Join us  

रमेश भाटकर यांचे वय ऐकून तुम्हाला देखील बसेल आश्चर्याचा धक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2018 3:18 PM

कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी रमेश भाटकर यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यांनी माहेरची साडी, सवत माझी लाडकी असे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत.

रमेश भाटकर हे गेल्या कित्येक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. कमांडर आणि हॅलो इन्स्पेक्टर या मालिकांनी त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळवून दिली आहे. त्यांनी माहेरची साडी, सवत माझी लाडकी असे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. त्यांचा आज वाढदिवस असून त्यांनी वयाची ६९ वर्षं पूर्ण केली आहे. त्यांनी सत्तराव्या वर्षांत पदार्पण केले असले तरी अजूनही त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांचे वय दिसून येत नाही. आजही त्यांना पाहिल्यानंतर त्यांचे वय पन्नाशीच्या आसपास असल्याचे जाणवते.

रमेश भाटकर हे प्रसिद्ध गायक संगीतकार वासूदेव भाटकर यांचे सुपुत्र आहेत. त्यांचा जन्म ३ ऑगस्ट १९४९ ला झाला. त्यांना अजून दोन भावंडं असून त्यांचे बालपण मुंबईत गेले आहे. कॉलेज जीवनात ते स्विमिंग चॅम्पियन होते. तसेच खो खो या खेळात देखील ते पारंगत होते. रमेश भाटकर यांनी अनेक चित्रपट, मालिकांमध्ये काम केले असले तरी रंगभूमी हे त्यांचे पहिले प्रेम आहे. त्यांनी रंगभूमीवरूनच त्यांच्या कारकिर्दीला सुरुवात केली. अश्रूंची झाली फूले हे त्यांचे नाटक तर चांगलेच गाजले होते. तसेच त्यांची केव्हा तरी पहाटे, अखेर तू येशीलच, राहू केतू, मुक्ता यांसारखी अनेक नाटकं गाजली आहेत. १९७७ ला चांदोबा चांदोबा भागलास का या चित्रपटाद्वारे त्यांनी त्यांच्या मराठी चित्रपटसृष्टीतील कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी अष्टविनायक, दुनिया करी सलाम, आपली माणसं यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले. त्यांनी ९० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले असून अनेक हिंदी चित्रपटांमध्ये देखील ते महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.

कमांडर, हॅलो इन्स्पेक्टर, दामिनी, बंदिनी, युगंधरा या कार्यक्रमांनी त्यांना छोट्या पडद्यावरही प्रसिद्धी मिळवून दिली. ते नुकतेच माझे पती सौभाग्यवती या मालिकेत देखील झळकले होते. 

रमेश भाटकर यांच्या पत्नी मृदूला भाटकर या हायकोर्टाच्या न्यायाधीश असून त्यांना एक मुलगा आहे. हर्षवर्धन असे त्यांच्या मुलाचे नाव असून २०१३ मध्ये त्याचे लग्न झाले आहे. 

टॅग्स :रमेश भाटकर