रंगमचावर अभिनय साकारताना एकांकिकेतील गाण्याची गरज, ट्युन ऐकून जागा झालेला कवी, त्या धूनवर मापात बसवलेले गाण्यातील शब्द यामुळे नव्यानेच ओळख निर्माण झालेला गीतकार आणि लेखक गुरू ठाकूर. परंतु एकीकडे त्याच्या सुरांना, संवादांना रसिकांच्या टाळ्या मिळत होत्या आणि दुसरीकडे तेच संवाद स्वत:कडून सादर करण्यासाठी त्याला साद घालत होते. आणि अखेर दिग्दर्शक अतुल जगदाळेंनी गुरूमधील अभिनेत्याला संधी दिली आणि गुरू ठाकूर नावाच्या गीतकाराला अभिनेत्याचा ‘गणवेश’ मिळाला. वेगळा विषय असणाऱ्या, सामाजिक आशयातून प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणाऱ्या ‘गणवेश’ची कथा. यामध्ये गुरूला वीटभट्टीवरील मुकादमाच्या भूमिकेतून दिग्दर्शक अतुलने समोर आणले आहे. लवकरच हा चित्रपट रिलीज होणार असून यातून किशोर कदम, स्मिता तांबे, दिलीप प्रभावळकर या दिग्गजांसोबत गुरूच्या अभिनयाची जुगलबंदी रसिकांना अनुभवायला मिळणार आहे.