Join us  

चित्रपटसृष्टीत होणार ‘रिले सिंगिंग’चा रेकॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 5:57 AM

लहाने यांच्या कारकिर्दीला सलाम करत, त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा ‘डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन’ हा सिनेमा ६ आॅक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

मुंबई : डॉ. तात्याराव लहाने यांच्या कारकिर्दीला सलाम करत, त्यांच्या संघर्षात्मक जीवनावर दृष्टिक्षेप टाकणारा ‘डॉ. तात्या लहाने ... अंगार... पॉवर इज विदीन’ हा सिनेमा ६ आॅक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमासाठी ‘रिले सिंगिंग’चा विक्रम होणार आहे. या गाण्यात राज्यातून ३२४ गायक सहभागी होतील व त्याची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे.या विक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या सिनेमाचे ‘लोकमत’ माध्यम प्रायोजक आहे. नवी मुंबईतील सिडको एक्झिबिशन सेंटरच्या आॅडिटोरियममध्ये १६ आॅगस्ट रोजी ‘रिले सिंगिंग’पार पडणार आहे. या सिनेमात नामवंत कलाकारांचा कसदार अभिनय आणि डॉ. लहाने यांच्या आयुष्याचा आढावा, हा सिनेमा प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. सिनेमाचे दिग्दर्शन विराग मधुमालती वानखडे यांनी केले असून, विराग मधुमालती एंटरटेन्मेंटने निर्मिती केली आहे. बहुचर्चित ‘रिले सिंगिंग’साठी महाराष्ट्रातील कानाकोपºयातून ३२४ गायकांची निवड करण्यात आली आहे. यात ७ ते ७० वर्षांपर्यंतच्या गायकांचा समावेश आहे. त्याचबरोबर, कोल्हापूरचे आमदार सुजित मिंचेकरदेखील गायकांमध्ये आहेत. ‘काळोखाला भेदून टाकू...जीवनाला उजळून टाकू!’ विराग यांनी लिहिलेले १०८ शब्दांचे हे गाणे तब्बल ३२४ गायक गाणार आहेत. सलग ३ वेळा सूर, ताल आणि लय यांची सुसूत्रता ठेवत, ‘एक शब्द एक गायक’ या पद्धतीने हे गाणे सादर होईल. रिले सिंगिंगसाठी संपूर्ण महाराष्ट्रात घेण्यात आलेल्या आॅडिशन्समध्ये मुंबई/ठाणे(१२५), पुणे (१८), नाशिक (१२), सांगली (७), धुळे (२०), जळगाव (३०), जालना (६), अकोला (११), अमरावती (१७), नागपूर (११), वाशिम (१५), लातूर (१६), परळी (२), कोल्हापूर(८) सोलापूर (३) असे ३२४ उत्तम गायक या उपक्रमात सहभागी झाले आहेत. अभिनेता मकरंद अनासपुरे आणि अलका कुबल यांच्यासोबत सिनेमात निशिगंधा वाड, भारत गणेशपुरे, रमेश देव यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाची कथा-पटकथा- संवाद विराग यांनी स्वत: लिहिले असून, सिनेमाचे संगीत ‘एक हिंदुस्थानी’ या संगीतकाराने केले आहे. डॉ. लहाने यांच्यासारख्या व्यक्तीचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, ‘एक हिंदुस्थानीने’ प्रसिद्धीपासून लांब राहणे पसंत केले आहे.