Join us  

भरत जाधवने त्याच्या वडिलांसाठी लिहिली भावुक पोस्ट, वाचून तुमचे डोळेदेखील पाणवतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 2:10 PM

भरतची ही भावुक पोस्ट वाचून त्याच्या फॅन्सच्या डोळ्यांत देखील पाणी येत आहे.

ठळक मुद्देकेवळ एका तासात ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून सतराशेहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे तर ३८ जणांनी ती शेअर केली आहे. १२० जणांनी या पोस्टवर आतापर्यंत कमेंट केले आहे.

भरत जाधवने त्याच्या वडिलांसाठी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे आणि या पोस्टसोबत त्यांचा फोटोदेखील शेअर केला आहे. त्याची ही भावुक पोस्ट वाचून त्याच्या फॅन्सच्या डोळ्यांत देखील पाणी येत आहे. केवळ एका तासात ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून सतराशेहून अधिक लोकांनी ही पोस्ट लाईक केली आहे तर ३८ जणांनी ती शेअर केली आहे. १२० जणांनी या पोस्टवर आतापर्यंत कमेंट केले आहे.

भरत जाधवने त्याच्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, एकदा आमच्या टॅक्सीत काही प्रवासी बसले होते... त्यांना नाटकाच्या प्रयोगाला जायला उशीर होत होता म्हणुन ते प्रवासा दरम्यान वडिलांशी हुज्जत घालत होते. अक्षरशः आई बहिणी वरून त्यांनी शिव्या दिल्या. पण वडील त्यांना एक अवाक्षरही न बोलता त्यांना नाट्यगृहावर सोडलं आणि शांतपणे निघून आले. रात्री घरी आल्या नंतर त्यांनी हा प्रसंग सांगितला. ते प्रवासी 'ऑल द बेस्ट' च्या प्रयोगाला चालले होते! आपल्या मुलाच्या नाटकासाठी लोकं गर्दी करतायत.  या एकाच गोष्टी साठी त्यांनी तो अपमान मुकाट सहन केला. खुप रडलो होतो त्या दिवशी. सुदैवाने तेव्हा मला १०० रुपये नाईट मिळत होती.  त्या दिवसापासून त्यांना टॅक्सी चालवणं आता बंद करा म्हणून सांगितलं. टॅक्सी चालवणं त्यांनी बंद केलं तरी ती टॅक्सी त्यांनी विकली नाही कारण त्यांना चिंता होती उद्या जर ह्याचं एखादं नाटक नाही चाललं तर काय करणार. ज्या वेळेस मी पहिली लक्झरी कार ऑटोमॅटिक Honda Accord घेतली आणि त्यांना स्टीअरिंगवर बसवलं, त्यावेळेस आम्हा दोघांनाही खुप भरून आलं होतं. त्यानंतर मी अनेक लक्झरी गाड्या घेतल्या.. BMW, Mercedes S Class. मला आनंद या गोष्टीचा आहे की त्यांच्या हयातीतच मी मला जेवढं शक्य होतं, ते सगळं सुख मी त्यांना देऊ शकलो. अर्थात त्यांच्या आशीर्वादाच्या पाठबळावरच मी हा प्रवास केलाय. आजही माझ्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये आमच्या त्याच टॅक्सीचा फोटो मी लावलेला आहे.अण्णा.. आज तुम्हाला खुप मिस करतोय.तुमच्या सारखा देव माणुस मी आयुष्यात पहिला नाही.

भरत जाधवने रंगमंचाद्वारे त्याच्या अभिनयकारकिर्दीला सुरुवात केली. आज मराठीतील सुपरस्टार अशी त्याची ओळख आहे. त्याने अनेक मराठी मालिका, नाटक, चित्रपटांमध्ये काम केले आहे. सुखी माणसाचा सदरा ही मालिका त्याची मालिका सध्या त्याच्या फॅन्सना प्रचंड आवडत आहे.

टॅग्स :भरत जाधव