Join us  

'हे खूप भीतीदायक...काल हसणारा माणूस आज जग सोडून जातो', रिंकू राजगुरूचं चाहत्यांना कळकळीचं आवाहन

By तेजल गावडे | Published: May 01, 2021 5:37 PM

अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

देशभरात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. तसेच कोरोनाबाधितांच्या संख्येमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाउन जाहिर करण्यात आले आहे. कोरोनाचे संकट पाहून सध्या शूटिंगदेखील बंद आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या चाहत्यांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री रिंकू राजगुरूने सांगितले की, सध्या खूप विचित्र परिस्थिती आहे. काल हसणारा माणूस आज जग सोडून जातो. ज्याला आपण परवा भेटलो आहे आणि अचानक रात्री फोन येतो की तो आपल्यात राहिला नाही. हे खूप भयानक आणि भीतीदायक आहे. जेव्हा माणून या गोष्टीचा अनुभव घेतो तेव्हाच त्याला कळतं. इतकी भयानक परिस्थिती असतानाही काही लोक वेड्यासारखी वागत आहेत.  कोरोना वगैरे काही नसतं, मास्क लावणार नाही, असे म्हणणाऱ्या लोकांना इतकेच सांगायचे आहे की असे बेजाबदार वागू नका. 

ती पुढे म्हणाली की, मी स्वतः हा अनुभव घेतला आहे. आमच्या इथले काका वारले. माझ्या खूप जवळच्या लोकांना कोरोनामुळे जाताना पाहिले आहे. काही जण सध्या हॉस्पिटलमध्ये आहेत. त्याच्यामुळे या व्हायरसकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. त्यामुळे मास्क घालणे, हात सतत सॅनिटाइज करणे, स्वतःची काळजी घेणे हे खूप महत्त्वाचे आहे. दुसरे आपले काळजी घेणार नाहीत. त्यामुळे इतके जरी केले तरी खूप आहे. विनाकारण घराबाहेर पडले नाही पाहिजे. 

१८ ते ४४ वयोगटातील व्यक्तींनाही आता कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. त्यामुळे ती सगळ्यांनी लस घ्यावी. लस घेऊन या भ्रमात राहू नये की लस घेतली तर आता आपल्याला कोरोना होणार नाही. आताची परिस्थिती खूप बिकट आहे. हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही. ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे. त्यामुळे हा अजिबात चेष्टेचा विषय नाही आहे. त्यामुळे सर्वांनी खूप काळजी घ्या, अशी रिंकूने सर्वांना कळकळीची विनंती केली आहे.

रिंकू राजगुरू लॉकडाउनमुळे सध्या अकलूजमध्ये तिच्या घरीच आहे. त्यामुळे फिटनेससाठी ती घरीच वर्कआउट करते. पुस्तक वाचते. वेबसीरिज किंवा नवीन चित्रपट पाहते आणि घरातल्यांसोबत वेळ व्यतित करते आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूकोरोना वायरस बातम्या