Join us  

जीवनावर, कुटुंबियांवर प्रेम करा, ते कोकेनपेक्षा चांगलं आहे - संजय दत्त

By admin | Published: May 07, 2016 9:37 AM

जगामध्ये असा एक अमली पदार्थ नसेल जो मी घेतलेला नाही. परंतु, ते सगळं मी सोडलं कारण मला चांगलं जीवन जगायचं होतं

जगामध्ये असा एक अमली पदार्थ नसेल जो मी घेतलेला नाही. परंतु, ते सगळं मी सोडलं कारण मला चांगलं जीवन जगायचं होतं. इच्छाशक्तिच्या बळावर मी अमली पदार्थांचा नाद सोडल्याचं संजय दत्तनं एका कार्यक्रमात सांगितलं.
तुरुंगातून सुटल्यानंतर सहसा लोकांमध्ये न मिसळणारा संजय दत्त दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाला आणि त्यानं तब्बल तासभर मनमोकळ्या गप्पा मारल्या आणि आपले अनुभव सांगितले.
 
मुलांनी कैद्याच्या कपड्यात बघू नये अशी इच्छा होती
 
मुलांनी मला तुरुंगात कधीही कैद्याच्या कपड्यात बघू नये अशी माझी इच्छा होती. त्यामुळे त्यांना कधीही तुरुंगात भेटायला आणलं नाही. महिन्यातून दोनवेळा त्यांच्याशी मी फोनवर बोलायचो आणि सांगायचो की मी डोंगरांमध्ये कामासाठी आलोय. त्यांनी मोठं होताना माझ्या कैद्याच्या कपड्यांमधल्या प्रतिमेला वागवू नये असं मला वाटत होतं.
 
 
माश्यांनी तुरुंगात खूप हैराण केलं
 
पुण्याच्या येरवडा जेलमध्ये अब्जावधी माशा आहेत. जिथं बघावं तिकडे माशा असतात. अंगावर, कपड्यांमध्ये, सगळ्या सामानात, एवढंच कशाला जेवणाच्या डाळीमध्येही माशा असतात. त्या माशा काढून जेवावं लागतं. काही कैदी जेव्हा ती डाळ खायचे नाहीत, तेव्हा मी सांगायचो की डाळीमध्ये प्रोटीन्स असतात, ती खा, काही होत नाही.
आता घरी कधी बायकोनं काळ्या रंगाची डाळ बनवली तरी मी तक्रार करत नाही.
 
 
टाडा म्हणजे काय हेच मला माहित नव्हतं
 
मला जेव्हा अटक केली तेव्हा टाडा म्हणजे काय हेच मला माहित नव्हतं. कायदा माहित नसेल तरीही तो मोडणं हा गुन्हा असतो. आणि मी कायदा मोडलाय हेच मला माहित नव्हतं. बाँबस्फोटांच्या खटल्यात पोलीसांनी अटक केली तेव्हा मी कोसळलोच, मी देशाविरोधात कसं काही करू शकेन. बाँबस्फोटात मी माझंच शहर कसं उडवीन. पण टाडाखाली मला अटक केलं. मॉरीशसमधून शुटिंग करून जेव्हा मी परतलो तेव्हा मुंबई विमानतळावर 50 हजार पोलीस माझ्यावर बंदूक रोखून उभे होते, जसा काही मी ओसामा बिन लादेन आहे.
 
 
तुरुंगात असताना कधीही आशा ठेवली नाही
 
तुरुंगात असताना मी कधीही काही चांगलं घडेल अशी आशा ठेवली नाही. ज्यावेळी तुम्ही आशा सोडून देता तेव्हा आयुष्य एकदम सोपं होऊन जातं. आपलं काम करायचं, आशा बाळगायची नाही हे मी तुरुंगात शिकलो. ज्यावेळी मी काही चांगलं घडण्याची आशा सोडली त्यावेळी सगळं सोप्पं झालं आणि वेळही पटकन निघून गेला.