कलाकाराला कधी त्याचे वय विचारू नये. जोपर्यंत त्याच्यात परफॉर्म करण्याची शक्ती आहे, तोपर्यंत तो प्रेक्षकांचे मनोरंजन करू शकतो. हीच गोष्ट अभिनेता किशोर प्रधान यांनी सार्थ ठरवली आहे. वयाची सत्तरी ओलांडली असली, तरी तरुणाईला लाजवेल असा त्यांचा काम करण्याचा उत्साह बघता त्यांना ‘ज्येष्ठां’च्या पंक्तीत बसविण्याचे धारिष्ट्य होत नाही. साधारणपणे ७०च्या दशकात किशोर प्रधान हे खूप व्यस्त कलाकार मानले जायचे. याच काळात दूरदर्शन सुरू झाल्यामुळे अनेक कार्यक्रम व्हायचे. त्यामध्ये प्रधान आणि त्यांची बायको शोभा यांना काम करण्याची भरपूर संधी मिळाली. मात्र, त्यांनी स्वत: दिग्दर्शित केलेल्या ‘काका किशाचा’ नाटकातून त्यांना खरी ओळख मिळाली. कामाचा त्यांचा आवाका अजूनही कमी झालेला नसून, आगामी ‘ब्रेव्हहार्ट’मधून त्यांच्या अभिनयाचे दर्शन घडणार आहे. ‘ब्रेव्हहार्ट’ चित्रपटात तरुण कलाकार संग्राम समेळ याच्या आजोबाची भूमिका ते साकारत आहेत. वयाला शोभेल आणि भावेल असाच हा रोल आहे. लवकरच ‘स्टेपनी’, ‘चिंतामणी’ हे आपले चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गवार असून, विशेषत: वंदना गुप्ते दिग्दर्शन करीत असलेल्या ‘फॅमिली कट्टा’ चित्रपटाबाबत आपण खूपच उत्सुक आहोत. या चित्रपटात माझी विशेष भूमिका आहे. हा चित्रपट करताना खूप मजा आली असल्याचे ते सांगतात.
‘एव्हरग्रीन’ किशोर प्रधान
By admin | Updated: January 10, 2016 03:17 IST