ऐन दिवाळीत प्रदर्शित होणाऱ्या 'कट्यार काळजात घुसली' या चित्रपटाच्या चमूने 'लोकमत', मुंबई कार्यालयाला भेट दिली. दिग्दर्शक सुबोध भावे, पार्श्वगायक महेश काळे, अभिनेता पुष्कर श्रोत्री आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी रंगवलेल्या या भेटीचा हा वृत्तांत...सुबोध भावे (दिग्दर्शक)दिग्दर्शक म्हणून हा चित्रपट मी जेव्हा करायला घेतला, तेव्हाच तो दिवाळीत प्रदर्शित करायचा हे मी नक्की केले होते. सणासुदीची आपल्याकडे परंपरा आहे आणि हा चित्रपटही आनंद देणाराच आहे. त्यामुळे तो दिवाळीत आणणे योग्यच आहे. गुढीपाडवा, दसरा असे इतर सण असले, तरी 'कट्यार'साठी दिवाळीच्या व्यतिरिक्त दुसरा कुठला मुहूर्त असूच शकत नाही. ज्या संगीताने माझ्या आयुष्यात आनंदाचे क्षण आणले, तेच क्षण सणासुदीच्या दिवसांत रसिकांच्या आयुष्यात यावेत, हा यामागचा हेतू आहे. आम्हाला काम करताना जर आनंद मिळत असेल, तर लोकांनाही तो नक्कीच मिळेल. दिवाळी पाडव्याच्या दिवशी हा संगीतमय नजराणा आम्ही रसिकांना देत आहोत.मी नाटकातून पुढे आलेला कलाकार आहे आणि त्यामुळे नाटक व चित्रपट यातला फरक मला चांगला कळतो. मूळ 'कट्यार काळजात घुसली' या नाटकासारखाच जर मला चित्रपट करायचा असता, तर तो मी केलाच नसता. मूळ नाटकाच्या सीडी तर बाजारात उपलब्ध आहेतच, त्यामुळे चित्रपटासारखा चित्रपट मला बनवायचा होता. नाटकापेक्षा काहीतरी वेगळे देण्याचा आम्ही यात प्रयत्न केला आहे. पुरुषोत्तम दारव्हेकरांनी कथा लिहिली होती, ती नाटकासाठी होती आणि पं.जितेंद्र अभिषेकी यांनी संगीत दिले, तेही नाटकासाठीच होते. ते नाट्यसंगीत होते, ते चित्रपटाचे संगीत नव्हे. अभिषेकी बुवांना 'कट्यार'च्या चित्रपटासाठी गाणी करायला सांगितली असती, तर ती त्यांनी वेगळी करून दिली असती आणि तेवढी त्यांची ताकद नक्कीच होती. या नाटकातली कथा आणि त्यातली पात्रे यांना एकत्र घेऊन मांडलेले रसायन म्हणजे आमचा हा चित्रपट आहे. नाटकाच्या गाभ्याला आम्ही धक्का लावलेला नाही. नाटकात जे दाखवताना मर्यादा येतात, ते मांडणे म्हणजे हा चित्रपट आहे. नाटकातली मूळ पदे अभिषेकी बुवांनी नाट्यसंगीत म्हणून बांधली होती. ही गाणी आम्ही चित्रपटातही घेतली आहेत, याचे एकुलते एक कारण म्हणजे, या निमित्ताने अभिषेकी बुवांचे नाव संगीत दिग्दर्शक म्हणून प्रथमच एका चित्रपटाला लागू शकेल. दुसरी गोष्ट अशी की, हा चित्रपट असल्याने चित्रपटाला साजेसे संगीत त्याला असले पाहिजे, असे मला वाटले. त्यासाठी चित्रपटाचा एकंदर आवाका समजून घेणारा संगीत दिग्दर्शक आम्हाला हवा होता. शंकर-एहसान-लॉय यांच्याव्यतिरिक्त सध्यातरी मला कुणी दिसले नाही. त्यांचा शास्त्रीय संगीताचा अभ्यास आहे. हा बाज समजून घेत आणि त्याचा बोजडपणा नाहीसा करून लोकांना पटकन अपील होईल, ही गरज ही मंडळी पूर्ण करतील असा मला विश्वासही होता. ही जबाबदारी त्यांनी शंभर टक्के पार पाडली आहे. हा चित्रपट 'भारतीय' आहे. भारतीय शास्त्रीय संगीत हे काही केवळ मराठीच्या मालकीचे नाही, ते भारताच्या मालकीचे आहे. म्हणून हा चित्रपट निव्वळ मराठी नाही, तर तो 'भारतीय' चित्रपट आहे. मराठीसोबत हिंदी, उर्दू या भाषांचा या चित्रपटात समावेश आहे. त्यामुळे तो मिश्र स्वरूपाचा चित्रपट आहे. यातले कलाकारही भारताचे प्रतिनिधित्व करतात. शंकर महादेवन दक्षिणेकडचे, साक्षी तन्वर उत्तरेकडची, आमचे कॅमेरामन राजस्थानचे, लेखक प्रकाशभाई गुजरातचे अशी भारतातली वेगवेगळ्या भागातली मंडळी या चित्रपटात एकत्र आली आहेत. मराठी नाटकावर बनला आहे, म्हणून हा मराठी चित्रपट असला, तरी खऱ्या अर्थाने याला भारतीय चित्रपटच म्हणावे लागेल.आमच्या चित्रपटात २१ गाणी आहेत. ३५ वर्षांपूर्वी 'शंकरभरणम' व त्यानंतर 'सूरसंगम' हे चित्रपट आले, पण त्यानंतर निव्वळ शास्त्रीय संगीतावर आधारित चित्रपट आपल्याकडे बनला नाही. आमच्या चित्रपटातली गाणी केवळ गाणी म्हणून समोर येत नाहीत, तर ती विविध प्रसंगांच्या माध्यमातून सादर होतात. कहाणी पुढे नेण्यासाठी हे गाण्यांचे प्रसंग गुंफले आहेत. यात संगीतातल्या घराण्यांच्या भेदापलीकडचे गाणे आहे. संगीत एकमेकांना जोडत असते आणि या जोडण्याचा प्रयत्न या संगीतप्रधान चित्रपटाने व्हावा, असे आम्हाला वाटते. आनंद, आनंद आणि केवळ आनंद देणे हाच या चित्रपटाच्या मागचा उद्देश आहे.महेश काळे (पार्श्वगायक)प्रत्येक संगीतकाराला त्याची बलस्थाने माहीत असतात. त्या बलस्थानांमध्ये मिळणाऱ्या सवलतीत तो रागांचे सादरीकरण करतो. या चित्रपटातल्या पंडितजींना मधुर व निर्मळ स्वर, तर खांसाहेबांना आक्रमक व तडफ गाणे आवडते. मी यात चार गाणी गायली आहेत. मुळात यात वेगळे जे काही दिलंय ते संगीतकारांनी दिलंय. या चित्रपटातल्या सदाशिव या व्यक्तिरेखेसाठी मी पार्श्वगायन केले आहे. या सदाशिवला चांगल्या प्रकारे गाणे शिकण्याची आस आहे. स्वरलगाव निर्मळ कसे येतील, असा विचार मी ही गाणी गाताना केला. हे सगळे असले, तरी यातला अंडरकरंट असा आहे की, गाणे ही कुणाची मक्तेदारी असू शकत नाही. साधना करेल, त्याला ते मिळते. ही भावना समजून मी पंडितजींची मार्दवता आणि खांसाहेबांच्या गायकीतला आवेग, असे संमिश्र भाव माझ्या गाण्यात आणले आहेत. या चित्रपटाचे संगीत शास्त्रीय संगीताचा अभिमान दर्शवणारे तर आहेच, पण त्यातली मरगळही दूर करणारे आहे.मृण्मयी देशपांडे (अभिनेत्री)मी 'उमा' ही व्यक्तिरेखा साकारली आहे. 'कट्यार काळजात घुसली' हे नाटक मी वाचले असल्याने आणि एकूणच संगीत नाटकांची शाळेपासूनच आवड असल्याने, 'कट्यार'चा आवाका मला माहीत होता. सुबोधने या भूमिकेबद्दल मला विचारल्यावर मी लगेच होकार दिला. हा चित्रपटाबद्दल माझा सुबोधवर पूर्ण विश्वास होता. त्यामुळे या भूमिकेला 'नाही' म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. एका मोठ्या प्रोजेक्टचा आपण भाग असलंच पाहिजे, हीसुद्धा भावना मनात होती. लहानपणापासून नाटक आणि नृत्य शिकताना मी गुरुशिष्य परंपरेतून गेली आहे. यातली उमा ही पंडितजींचा वारसा घेऊन एक संस्कारित घरातून आलेली व्यक्तिरेखा आहे आणि त्यामुळे मला ती खूप जवळची वाटली.पुष्कर श्रोत्री (अभिनेता)यात मी कविराज ही भूमिका केली आहे. या कविराजचे दु:ख असे की, त्याला गाता येत नाहीये. त्याच्या गळ्यावर गाण्याचे संस्कार नाहीत. त्यामुळे त्याला यातला सदाशिव नेहमी जवळचा वाटत राहतो. मला जर आवाज असता, तर तो या सदाशिवसारखा असता, असे त्याला वाटत असते. कविराज हा कायम सत्याची व चांगुलपणाची कास धरणारा आहे. तो वाईट मार्गाला जाऊन काही करत नाही. त्याचे अजून एक दु:ख आहे आणि ते म्हणजे त्याचे लग्न झालेले नाही. त्यामुळे तो यातल्या उमा व झरिना या दोघींनाही मागणी घालतो.
आनंद, आनंद आणि केवळ आनंद!
By admin | Updated: November 9, 2015 02:58 IST