Join us  

आता खंडेरायांचा जागर होणार हिंदीत

By admin | Published: June 07, 2017 9:11 AM

जय मल्हार ही मालिका हिंदीमध्ये बघायला मिळणार आहे

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 7- संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या खंडेरायांवर आधारित असलेल्या  "जय मल्हार" या मालिकेला मराठी प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं. मराठीमध्ये प्रेक्षकांची मनं जिंकणारी ही मालिका आता हिंदीमध्ये बघायला मिळणार आहे. "जय मल्हार" मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला होता. पण आता ही मालिका हिंदी भाषेत डब केली जाणार आहे. पुढच्या काही दिवसात झी हिंदी चॅनेलवर ही मालिके टेलिकास्ट होणार असल्याची माहिती मिळते आहे. हिंदीत डब होणारी जय मल्हार ही पहिलीच पौराणिक मराठी मालिका असेल. 
 
"जय मल्हार"च्या तामिळ भाषेतल्या व्हर्जनलाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे. खंडेराय, म्हाळसा, बानू यांच्या भूमिकांना हिंदीत आवाज देण्यासाठी व्हॉइस आर्टिस्ट्स नेमण्यात आले असल्याचं कळतं आहे. दिग्दर्शक-निर्माते महेश कोठारे यांनी या मालिकेची निर्मिती केली आहे. "माझी ही कलाकृती पहिल्यांदाच हिंदीसाठी डब होत असल्याचा मला अभिमान वाटत असल्याचं मत महेश कोठारे यांनी व्यक्त केलं आहे. 
 
या मालिकेची निर्मिती एखाद्या हिंदी मालिकेप्रमाणेच करण्यात आली होती. मराठीतली ही भव्य मालिका आता देशभर पोहोचणार आहे. निर्मात्यांनी मालिका संकलन करतानाच्या सगळ्या अनमिक्स मास्टर टेप्स चॅनेलकडे सूपुर्द केल्या आहेत. त्यामुळे येत्या काळात आणखी काही भाषांमध्येही याच्या डब व्हर्जन्स निघण्याची शक्यता आहे.
 
प्रेक्षकांचे उदंड प्रेम मिळालेली ही मालिका मे २०१४ ला प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. तसंच टीआरपीच्या शर्यतीतसुद्धा
पुढे होती. तब्बल तीन वर्षानंतर मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला. राजा आणि त्याच्या दोन राण्या यांची कथा रंगल्यामुळे या मालिकेची लोकप्रियता वाढत गेली होती आणि अनपेक्षितरित्या ही मालिका तीन वर्षे रंगली. देवदत्त नागे, सुरभी हांडे आणि इशा कासकर या तीनही कलाकारांना या मालिकेने राज्याच्या कानाकोपऱ्यातून उदंड प्रेम मिळवून दिलं आहे. आधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून व्हीएफएक्स पद्धतीने या कथानकाला अधिक भव्यता मिळवून देणारी ही मराठीतील पहिली मालिका ठरली होती.