स्वामी समर्थांच्या भूमिकेतील मोहन जोशी आणि डॅशिंग चेहरा गश्मीर महाजनी यांच्या अभिनयाने गाजत असलेल्या ‘देऊळ बंद’ चित्रपटाला पहिल्याच आठवड्यात प्रचंड प्रतिसाद मिळाला असून, चित्रपटाचे सगळे शो हाऊसफुल्ल झाले आहेत.३१ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झाल्यानंतर ‘देऊळ बंद’ला स्वामी समर्थांचे भक्त आणि चित्रपट रसिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. गेल्या शुक्रवारी पहिल्या दिवसापासूनच महाराष्ट्रात ठिकठिकाणी प्रत्येक थिएटरवर हाऊसफुल्लचे बोर्ड लागले होते. वटवृक्ष एन्टरटेन्मेंट या बॅनरखाली जयश्री कैलास वाणी आणि जुईली कैलास वाणी यांची निर्मिती आणि गणेश निबे प्रॉडक्शनची प्रस्तुती असलेला ‘देऊळ बंद’ चित्रपट प्रवीण तरडे आणि प्रणीत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केला आहे. चित्रपटामध्ये मोहन जोशी आणि गश्मीर महाजनी यांच्याबरोबर अनेक दिग्गज कलाकारांच्या भूमिका आहेत.चित्रपटाला प्रतिसाद वाढत आहे़ शहरात मल्टिप्लेक्समध्ये आणि गावात एक पडदा चित्रपटगृहांमध्येही प्रेक्षक भरभरून गर्दी करीत आहेत. पुणे-मुंबईसह विदर्भ आणि मराठवाड्यात एकाच वेळी गर्दी खेचून चित्रपटाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. चित्रपट रसिक व स्वामी समर्थांचे भक्त यांच्या प्रतिसादाने आम्ही अतिशय आनंदी झालो असून, कृतज्ञ आहोत. वाढता प्रतिसाद पाहून सगळ्यांना चित्रपट पाहता यावा म्हणून पुढच्या आठवड्यामध्ये देऊळ बंदचे शो वाढविण्यात येणार असून, तो जास्तीत जास्त थिएटर्समध्ये प्रदर्शित केला जाईल, असे कैलास वाणी आणि गणेश निबे यांनी सांगितले. या चित्रपटात आदिनाथ कोठारेने सरप्राइज भूमिका साकारली आहे. विश्वनाथ, व्यंकटेश, इंदू, यशोदा यांनी हाती घेतलेल्या मिशनचे नेतृत्व आदिनाथ कोठारे करतो.
‘देऊळ बंद’ प्रत्येक थिएटरवर हाऊसफुल्ल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2015 00:50 IST