Join us  

‘मातृभाषेत मी जास्त कम्फर्टेबल!’-अभिनेता सयाजी शिंदे

By अबोली कुलकर्णी | Published: September 13, 2018 5:46 PM

अभिनेते सयाजी शिंदे यांनी कधी खलनायक म्हणून तर कधी महत्त्वाच्या भूमिका गाजवल्या. कायम वेगवेगळया भूमिकांचा शोध घेणारे अष्टपैलू अभिनेते सयाजी शिंदे हे लवकरच ‘हंसा-एक संयोग’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

मराठी, हिंदी आणि साऊथ इंडस्ट्री गाजवणारा हरहुन्नरी कलाकार म्हणजे अभिनेता सयाजी शिंदे. कधी खलनायक म्हणून तर कधी महत्त्वाच्या भूमिका त्यांनी गाजवल्या. कायम वेगवेगळया भूमिकांचा शोध घेणारे अष्टपैलू अभिनेते सयाजी शिंदे हे लवकरच ‘हंसा-एक संयोग’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या आत्तापर्यंतच्या कारकिर्दीविषयी मारलेल्या गप्पा...

* तुम्ही ‘हंसा-एक संयोग’ या आगामी चित्रपटात दिसणार आहात. काय सांगाल तुमच्या भूमिकेविषयी?- मोठया राजघराण्यातील व्यक्तीचा हा प्रवास या चित्रपटात रेखाटण्यात आला आहे. ज्यावेळी त्यांच्या घरात नपुंसक मुलगा जन्माला येतो तेव्हा परिस्थिती किती बदलते. त्यांची समाजातील प्रतिष्ठा, मानमरातब लक्षात घेता त्याचा आजोबा, सासरे, समाज, माणसं यांच्यासोबत होणारा सामना यात अतिशय सुंदरपणे रेखाटण्यात आला आहे. वडील, बायको, मुलगा यांची बाजू खरी वाटते पण, या सगळयांवर काही उपाय आहे का? त्याची मनाची अवस्था काय होते? त्याला किती संघर्ष करावा लागतो या सर्वांवर प्रकाश टाकणारा हा चित्रपट आहे, असे म्हणता येईल. 

 * तुमच्याकडे जेव्हा चित्रपटाचा प्रस्ताव आला तेव्हा तुमची रिअ‍ॅक्शन काय होती?- मी यापूर्वी ‘झूलवा’ या नाटकांत काम केले होते. त्यामुळे हा विषय मला चांगल्याप्रकारे माहित आहे. माझ्याकडे जेव्हा प्रस्ताव आला तेव्हा मी सर्वप्रथम निर्माता आणि दिग्दर्शक यांचे अभिनंदन केले. आत्तापर्यंत अशा विषयावर चित्रपट बनवावा असे कुणाला वाटले नव्हते. ते तुम्ही केलंत त्यामुळे तुमचे कौतुकच आहे. हा चित्रपट करताना काहीतरी वेगळया कथानकावर आपण काम करत आहोत, याची जाणीव झाली. 

 * या चित्रपटाच्या माध्यमातून कोणता सामाजिक संदेश देण्यात आला आहे?- चित्रपटातून असा कुठलाही संदेश देण्यात आलेला नाहीये. आम्ही केवळ परिस्थिती मांडली आहे, ज्यांना जसे पाहिजे तसा त्यांनी अर्थ लावावा. प्रत्येकाची विचार करण्याची पद्धत वेगळी असते त्यामुळे प्रेक्षकांनी स्वत: त्याचा अर्थ समजून घ्यावा.

 * तृतीयपंथीयांकडे बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन केव्हा बदलेल?- असं काही नाहीये. खरंतर ही खूप हळूवार प्रक्रिया आहे. खूप वर्ष जातील. मानवी आयुष्यात एवढे प्रश्न आहेत की, मनुष्य जातच मनुष्याचा प्रॉब्लेम होऊन बसलीय. जरी हा प्रश्न संपला तरीही एक वेगळाच प्रश्न मनुष्यासमोर येऊन उभा ठाकेल. त्यामुळे पूर्णपणे असं आपल्याला म्हणता येणार नाही की, समाजाचा दृष्टीकोन यावर्षी किंवा यावेळेला बदलेल असे.

* तुम्ही एकांकिकांपासून करिअरला सुरूवात केली होती. ‘शूल’ हा हिंदी चित्रपट आणि ‘भारती’ हा तमिळ चित्रपट हे तुमच्या करिअरचे टर्निंग पॉर्इंट ठरले असे म्हणता येईल. कसे वाटतेय आता मागे वळून बघताना?- मला असं वाटतं की, मी तेव्हा स्वत:च्या अटींवर काम करत होतो. मी लवकर कुठलाही प्रोजेक्ट साईन के ला नाही. ५-६ वर्ष मी तो प्रोजेक्ट समजून घ्यायला लागायचा. त्यामुळे नक्कीच समाधान वाटतं इंडस्ट्रीत काम केल्याबद्दल. विचारपूर्वक कुठलाही प्रोजेक्ट मी स्विकारत असे. प्रेक्षकांसमोर जे सादर करीन ते उत्तमच हा माझा दृष्टीकोन असायचा.

 * तमिळ, कन्नडा, मराठी, हिंदी, तेलुगू या सर्व भाषांत तुम्ही काम केलंय. मग मराठी भाषा मातृभाषा म्हणून जास्त कम्फर्टेबल असता की कसे? - होय. मी मराठीत कम्फर्टेबल असतो. प्रत्येक कलाकार आपापल्या मातृभाषेतच स्वत:ला जास्त कम्फर्टेबल मानत असतो. माझाही अनुभव तसाच आहे.

 * तुम्ही काही चित्रपटांची निर्मितीही केली आहे. किती आव्हान वाटते एक निर्माता म्हणून?- खरंतर निर्माते खूप फसवले जातात. फसवणाऱ्या  लोकांकडूनच त्यांना स्वत:चा बचाव करण्याचे आव्हान असते. पैसा जिथे असतो तिथे हे सगळे प्रकार होणारच, हे साहजिकच आहे. कलाकारांच्या बरोबरीने निर्मात्याच्या कामाला जास्त महत्त्व असते.

 * सध्या इंडस्ट्रीत काम करत असताना एखादी खंत वाटते का? - मला असं वाटतं की, कलाकारांसाठी युनियन हवी. कारण, निर्मात्यांना मदत करण्याच्या नावाखाली त्यांना फसवले जाते. त्यामुळे मी साऊथमध्ये काम करत असताना मला हे खूप जाणवते की, निर्मात्यांनी एकत्र यावे. 

 * ‘संजू’ मध्ये तुम्ही बंडू दादांची भूमिका केली होती, काय सांगाल?- संजू हा चित्रपट बॉक्स आॅफिसवर हिट ठरला. यामागे संपूर्ण टीम, दिग्दर्शक, निर्माता यांची मेहनत आहे. त्यांचे खरंच कौतुक आणि अभिनंदन करावेसे वाटते. अशा कलाकृती व्हायला हव्यात, असे वाटते.

टॅग्स :मुलाखतमराठी