Join us  

शिष्यवृत्ती सिनेमाचे मोशन पोस्टर शिक्षकांच्या हस्ते रिलीज,या कलाकारांच्या असणार भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 11:15 AM

गावातील एका हुशार पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण घेण्याची अडचण असलेल्या विद्यार्थ्याला तो शिक्षक कशा प्रकारे मदत करतो. ही सगळी कथा म्हणजे शिष्यवृत्ती सिनेमा.

शिक्षक आणि विद्यार्थी यांचे नाते अतूट. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षकाचे अनन्यसाधारण महत्व असते. आपल्या शिक्षकाने दिलेली शिकवण घेऊन आपण आयुष्यभर जगत असतो. अशाच शिक्षक आणि विद्यार्थ्याच्या भावविश्वाची कथा सिनेमारुपात मांडण्याचा प्रयत्न ओ थ्री शॉपिंग निर्मित, साज इंटरनेटमेंट सहनिर्मित आणि अखिल देसाई दिग्दर्शित ‘शिष्यवृत्ती’ या मराठी सिनेमातून साकारण्यात आली आहे. शिक्षक दिनाचे औचित्य साधत या सिनेमाचे मोशन पोस्टर मुलुंड मधील कालिदास नाट्यगृहात शिक्षकांच्या हस्ते रिलीज करण्यात आले.

 

 

यावेळी शिष्यवृत्ती सिनेमातील दुष्यंत वाघ, अंशुमन विचारे, झील पाटील, रुद्र ढोरे, प्रशांत नागरे इ. कलाकार उपस्थित होते. दिग्दर्शक अखिल देसाई सांगतात की, आयुष्यात प्रगतीच्या वाटेवर आपल्याला शिक्षक हे असे गुरु भेटतात जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. असेच शिक्षक-विद्यार्थ्यांचे नाते मांडणारा “शिष्यवृत्ती” सिनेमाचे मोशन पोस्टर आज आम्ही रिलीज झाले. यात सिनेमाची पूर्ण गोष्ट जरी उलगडली गेली नसली तरी सिनेमाचा बाज प्रेक्षकांना कळू शकतो. शिवाय प्रत्येक शिक्षक आणि विद्यार्थी सिनेमात आपल्याला पाहू शकतो, हीच सिनेमाची विशेष बाब आहे. सिनेमामध्ये देखील अशाच एका शिक्षक आणि शिष्याची गोष्ट दाखवली आहे.

दुष्यंत वाघ आपल्या भूमिकेबद्दल सांगतो कि, या सिनेमात मी एका शिस्तप्रिय शिक्षकाची भूमिका साकारतोय. तो शिस्तप्रिय जरी असला तरी विद्यार्थ्यांना मारणं, ओरडणं त्याला मान्य नाही. गावातील एका हुशार पण आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने शिक्षण घेण्याची अडचण असलेल्या विद्यार्थ्याला तो शिक्षक कशा प्रकारे मदत करतो. ही सगळी कथा म्हणजे शिष्यवृत्ती सिनेमा.

या सिनेमामधून झिल पाटील हिचे मराठी सिनेसृष्टीत पदार्पण होत आहे. झील ही नात्याने दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील हिची भाची लागते. तसेच अनिकेत केळकर यांनी चक्क या सिनेमामध्ये ग्रे शेड असलेल्या शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या भुमिकेविषयी सांगताना अनिकेत सांगतो की, “माझी भूमिका अगदी खलनायकाची नाही पण कोणाचंच चांगलं झालेलं मला बघवत नसतं. त्यामुळे अशा शिक्षकाची भूमिका करताना मला खूप मज्जा आली.” तर अंशुमन विचारे हे विनोदी भूमिकेत दिसणार आहे. शिवाय सिनेमात कमलेश सावंत, दीपक भागवत, उदय सबनीस यांच्या देखील महत्वपूर्ण भूमिका आहेत. लवकरच सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे.