बुधिया सिंग या मुलाने केवळ सात तासांत ६५ किलोमीटर अंतर धावत कापले होते. या गोष्टीची लिम्का बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंदणीदेखील झाली होती. यामुळे बुधिया सिंग हे नाव मीडियातही चर्चिले गेले होते. पण गेल्या काही वर्षांपासून बुधिया लाइमलाइटपासून दूर आहे. त्याने गेल्या कित्येक वर्षांत कोणतीही स्पर्धा जिंकलेली नाही. पण लवकरच त्याच्या आयुष्यावरती ‘बुधिया सिंग - बॉर्न टू रन’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने बुधियाने ‘सीएनएक्स’सोबत मारलेल्या गप्पा...बुधिया, तू खूप चांगला रनर आहे हे तुझ्या कोचने कसे ओळखले होते?-माझी मोठी बहीण जुडो शिकण्यासाठी जात होती. तिच्यासोबत मीही जुडो शिकायला सुरुवात केली. त्या वेळी एकदा क्लास सुटल्यानंतर काही मुलांसोबत माझी बाचाबाची झाली होती. यावरून मला माझे शिक्षक बिरांची दास यांनी मला मैदानाला फेरे मारण्याची शिक्षा दिली होती. मला शिक्षा देऊन ते विसरून गेले. ते परत आले, तेव्हा चार-पाच तास झाले होते. तरीही मी धावतच होतो. घाबरून त्यांनी मला डॉक्टरांकडे नेले होते, पण डॉक्टरांनी तपासल्यावर मी पूर्णपणे व्यवस्थित होतो. माझा बीपीदेखील नॉर्मल होता. त्याच वेळी मी इतरांपेक्षा वेगळा आहे हे माझ्या कोचने ओळखले आणि त्यानंतर माझी कोचिंग सुरू झाली. सुरुवातीला भुवनेश्वर ते पुरी हे अंतर मी धावलो, तेव्हा माझे पाय खूपच दुखले होते. पण कालांतराने मला हे अंतर खूपच कमी वाटू लागले.बालवयात तुला धावण्यात अनेक पुरस्कार मिळाले. पण तुला पुढील काळात तितके यश का मिळाले नाही?-मी लहान असताना बिरांची दास यांनी माझ्यावर खूप मेहनत घेतली. त्यांच्या मृत्यूनंतर मला शिकवणारे असे कोणीच उरले नाही. आज माझे सर माझ्यासोबत असते तर मी नक्कीच चांगले यश मिळवले असते असे मला वाटते. २00७ पासून मी एका स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये आहे. या ह़ॉस्टेलमध्ये कोणत्याच सुविधा नाहीत. ३0-३२ जणांना मिळून केवळ तीन कोच आहेत. त्याच्यामुळे कोणाकडेही वैयक्तिक लक्ष दिले जात नाही. तसेच कोणीही प्रोत्साहन देत नाही. माझ्या एका मित्राचेच उदाहरण देतो. माझ्याइतकाच तो जलद धावतो. दरम्यानच्या काळात त्याच्या पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला धावता येत नव्हते. अशा वेळी त्याला मानसिक आधार देण्याऐवजी, तू कधी धावूच शकत नाही, असे त्याला हॉस्टेलमधील मॅडमने सांगितले होते. पण आम्ही मुलांनी सगळ्यांनी मिळून त्याला समजावले, सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करायला सांगितले आणि तो पुन्हा तितकाच चांगला धावायला लागला आहे. मीदेखील माझ्याकडून जितकी मेहनत करता येईल, तितकी करतो. रोज सकाळी चारला उठून दोन तास पळतो. त्यानंतर शाळेत जातो. शाळेतून १0.३0ला आल्यानंतर पुन्हा १0.३0 ते चार इतका वेळ पुन्हा धावतो. तुझ्या घरची आर्थिक परिस्थिती कशी आहे?-मला वडील नाहीत. माझी आई नोकरी करून आमचे घर चालवते. मला तीन मोठ्या बहिणी आहेत. त्यांच्या शिक्षणाचा खर्च आईला करावा लागतो. तसेच आम्ही भाड्याच्या घरात राहतो. त्याचे भाडे आईच्या पगारातून ती भरते. या सगळ्या गोष्टी सांभाळणे माझ्या आईसाठी खूप कठीण जाते. मी हॉस्टेलमध्ये राहत असल्याने माझ्या शिक्षणाचा खर्च काहीही नाही. पण मला तिथे असताना नेहमीच आई घर कशी चालवते याची चिंता लागलेली असते. पूर्वी मला शनिवारी-रविवारी कुटुंबीयांना घरी जाऊन भेटण्याची परवानगी होती. पण आता हॉस्टेलने केवळ दुर्गापूजा आणि उन्हाळ्याच्या सुटीतच कुटुंबीयांना भेटण्याची परवानगी दिली. तू ६५ किमी अंतर पार केले होते, तू आजही इतका धावू शकतो असे तुला वाटते का?-सध्या मी १४ वर्षांचा आहे. माझे हे वय शरीर विकसित व्हायचे आहे. त्यामुळे काही महिने तरी मी धावू नये असा मला डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे. सध्या मी हॉस्टेलही सोडलेले आहे. तिथे पुन्हा जाण्याची माझी इच्छादेखील नाहीये. कारण मी तिथे राहून माझे स्वप्न पूर्ण करू शकत नाही याची मला खात्री आहे. पण मी आजही तितकाच धावू शकतो हा मला विश्वास आहे. मला आॅलिम्पिकमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छा आहे. माझ्या आयुष्यावर बुधिया सिंग - बॉर्न टू रन हा चित्रपट बनवला जाणार आहे. या चित्रपटानंतर तरी माझे आॅलिम्पिकचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कोणी तरी पुढे यावे, अशी माझी इच्छा आहे. कारण मला चांगला कोच मिळाल्याशिवाय मला हे यश मिळू शकणार नाही.
- prajakta.chitnis@lokmat.com