Join us  

अभिनयातून थेट दिग्दर्शनाकडे...

By admin | Published: May 05, 2016 3:38 AM

शॉट लावण्यापासून ते कलाकारांकडून अपेक्षित सीन काढून घेण्यापर्यंतची सर्व कसरत दिग्दर्शकाला करावी लागते. तांत्रिकदृष्ट्या सर्व गोष्टींचे योग्य ज्ञान डिरेक्टरला असणे गरजेचे असते.

शॉट लावण्यापासून ते कलाकारांकडून अपेक्षित सीन काढून घेण्यापर्यंतची सर्व कसरत दिग्दर्शकाला करावी लागते. तांत्रिकदृष्ट्या सर्व गोष्टींचे योग्य ज्ञान डिरेक्टरला असणे गरजेचे असते. आपल्या स्क्रिप्टनुसार सर्व सीन्स कॅमेऱ्यात योग्य पद्धतीने उतरत आहेत ना, याची काळजी त्याला घ्यावी लागते. म्हणजेच काय तर कोणतीही फिल्म उत्तम होण्यासाठी दिग्दर्शकाचा रोल इम्पॉरटन्ट असतो. आता आपल्या मराठी इंडस्ट्रीतील काही कलाकारांनादेखील आपणसुद्धा डिरेक्टरची हॅट घालून कॅमेऱ्यामागे उभे राहून दिग्दर्शन करावे, असे वाटले अन् बऱ्याच कलाकारांनी आपला मोर्चा दिग्दर्शनाकडे वळविला, तर काही कलाकार नव्याने त्यांचा डिरेक्टोरिअल डेब्यू करीत आहेत. अशा कलाकारांच्या दिग्दर्शनाचा वेध सीएनएक्सने त्यांच्याशी बातचित करून घेतला आहे.कोंबडी पळाली तंगडी धरून.... या गाण्यातील आपल्या दिलखेचक अदांनी संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावणारी अभिनेत्री म्हणजे क्रांती रेडकर. क्रांतीने आजवर अनेक चांगल्या चित्रपटांतून दर्जेदार भूमिका केल्या आहेत व आपल्या अभिनयाची चुणूक दाखविली आहे. आता ही आपली गुणी अभिनेत्री फक्त एवढ्यावरच थांबलेली नाही, तर तिने ‘काकण’सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करून सर्वांचीच वाहवा मिळविली आहे. ‘काकण’ या चित्रपटाच्या माध्यमातून क्रांतीने दिग्दर्शनात पदार्पण केले अन् तिच्या या कामाचे सर्वत्र कौतुक झाले. राज्यस्तरीय पुरस्काराच्या मानांकनापर्यंत क्रांतीने मोहर उमटविली आहे. ‘काकण’साठी तिने केलेल्या दिग्दर्शनाच्या प्रवासाबद्दल क्रांती भरभरून बोलली.‘काकण’ हा माझ्यासाठी खूपच स्पेशल सिनेमा आहे. मला जेव्हा या सिनेमाची स्क्रिप्ट सुचली तेव्हा मी फक्त शॉर्टफिल्म करण्याचे ठरविले होते. परंतु ऊर्मिला अन् जितेंद्रला ही गोष्ट एवढी आवडली की त्यांनी मला सांगितले आपण कमर्शिअल फिल्म करू या अन् मग झाले काम सुरू. डिरेक्टर म्हणून काम करणे खरंच खूप कठीण असते. तुम्हाला उन्ह-पाऊस कशाचीही काळजी न करता सेटवर थांबून काम करवून घ्यावे लागते. मला आठवतेय आम्ही ‘काकण’साठी पाण्यामध्ये एक सीन करीत होतो. हीरो-हीरोइन पाण्यामध्ये बुडत आहेत, असा तो शॉट होता. आमच्याकडे लिमिटेड टाइम होता अन् काही केल्या त्या सीनमध्ये को-आॅर्डिनेशन जमून येत नव्हतं. तसंच आमच्याकडे त्या सीनसाठी लागणारी प्रॉपर्टीसुद्धा कमी होती. परंतु कसाबसा आम्ही तो सीन अर्ध्या दिवसात पूर्ण केला. दिग्दर्शक म्हणून काम करताना खरंच खूप चॅलेंजेस तुमच्या समोर येतात अन् ती पार करूनच तुम्हाला पुढे जावे लागते.मराठी इंडस्ट्रीचा चॉकलेट बॉय आदिनाथ कोठारे याने ‘माझा छकुला’ या चित्रपटात त्याच्या अ‍ॅक्टिंगची झलक दाखवून हम भी किसीसे कम नहीं हेच प्रेक्षकांना दाखवून दिले होते. आता घरात साक्षात वडीलच अभिनेते, दिग्दर्शक म्हटल्यावर याच्यावर अ‍ॅक्टिंग अन् डिरेक्शनची झिंग चढली नाही तर नवलच. आदिनाथला खरंतर डिरेक्टरच व्हायचे होते, पण नशिबाने त्याला आधी अ‍ॅक्टर बनविले अन् आता हा पठ्ठ्या त्याचे दिग्दर्शकाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून मेहनत घेत असून, लवकरच ‘पाणी’ या चित्रपटातून अ‍ॅज अ डिरेक्टर म्हणून तो प्रेक्षकांसमोर लवकरच येणार आहे.आदिनाथ म्हणाला, की मला दिग्दर्शनात पदार्पण करण्यासाठी एक वेगळा अन् इन्स्पायरिंग विषय हवा होता. पाणी हा विषय सर्वांच्याच जवळचा आहे. आज जर पाहिले तर पाण्याची टंचाई सगळीकडेच जाणवत आहे. मग मी या विषयावर अभ्यास सुरू केला. विदर्भ-मराठवाडा येथे जाऊन पाहणी केली त्या भागांचा स्टडी केला अन् असे करीत असतानाच नांदेड जिल्ह्यातील एका गावात मला माझी कहाणी सापडली. मी सध्या स्क्रिप्टवर काम करीत असून, लवकरच माझे हे काम संपेल व सत्यकथेवरील या कहाणीमध्ये कोण फिट बसेल, याचा शोध सुरू होईल.‘पोरबाजार’ या चित्रपटातून अभिनेत्री मनवा नाईक हिनेदेखील दिग्दर्शनाचा श्रीगणेशा केला होता. या चित्रपटाची प्रशंसा बऱ्याच जणांनी केली अन् मनवाचे काम अ‍ॅप्रिशिएटदेखील झाले. माझी पहिली चॉइस डिरेक्शनच होती, असे मनवाने सांगितले आहे. तर, प्रसाद ओकदेखील ‘कच्चा लिंबू’ या सिनेमातून पहिल्यांदाच दिग्दर्शन करणार आहे. श्रेयस तळपदेदेखील आता ‘पोस्टर बॉयज’ हा सिनेमा हिंदीमध्ये करीत असून, यामध्ये तो दिग्दर्शन करणार आहे.मी खरंतर २० वर्षांपूर्वीच मुंबईमध्ये दिग्दर्शकच व्हायला आलो होतो. असिस्टंट दिग्दर्शक म्हणून मी अनेक कामे केली आहेत आणि आपण दिग्दर्शकच व्हायचे, असे माझे स्वप्न होते. मी पुष्कर श्रोत्रीसोबत ‘हाय काय नाय काय’ हा सिनेमा दिग्दर्शित केला होता. परंतु ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटातून मी दिग्दर्शनात पदार्पण करतोय. पहिल्याच फिल्ममध्ये उत्तम स्टारकास्ट मिळाल्याने मी आनंदी आहे. रवी जाधवसारख्या दिग्दर्शकाला अभिनेता म्हणून मला आता डिरेक्ट करायचे आहे, हा माझ्यासाठी खूपच छान अनुभव आहे.- प्रसाद ओकमी डिरेक्शनसाठी कोणते प्रशिक्षण घेतले नाही. पण मला फिल्म डिरेक्ट करायचीच होती. जेव्हा मी अभिनेत्री म्हणून काम करायचे तेव्ही माझे डिरेक्टर मला काय सूचना द्यायचे, यावर मी बारीक लक्ष द्यायचे अन् असे करीतच टेक्निकल गोष्टी शिकत गेले. दिग्दर्शक म्हणून काम करणे सोपे नाही.- क्रांती रेडकरमाझ्या घरातच एक एवढी मोठी इन्स्टिट्युशन आहे, की मला वेगळं काही शिकायची गरजच नाही पडली. माझ्या वडिलांनी मला नेहमीच सपोर्ट केला आहे. मला सिनेमाचे भयंकर वेड आहे. मी सिनेमा खाते, पितो असे म्हटले तरी चालेल. लहानपणापासूनच खूप सिनेमे पाहायचो. मी याआधी शॉर्ट फिल्म डेरेक्ट केली आहे आणि आता सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. मी स्वत:ला नशीबवान समजतो की या क्षेत्रात मला काहीतरी करण्याची संधी मिळतेय.- आदिनाथ कोठारे

 

- priyanka londhe@lokmat.com