Join us  

Commando 3, Review: भरकटलेला 'कमांडो 3'

By सुवर्णा जैन | Published: November 30, 2019 3:38 PM

जगभरात फोफावलेला दहशतवाद, धर्म परिवर्तन, देशावरील दहशतवादाचा धोका अशा विषयांची सरमिसळ करून बनवलेला नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे.

Release Date: November 29, 2019Language: हिंदी
Cast: विद्युत जामवाल, गुलशन देवैया, अदा शर्मा, अंगीरा धार, सुमित ठाकुर
Producer: विपुल शहाDirector: आदित्य दत्त
Duration: 2 तासGenre:
लोकमत रेटिंग्स

सुवर्णा जैन

देशभक्ती, दहशतवाद या विषयांवरील विविध सिनेमे रुपेरी पडद्यावर झळकले आहे. थिएटरमध्ये रसिकांच्या अंगावर रोमांच निर्माण करणारे तसंच नसांनसात देशप्रेमाची भावना जागृत करणारे सिनेमे रसिकांच्या काळजात घर करून गेले आहेत. जगभरात फोफावलेला दहशतवाद, धर्म परिवर्तन, देशावरील दहशतवादाचा धोका अशा विषयांची सरमिसळ करून बनवलेला नवा सिनेमा रसिकांच्या भेटीला आला आहे. 'कमांडो' आणि 'कमांडो-२' सिनेमाच्या यशानंतर दिग्दर्शक आदित्य दत्त 'कमांडो-३' हा सिनेमा घेऊन आले आहेत. 

सिनेमाच्या सुरूवातीला बनावट पासपोर्ट बाळगल्याच्या संशयावरून तीन तरुणांना एटीएसकडून अटक करण्यात येते. या तिघांची कसून चौकशी केल्यानंतर एक धक्कादायक माहिती समोर येते. एक व्यक्ती तरूणांची माथी भडकवून त्यांच्या मनात दहशतवादाचं विष पेरत असल्याचा खुलासा चौकशीमधून होतो. मोठा दहशतवादी हल्ला होणार असल्याची धक्कादायक बाबही समोर येते. लंडनमधून या दहशतवादी हल्ल्याचा कट रचला जात असल्याचं उघड झाल्यानं भारतातील गुप्तचर यंत्रणा सतर्क होतात. 

या धक्कादायक माहितीनंतर दहशतवाद्यांचे मनसुबे उधळण्याची तयारी सुरू होते. या क्रूरकर्मा दहशतवाद्याच्या मुसक्या आवळण्याच्या मिशनसाठी करणसिंह डोंगरा (विद्युत जामवाल)ची निवड करण्यात येते. कमांडो करणसह या मिशनसाठी भावना रेड्डी (अदा शर्मा) हिचीही निवड करण्यात आली आहे. या करण आणि भावना यांना ब्रिटीश इंटिलिजन्स सदस्य मल्लिका सूद (अंगिरा धार) आणि अरमान अख्तर (सुमित ठाकूर) हे मदत करतात. दहशतवाद्यांचा म्होरक्या बराक अन्सारी (गुलशन देवैया) हा तरुणांचं ब्रेनवॉश करून त्यांच्या मनात दहशतवादाची बीजं रोवतो. याच गोष्टीचा आधार घेत त्याने भारतावर सगळ्यात मोठा दहशतवादी हल्ला करण्याची योजना आखली आहे. करण अर्थात कमांडो हेच मनसुबे उधळण्यासाठी स्वतःच्या जिवाची बाजी लावायला तयार होतो. यानंतर या दहशतवाद्याच्या मुसक्या आवळण्याचं मिशन सुरू होतं. कमांडो आणि त्याची टीम या दहशतवाद्यापर्यंत पोहोचते का?, क्रूरकर्मा दहशतवादी करणच्या हाती लागतो का? भारतावरील दहशतवादी हल्ला रोखण्यात कमांडो आणि त्याच्या टीमला यश येतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या 'कमांडो-३' अॅक्शनपटातून मिळतील. 

'कमांडो-३' सिनेमाचा पूर्वाध रसिकांना जागेवर खिळवून ठेवण्यात काहीसा यशस्वी ठरतो. मात्र उत्तरार्धात सिनेमा रटाळ होतो. खासकरून क्लायमॅक्स पाहून रसिकांची पुरती निराशाच होते. सिनेमाचा शेवट ज्या पद्धतीने करण्यात आला आहे तो पाहून रसिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण होतात. सिनेमात वारंवार देशप्रेमाच्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र कथानकासोबत या गोष्टी जात नसल्याने रसिक निराश होतात. दिग्दर्शकाने रसिकांना खूश करण्यासाठी दाखवलेले सीन तर्कसंगत वाटत नाहीत. नायकाला खलनायकापर्यंत पोहोचण्यासाठी फारशी मेहनत घ्यावी लागत नाही. सगळ्या गोष्टी नायकासाठी सहज साध्य होतात. त्यामुळे  कथेतील उत्कंठा, रोमांच कमी होतं आणि सिनेमाची कथा भरकटते. यांत काही थ्रील असतं तर नक्कीच सिनेमा अधिक चांगला बनला असता. 

अभिनेता विद्युत जामवालनं करण साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतल्याचं रुपेरी पडद्यावर दिसतं. त्याची दमदार अॅक्शन रसिकांना भावते. हे स्टंट्स विद्युतने स्वतःच केले आहेत. अदा शर्मानं 'कमांडो-२' प्रमाणे आपल्या हैद्राबादी डायलॉगनं तसंच काही स्टंट्सनी छाप पाडली. सिनेमाचा खलनायक मात्र खटकतो. बराकच्या भूमिकेत गुलशन देवैयानं जीव ओतण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र या भूमिकेत तो फिट बसत नाही. क्रूरकर्मा दहशतवादी दाखवण्याचा त्याने प्रयत्न केलाय खरा, मात्र ती रसिकांना ओव्हर अॅक्टिंग वाटल्याशिवाय राहत नाही. खलनायकाच्या म्हणजेच बराकच्या मनात भारतद्वेष का?, तो हल्ल्याचा कट रचण्याचे कारण काय? या गोष्टींचा सिनेमात उलगडाच होत नाही. सिनेमातील अॅक्शन दमदार आहेत. विशेष कौतुक करावं लागेल ते विद्युत जामवालचं. त्यामुळेच काही काळ रसिक खिळून राहतात. अॅक्शनप्रेमींना हा सिनेमा ट्रीट वाटेल. मात्र कथानकात थोडा दम असता आणि काही गोष्टी वगळल्या असत्या तर 'कमांडो-३' नक्कीच आणखी चांगला झाला असता असं राहून राहून वाटतं.