Join us  

भद्रकाली प्रोडक्शनची सुरुवात करण्यासाठी मच्छिंद्र कांबळी यांना पत्नीचे दागिने टाकावे लागले होते गहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2018 5:05 PM

मच्छिंद्र कांबळी यांनी १९८२ला भद्रकाली प्रोडक्शनची स्थापना केली. हातात अजिबातच पैसे नसताना इतके मोठे प्रोडक्शन हाऊस उभे करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. पण यात त्यांना त्यांच्या पत्नीची साथ लाभली. 

भद्रकाली प्रोडक्शन हे आज मराठी नाट्यसृष्टीतील एक महत्त्वाचे प्रोडक्शन हाऊस मानले जाते. दिवंगत अभिनते मच्छिंद्र कांबळी यांनी भद्रकालीची सुरुवात केली आणि आज त्यांच्यानंतर त्यांचा मुलगा प्रसाद समर्थपणे त्यांचा वारसा पुढे चालवत आहे. भद्रकालीने आतापर्यंत ५५ नाट्यकृती प्रेक्षकांच्या भेटीस आणल्या आहेत. भद्रकाली प्रोडक्शनला आज म्हणजेच २७ जुलैला ३६ वर्षं पूर्ण झाले. मच्छिंद्र कांबळी यांनी १९८२ला भद्रकाली प्रोडक्शनची स्थापना केली. हातात अजिबातच पैसे नसताना इतके मोठे प्रोडक्शन हाऊस उभे करणे त्यांच्यासाठी सोपे नव्हते. पण यात त्यांना त्यांच्या पत्नीची साथ लाभली. 

भद्रकाली प्रोडक्शनच्या सुरुवातीपासूनच्या प्रवासाविषयी प्रसाद कांबळी सांगतात, वस्त्रहरण या नाटकात बाबा मुख्य भूमिका साकारत होते. एवढेच नव्हे तर या नाटकाचे मॅनेजर देखील तेच होते. पण या नाटकाचे ६०० प्रयोग झाल्यानंतर या नाटकातून त्यांना अचानक काढण्यात आले. आता काय करायचे त्यांना काहीच सुचत नव्हते. त्याच दरम्यान त्यांच्या एका चित्रपटाचे चित्रीकरण मालवण मध्ये सुरू होते. त्यावेळी त्यांच्या चित्रपटात मोहन गोखले त्यांच्यासोबत काम करत होते. मोहन गोखले यांनी त्यांना नाटकांची निर्मिती करण्यासाठी प्रोडक्शन हाऊस काढण्याचे सुचवले. पण त्यावेळी त्यांच्याकडे पैसा नसल्याने त्यांच्यासाठी हे शक्य नव्हते. त्यानंतर काहीच दिवसांत सतीश दुभाषी यांनीदेखील बाबांना हीच गोष्ट सांगितली. बाबा सतीश दुभाषी यांना खूपच मानत असत. त्यामुळे त्यांच्या सांगण्यावरून त्यांनी हे पाऊल उचलायचे ठरवले. मला आजही आठवते मी आठ वर्षांचा होतो. मे महिना सुरू होता... बाबांनी एका चिठ्ठीवर भद्रकाली आणि एका चिठ्ठीवर साईनाथ असे लिहिले आणि त्यातील एक चिठ्ठी मला उचलायला सांगितली आणि मी भद्रकाली ही चिठ्ठी काढल्यावर भद्रकाली असे प्रोडक्शन हाऊसचे नाव ठरले. भद्रकाली ही आमची कुलदैवता आहे तर बाबांची साईंवर खूप भक्ती होती. त्यामुळे त्यांनी अशी दोन नावे ठरवली होती. प्रोडक्शन हाऊस काढायचे असे ठरले असले तरी त्यासाठी पैसे नव्हते. पण माझी आई म्हणजेच श्रीमती कविता मच्छिंद्र कांबळी त्यांच्या पाठिशी उभी राहिली. तिने तिचे दागिने गहाण टाकून बाबांना पैसे दिले आणि त्यामुळेच २७ जुलैला चाकरमानी या आमच्या पहिल्या नाटकाचा प्रयोग झाला. दिवसेंदिवस भद्रकालीची एकाहून एक सरस नाटकं रसिकांच्या भेटीस आली. बाबांचे निधन झाले त्यानंतर भद्रकालीची जबाबदारी माझ्यावर आली. मी या क्षेत्रात कधी येईन असा मी विचार देखील केला नव्हता. भैय्या हात पाय पसरी या नाटकाचे मी केवळ १०० प्रयोग करेन असे मी ठरवले होते. या क्षेत्रात मला रसच नसल्याने इथेच थांबायचे असा मी निर्णय घेतला होता. पण बाबांनी लावलेल्या रोपट्याचा सांभाळ करण्याचे बहुधा विधीलिखित लिहिले होते आणि त्यामुळेच त्यांचेच स्वप्न आज मी पूर्ण करत आहे.