Join us  

'रमा माधव' पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला

By admin | Published: July 28, 2014 3:57 PM

रमा माधव यांची प्रेमकथा आपल्या भेटीला रुपेरी पडद्यावर येत असून 'स्वामी' मालिकेत रमा साकारणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

ऑनलाइन टीम

मुंबई, दि. २८ - बदलत्या काळानुसार प्रेमाचे स्वरुप बदलले तरी मूळ भावना तीच असते. इतिहासातील अनेक प्रेमकथा आपल्याला माहीत आहेत, अशीच एक अजरामर प्रेमकथा आपल्या भेटीला रुपेरी पडद्यावर येत आहे, ती कथा आहे 'रमा माधव' यांची... विशेष म्हणजे 'स्वामी' मालिकेत रमा साकारणारी अभिनेत्री मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून या चित्रपटात त्यांची एक महत्वाची भूमिकाही आहे. 'स्वामी' मालिकेत माधवरावांची भूमिका करणारे रवींद्र मंकणीही या चित्रपटात असून ते या चित्रपटात नानासाहेब पेशव्यांच्या भूमिकेत दिसतील.
प्रेक्षकांना काहीतरी नवीन नवीन देण्याच्या उद्देशाने मृणाल कुलकर्णी यांनी या चित्रपटात नवे चेहरे आणले असून पर्ण पेठे व आलोक राजवाडे ही नवोदित जोडी 'रमा माधव' म्हणून आपल्यासमोर येणार आहे. छोट्या रमेची भूमिका श्रुती कार्लेकर हिने सहज, सुंदररित्या साकारली आहे.
त्याशिवाय आपल्या पराक्रमाने अटकेपार झेंडा रोवणा-या राघोबादादांच्या भूमिकेत प्रसाद ओक असून कुशाग्र बुद्धी व सौंदर्याची देणगी असणा-या आनंदीबाई (राघोबादादांची पत्नी) म्हणून सोनाली कुलकर्णी दिसणार आहे. 
चित्रपटाची कथा मृणाल कुलकर्णींची असून पटकथा मनस्विनी लता रविंद्र हिचे आहेत, तर संवादांची जबाबदारी दिग्पाल लांजेकर व मनस्विनी लता रविंद यांची आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने दिवंगत गीतकार सुधीर मोघे यांच्या गीतरचना व संगीतकार आनंद मोडक यांच्या सुरेल संगीताचा रसिकांना आस्वाद घेता येणार आहे. तसेच हिंदीतील ख्यातनाम नृत्यदिग्दर्शिका सरोज खान यांनी अभिनेत्री अदिती राव हैदरी हिच्यावर कोरिओग्राफ केलेला मुजरा, हेही या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य आहे.
ऐतिहासिक कथानक, विविधरंगी कथानक, अनुभवी स्टारकास्ट, भव्य सेटअप आणि मृणाल कुलकर्णीचे दिग्दर्शन असा मिलाफ असलेला,  'रमा माधव' यांच्या सहजीवनाची, प्रेमाची अजरामर कथा सांगणारा हा चित्रपट येत्या ८ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे.