हा पहिलाच सीझन आहे. या सीझनचे एकूण ७ एपिसोड प्रदर्शित करण्यात आले आहेत. सुमारे ४० मिनिटांचा एक एपिसोड आहे. ॲमेझॉन प्राइमवर ही वेब सीरिज १९ जानेवारीला प्रदर्शित करण्यात आली आहे. लवकरच या वेब सीरिजचा दुसरा सीझनही प्रदर्शित करण्यात येणार आहे. २६ जानेवारीच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या वेबसीरिजमधून देशभक्तीचे धडे दिले गेले आहेत. पण, भिडणाऱ्या कथेऐवजी उडणाऱ्या गाड्याच जास्त असल्यानं ती अपेक्षित परिणाम साधत नाही. अर्थात, रोहित शेट्टीचा 'सूर्यवंशी', 'सिंघम', 'सिंबा' हे सिनेमे आवडले असतील तर ही सीरिज तुम्ही एन्जॉय करू शकता.

टॅग्स :वेबसीरिजसिद्धार्थ मल्होत्राशिल्पा शेट्टीविवेक ऑबेरॉय