चित्रपटाच्या चित्रीकरणावेळी धम्माल, मस्ती तर होतच असते. मात्र, काही वेळा अचानक काही प्रसंगदेखील घडतात. असंच काहीसं घडलंय लालबागच्या राणीसोबत.. म्हणजेच वीणा जामकरसोबत. लक्ष्मण उत्तेकर दिग्दर्शित आगामी ‘लालबागची राणी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात वीणा जामकरने ‘लालबागची राणी’ ही प्रमुख भूमिका साकारली आहे. चित्रपटाचे चित्रीकरण दक्षिण मुंबईतील अनेक ठिकाणी प्रत्यक्ष करण्यात आले आहे. गेट वे आॅफ इंडियाजवळच्या चित्रीकरणावेळी हातातून उडालेला फुगा पकडण्यासाठी आभाळाकडे पाहत रस्ता ओलांडताना वेगाने येणाऱ्या गाडीच्या धडकेपासून वीणाला स्वत:ला वाचवायचं होतं, असा हा रिस्की शॉट होता. ठरल्याप्रमाणे चित्रीकरणाला सुरुवात झाली. ते पाहायला रस्त्यावर दुतर्फा तुडुंब गर्दी झाली. ‘कॅमेरा अॅण्ड अॅक्शन’ म्हणताच, संध्याच्या भूमिकेत वीणा स्वत:ला झोकून देऊन फुगे पकडण्यासाठी आकाशाकडे पाहत निघाली. दुसऱ्या बाजूने ड्रायव्हरने गाडी सुरू केली.तो वीणापर्यंत पोहोचणार त्याआधीच त्याचा गाडीवरचा ताबा सुटला. अभिनयात गुंग झालेल्या वीणाला याची कल्पनादेखील नव्हती. वेगात ती गाडी वीणाला धडकणार इतक्यात गर्दीतील एकाने तिला बाजूला ओढले. काय होतंय हे कळायच्या आतच ‘लालबागची राणी’ थोडक्यात बचावली. काही क्षण वातावरण तंग झाले. कोणी काहीच बोलत नव्हते. मग, मात्र वीणा सुखरूप असल्याचे पाहताच सर्वांनी आनंदाने टाळ्या वाजवल्या.
थोडक्यात बचावली ‘लालबागची राणी’
By admin | Updated: May 27, 2016 02:15 IST