मराठी चित्रपट आशय आणि विषयांमध्ये वैविध्य आणत असताना सामाजिक प्रश्न चित्रपटाद्वारे मांडण्यासही चांगला प्रतिसाद मिळत आहे. मराठी चित्रपट सुरुवातीला तमाशा आणि नंतर विनोदाच्या लाटेत गुदमरून गेला होता. तो आता बदलला आहे. नुकत्याच आलेल्या ‘शॉर्टकट- दिसतो पण नसतो’ चित्रपटामध्ये सायबर क्राइम हा विषय हाताळला गेला. त्याचबरोबर ‘देऊळ बंद’ चित्रपटाने वेगळा प्रयोग करीत श्रद्धेची नवी परिभाषा मांडत दहशतवादापासून ते नागरिकांच्या ‘सिव्हिक सेन्स’वरही भाष्य केले. ‘नीळकंठ मास्तर’ हा चित्रपट खरंतर स्वातंत्र्यचळवळीच्या पार्श्वभूमीवरील. परंतु, यामध्येही तरुणाईच्या ‘पॅशन’ची कहाणी मांडली होती. चित्रपटांची भूमिका काय? हा खरंच विचार करायला लावणारा प्रश्न. या प्रश्नाच्या गहणतेमध्ये शिरायचा प्रयत्न केला तर समाजात घडणाऱ्या घटनांचे वास्तवदर्शी चित्र मांडणारा पट अशी त्याची व्याख्या करता येईल. आर्ट सिनेमाच्या माध्यमातून त्याला न्याय देण्याचा प्रयत्नदेखील झाला आहे, पण मुख्य प्रवाहातील चित्रपटांमध्ये सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांचा जोर हा नंतरच्या टप्प्यामध्ये काहीसा आला.आशयघन आणि सामाजिक विषयांचा टे्रंड जसा चित्रपटांमध्ये रुजण्यास सुरुवात झाली तशी प्रेक्षकांची पावलेदेखील मराठीकडे वळू लागली. पठडीबाहेरील सामाजिक विषयांना हात घातला गेल्याने आपलेच प्रश्न चित्रपटातून मांडले जात असल्याचे प्रेक्षकांना समजले. आजूबाजूच्या घडामोडी, गुन्हे, आत्महत्या, जाती-भेद असे संवेदनशील विषय दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी चांगल्या पद्धतीने हाताळल्यामुळे आपल्या प्रश्नांची इतर समाजाला जाणीव होईल, असा विश्वास प्रेक्षकांमध्ये तयार झाला; आणि केवळ मराठी प्रेक्षकच नाही, तर अमराठी दिग्दर्शक, निर्मात्यांनाही सामाजिक विषयांनी मराठी चित्रपटसृष्टीकडे खेचून आणले.समाजातील आसपास घडणाऱ्या घडामोडींचे प्रतिबिंब चित्रपटांमध्ये उमटू लागल्यामुळे चित्रपट प्रेक्षकांच्या खऱ्या अर्थाने हृदयापर्यंत जाऊन भिडला, असे म्हटले तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. गेल्या काही वर्षांत जोगवा, गोष्ट छोटी डोंगराएवढी, देऊळ, फॅन्ड्री, ७२ मैल एक प्रवास, रेगे, कोर्ट, नागरिक, बायोस्कोप यांसारख्या सामाजिक चित्रपटांनी बॉक्स आॅफिसवर आपले वर्चस्व सिद्ध करीत संपादन केलेले यश हे याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल. ‘देऊळ’सारख्या चित्रपटाने तर धर्माच्या नावावर चाललेला व्यापार उघड केला. हे चित्रपट नेहमीच्या मसालाप्रधान चित्रपटांपेक्षा खूपच वेगळे असूनही प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. मागणी तसा पुरवठा हे कुठल्याही चित्रपटाच्या यशस्वीतेचे गमक मानले जाते, त्याप्रमाणे प्रेक्षकांचा सामाजिक चित्रपटांना मिळणारा वाढता प्रतिसाद पाहूनच निर्मातेदेखील सामाजिक आशयांवरील चित्रपट करण्यास पुढे येत आहेत, ही नक्कीच कौतुकास्पद बाब आहे. वेगळ्या धाटणीच्या चित्रपटांनाही स्वीकारण्याची मानसिकता प्रेक्षकांनी दाखविल्यामुळे मराठी चित्रपटांचा कॅनव्हास निश्चितच मोठा झाला आहे. ग्रामीण भाग म्हणजे सामाजिक विषयांचे आगार आहे, शोधलं की अनेक विषय तिथे आपणहूनच सापडतात, केवळ बघण्याची दृष्टी हवी. सगळे बालपण गावांमध्येच गेल्याने तिथलेच प्रश्न मांडावेत, हीच नेहमी इच्छा होती, तीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. - नागराज मंजुळे
सामाजिकतेचा मराठी कॅनव्हास
By admin | Updated: August 12, 2015 05:10 IST