Join us  

Photograph movie review : अनोख्या प्रेमाचं, अनोखं विश्व दाखवणारा 'फोटोग्राफ'

By गीतांजली | Published: March 15, 2019 4:42 PM

सेल्फी आणि सोशल मीडियाच्या जमान्यात फोटोग्राफसारखा सिनेमा घेऊन येण्याचे धाडस दिग्दर्शकाने केली ही खरेच कौतुकास्पद बाब आहे.

Release Date: March 15, 2019Language: हिंदी
Cast: नवाजुद्दीन सिद्दीकी, सान्या मल्होत्रा आणि फारुक जाफर
Producer: रितेश बत्रा Director: रितेश बत्रा
Duration: 1 तास 50 मिनिटंGenre:
लोकमत रेटिंग्स

गीतांजली आंब्रे 

लंच बॉक्सच्या यशानंतर तब्बल सहा वर्षांनी रितेश बत्रा 'फोटोग्राफ' घेऊन आले. सेल्फी आणि सोशल मीडियाच्या जमान्यात फोटोग्राफसारखा सिनेमा घेऊन येण्याचे धाडस दिग्दर्शकाने केली ही खरेच कौतुकास्पद बाब आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी आणि सान्या मल्होत्रा यांची साधी सरळ आणि मनाला भिडणारी प्रेमकथा फोटोग्राफच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येऊन आले आहेत. 

फोटोग्राफची प्रेमकथा मुंबईत राहणाऱ्या दोन व्यक्ती आणि त्यांच्या अबोल-अव्यक्त प्रेमाची. रफिक (नवाजुद्दीन सिद्दीकी) गेटवे ऑफ इंडियाला फोटो काढणारा एक सामान्य फोटोग्राफर असतो. फोटो काढून तो कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असतो. मुंबईतल्या झोपडपट्टीमध्ये तो आपल्या मित्रांसोबत राहत असतो. गावाला राहणारी नवाजची आजी त्याच्या लग्नासाठी मागे लागलेली असते. एक दिवस रफीक आजीला मिलोनीचा फोटो पाठवून मुंबईत आपल्याला नुरी नावाची मुलगी भेटली असल्याचे सांगतो. आजी लगेच नुरीला भेटण्यासाठी मुंबईत येते. मिलोनी एक मध्यमवर्गीय गुजराती कुटुंबातील मुलगी असते जी सीएचा अभ्यास करत असते. रफिक नुरीला शोधतो आणि तिला आजीला भेटण्याची विनंती करतो. या सगळ्यासाठी मिलोनी सुद्धा होकार देते. नुरी एका सामान्य फोटोग्राफरमध्ये नक्की काय बघते?,  नुरी आणि रफीक खरेच एकमेकांच्या प्रेमात पडतात का ?, त्यांचे अव्यक्त प्रेम व्यक्त होते का या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला सिनेमा पाहिल्यावर मिळतील. 

नवाजाची एक वेगळी रोमांटिक छटा या सिनेमातून आपल्याला पाहायला मिळाली आहे. कमी संवाद असतानाही नवाजने आपल्या अभिनयाच्या जोरावर साकारलेला रफीक आपल्या मनावर आपली वेगळी छाप उमटवल्याशिवाय राहत नाही.  सान्याने साकारलेली अबोल मिलोनी खूप काही तिच्या डोळ्यातून सांगून जाते. सिनेमातल्या एका सीनमध्ये सान्याच्या मागच्या सीटवर नवाज बसलेला असतो आणि तो तिला बोलवण्याचा प्रयत्न करत असतो. मात्र तो अयशस्वी होतो. नवाजने या सीनमध्ये डोळ्यातून केलेला अभिनय दाद मिळवून जातो. फारुक जाफर यांनी साकारलेली आजीची भूमिका लक्षात राहणारी आहे. सिनेमात नवाज आणि सान्याचे संवाद कमी आहेत. मात्र त्या संवादांच्या दरम्यानची शांतता खूप काही सांगून जाणारी आहे. सिनेमातील काही ठिकाणी दिग्दर्शकाने मोहम्मद रफी आणि आरडी बर्मन यांची एव्हरग्रीन गाणी वापरुन सिनेमाला चार चाँद लावले आहेत. पण काही ठिकाणी सिनेमा अतिशय संथ गतीने पुढे जातो.  चौकटी बाहेरची प्रेमकथा तुम्हाला पाहायची असेल तर हा सिनेमा नक्की बघा.  

टॅग्स :फोटोग्राफसान्या मल्होत्रानवाझुद्दीन सिद्दीकी