Join us  

या कारणामुळे हृषिकेश कोळीला मिळाले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2018 2:52 PM

हृषिकेशला मिळालेल्या या यशामागे त्याच्या एकांकिका ते नाटक या प्रवासाचा मोठा वाटा आहे. प्रेक्षकांची नस ओळखण्याचे कौशल्य त्याला या वेगळ्या प्रयोगांमधून मिळाले.

सध्या मराठीत मनोरंजन क्षेत्रात एकामागून एक नवे चित्रपट येत असताना, त्यात एक नाव आवर्जून विशेष उल्लेखाने घेतले जात आहे आणि ते म्हणजे लेखक हृषिकेश कोळीचे.

लेखकाचे नाव पोस्टरवर किंवा प्रसिद्धीत दुर्लक्षिले जाते त्याकाळात हृषिकेशच्या नावाला मिळालेले वलय कौतुकास्पद आहे.अलीकडचा यशस्वी लेखक ही त्याची ओळख, ती निर्माण होण्याला कारण म्हणजे त्याला प्रेक्षकांची अचूक नस कळते. नेमके प्रेक्षकांना काय सांगायचे, त्यांचे मनोरंजन करत कुठल्या शब्दांत ते त्यांच्यापर्यंत पोहचवायचे, हे व्यावसायिक तंत्र त्याला गवसले आहे. त्यासाठी चित्रपटाचा विषय आणि तो पाहणारा प्रेक्षक याचा व्यावसायिकतेसाठी लागणारा दांडगा अभ्यास ही हृषिकेश कोळीची जमेची बाजू. त्यामुळे ‘बॉईज’ सारख्या सुपरहिट चित्रपटानंतर एकाचवेळी समित कक्कड यांचा सोशिओ-पॉलिटीकल "बच्चन" असो किंवा मंटोच्या लिखाणावर आधारित "आश्चर्य-फ़क-इट"चे संवाद असो आणि अमेय खोपकर निर्मित "येरे येरे पैसा २" सारखा विनोदी चित्रपट असो, हृषिकेश कोळीने गंभीर ते विनोदी अशा वेगवेगळ्या शैलीत स्वत:चं वर्चस्व सिद्ध केलेलं आहे.

यंदा पाच ऑक्टोबरपासून "बॉईज २"ने सुरुवात करत तृप्ती भोईर यांचा "माझा अगडबम" आणि नंतर वर्षाच्या सुरुवातीला ४ जानेवारीला हेमंत ढोमे दिग्दर्शित "येरे येरे पैसा २" प्रदर्शनाच्या मार्गावर आहेत.    

हृषिकेशला मिळालेल्या या यशामागे त्याच्या एकांकिका ते नाटक या प्रवासाचा मोठा वाटा आहे. प्रेक्षकांची नस ओळखण्याचे कौशल्य त्याला या वेगळ्या प्रयोगांमधून मिळाले. एकांकिकेच्या वलयातून साहजिकच व्यावसायिक नाटकाकडेही तो वळला आणि मोहन वाघ यांच्या चंद्रलेखा या नावाजलेल्या संस्थेकडून पहिलं नाटक "एक तिकिट सिनेमाचं" रंगभूमीवर आलं. त्या पाठोपाठ "गिरगांव व्हाया दादर" या नाटकामुळे २०१२ सालचा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई तर्फ़े दिला जाणारा कै.मंदाकिनी गोगटे पुरस्कृत सर्वोत्कृष्ट नाटकाकाराचा पुरस्कार दिला गेला. कालांतराने "एक साथ नमस्ते" आणि "वीर दौडले सातच" असे पॉलिटीकल सटायर लिहून त्याने समीक्षकांचे लक्ष वेधून घेतले. तसेच अस्तित्व या संस्थेच्या "त्या दरम्यान" या लेखकांच्या उपक्रमासाठी जयवंत दळवी यांच्या पुरुष नाटकावर आधारित लिहिल्या गेलेल्या "वर खाली दोन पाय" या नाटकाने मराठी रंगभूमीला लेखन आणि दिग्दर्शनाला एका वेगळ्या वळणावर नेऊन ठेवले. 

एकांकिका आणि नाटकात मुशाफ़ीरी सुरू असतानाच चित्रपटांचे कथा/पटकथा/संवाद लेखन सुरू झाले आणि कॅरी ऑन मराठा ते बॉईज असा चढत्या आलेखाचा क्रम इथेही कायम राखला गेला आणि आजच्या घडीचा सगळ्यांत यशस्वी आणि लिखाणात त्याच ताकदीने सातत्य राखणारा लेखक म्हणून नावारुपाला आला.

प्रेक्षकांची आवड आणि निर्मात्यांची गरज यांचा व्यावसायिक सुवर्णमध्य गाठत हृषिकेश कोळीने कौतुकास्पद कामगिरी केलेली आहे. एकांकिका-नाटक-चित्रपट अशा तिन्ही माध्यमांत प्रयोग करत राहणारा आणि प्रयोग "यशस्वी" करणारा हा सिद्ध हस्त लेखक त्याच्या सातत्याने आणि नाविन्यपूर्ण लेखनशैलीने नजीकच्या काळात रुपेरी पडदाही गाजवणार हे त्याच्या आगामी चित्रपटांच्या यादीवरून दिसतेच आहे. त्यामुळे यंदाचंही आणि पुढलंही वर्ष हृषिकेश कोळीचं असेल हे नक्की...