Join us  

मुकेशभैयांची रागदारी

By admin | Published: August 29, 2016 4:30 AM

मुकेशचंद्र माथुर हे नाव आजच्या पिढीला फारसे परिचित नसेल. परंतु हे नाव आहे गेल्या जमान्यातले पार्श्वगायक मुकेश यांचे. मुकेश यांना तसे फार प्रदीर्घ आयुष्य लाभले नाही

मुकेशचंद्र माथुर हे नाव आजच्या पिढीला फारसे परिचित नसेल. परंतु हे नाव आहे गेल्या जमान्यातले पार्श्वगायक मुकेश यांचे. मुकेश यांना तसे फार प्रदीर्घ आयुष्य लाभले नाही. वयाच्या अवघ्या ५३व्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. त्यांच्या नावावर ९९३ गाणी नोंदलेली आहेत. इतर गायकांशी तुलना केली तर ही संख्या फार मोठी खचितच नाही. पण एकूण गाण्यांचा दर्जा पाहिला तर मुकेश यांची गाणी लक्षात राहण्याजोगी निश्चितच आहेत यात शंका नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या ‘रंगस्वर’तर्फे ‘रागदारी आणि मुकेशभैया’ या कार्यक्रमाला श्रोत्यांचा मिळालेला जोरदार प्रतिसाद पाहून मुकेश यांच्या लोकप्रियतेची पुन्हा एकदा खातरी पटली.मुकेश हे तसे रागदारीत तरबेज असलेले गायक म्हणून प्रसिद्ध नव्हते. जसे मन्ना डे होते तसे. परंतु आपल्या गाण्यात भावना ओतून ते गात असत. आणि त्यामुळे त्यांचे गाणे चित्ताचा ठाव घेत असे. ‘रणजीत स्टुडिओ’च्या एका खोलीत ते असेच गात बसलेले असताना एक देखणा तरुण तिथे आला आणि म्हणाला, ‘‘किती भावनाप्रधान आहे तुझे गायन; मला खूप आवडले.’’ त्या तरुणाचे नाव होते राज कपूर. मुकेश आणि राज कपूर यांचे समीकरण पुढे आयुष्यभर जुळले.मुकेश यांचा आवाज मंद्र सप्तकात छान गुंजाख करणारा होता. त्यामुळे सुरुवातीला ते कुंदनलाल सैगल यांचे अनुकरण करीत. ‘पहली नजर’ या चित्रपटात ते प्रथम गायले ते गीत म्हणजे ‘दिल जलता है तो जलने दे..’ ते पूर्णपणे सैगल शैलीतले म्हणजे मंद्र सप्तकाचा वापर करणारे होते. त्यातला ‘दरबारी’ हा मंद्रप्रधान राग इथे दाखविण्यात आला. ‘कन्हैया’ चित्रपटातले ‘मुझे तुमसे कुछ भी न चाहिए’ हाही मंद्रप्रधान ‘दरबारी’च. ‘सारंग’ रागातले एक युगलगीत आहे. ‘नैनद्वार से मन में वो आके तन में आग लगाए’ त्यात मुकेशचा खर्ज आणि लताबार्इंचा तारसप्तक यांचे अनोखे मिश्रण संगीत दिग्दर्शक हंसराज बहल यांनी साधले आहे. त्यातले रागतत्त्व आणि सौंदर्य इथे दाखविण्यात आले.‘यमन’ रागात मुकेशच्या आवाजात काही चिरस्मरणीय गीते आहेत. ‘आँसू भरी हे ये जीवनकी राहे’, ‘सारंगा तेरी याद में’, ‘चंदनसा बदन’, ‘भुली हुअी यादों’ वगैरेची गोडी अवीट आहे. त्यापैकी ‘फिर न कीजे मेरी गुस्ताख निगाही’ हे द्वंद्वगीत ऐकविण्यात आले. इतर गाणी प्रत्यक्ष गायली गेली. मुकेशच्या आवाजात ‘पहाडी’ ही सुरेख लागत असे. ‘सावन का महिना’, ‘तुम मुझे भूल भी जाओ’, ‘बडे अरमान से रखा है’ ही गाणी ऐकवली गेली आणि त्यातला ‘पहाडी’ दाखविण्यात आला. आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगणारे ‘दुनिया बनानेवाले क्या तेरे मन में समायी’ हे गीत आणि त्यातल्या ‘भैरवी’ची लज्जत चाखत तसेच कानात साठवत श्रोते घराकडे परतले.