Join us

डमरू आहे इरफानच्या हातात

By admin | Updated: July 23, 2016 15:46 IST

मदारी हा चित्रपट कोणत्या प्रकारात मोडणारा आहे, हे सांगणे कठीण आहे. एकीकडे या चित्रपटात आपल्याला अपहरणाची गोष्ट पाहायला मिळते, तर दुसरीकडे या चित्रपटात पिता आणि मुलामधील नात्यावर भाष्य करण्यात आले

हिंदी चित्रपट : मदारी
जान्हवी सामंत
 
दर्जा - 3.5/5
 
दिग्दर्शक : निशिकांत कामत, कलाकार : इरफान खान, उदय टिकेकर, तुषार दळवी, विशेष बन्सल
 
मदारी हा चित्रपट कोणत्या प्रकारात मोडणारा आहे, हे सांगणे कठीण आहे. एकीकडे या चित्रपटात आपल्याला अपहरणाची गोष्ट पाहायला मिळते, तर दुसरीकडे या चित्रपटात पिता आणि मुलामधील नात्यावर भाष्य करण्यात आले आहे. पण सर्वात जास्त प्रकाशझोत हा चित्रपट भ्रष्टाचारावर टाकतो.
या चित्रपटाची सुरुवात एका अपहरणातून होते. गृहमंत्र्यांच्या मुलाचे रोहनचे (विशेष बन्सल) त्याच्या शाळेच्या होस्टेलमधून अपहरण केले जाते. आपल्या मुलाचा शोध घेण्याची जबाबदारी गृहमंत्री नचिकेत (जिमी शेरीगल)वर सोपवतात. नचिकेत हा खूपच हुशार पोलीस म्हणून ओळखला जात असतो. पण या गुन्ह्याची उकल करणे तितकेसे सोपे नसते. पोलीस आपल्यापर्यंत पोहोचू नयेत, यासाठी अपहरणकर्ता सगळे प्रयत्न करीत असतो. पण त्याचसोबत अपहरणकर्ता एका मोठय़ा भ्रष्टाचार प्रकरणाकडे गृहमंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी त्यांना अनेक धागेदोरेही देत असतो. निर्मलच्या (इरफान) भूतकाळात घडलेल्या घटनांमुळे त्याने हा अपहरणाचा डाव आखलेला असतो. या चित्रपटात अपहरणकर्ता निर्मल आणि ज्याचे अपहरण झालेले आहे, तो रोहन यांच्यात असलेले अतिशय उग्र नाते सुरुवातीला पाहायला मिळते; पण हे नाते कालांतराने बदलत जाते. 
स्पष्ट शब्दांत सांगायचे तर हा चित्रपट पाहणे सोपे नाही. या चित्रपटाची कथा अतिशय गुंतागुंतीची असल्याने ती शब्दांत मांडणे सोपे नाही. या चित्रपटात अनेक गोष्टी एकाचवेळी घडताना पाहायला मिळतात. चित्रपटाची सुरुवात चांगली होते, पण चित्रपट मध्यांतरापर्यंत अतिशय कंटाळवाणा होतो. चित्रपटात त्याच त्याच गोष्टी घडत असल्यासारखे वाटते. पण चित्रपटाचा उत्तरार्ध प्रेक्षकांना खिळवून ठेवतो. चित्रपटाचा शेवट काय असू शकतो, याचा अंदाज लावणेही फारसे कठीण नाही. हा चित्रपट काहीसा अ वेन्सडे, डोंबिवली फास्ट यांसारख्या चित्रपटांसारखा आहे, असे सारखे जाणवते. पण त्या चित्रपटांएवढी मदारीची पटकथा तितकीशी परिपूर्ण नाही.
पण यामुळे चित्रपटात काहीच नाही, असे आपण म्हणू शकत नाही. सरकार, भ्रष्टाचार या गोष्टी आतापर्यंत अनेक चित्नपटांत मांडल्या गेल्या आहेत. त्यामुळे त्यात नावीन्य वाटत नाही. पण या चित्रपटात नात्यांची गुंतागुंत खूपच चांगल्या रीतीने दाखवण्यात आलेली आहे. याचे अधिकाधिक श्रेय इरफानला जाते. 
या चित्रपटाचा डमरू हा इरफानच्या हातात आहे, यात काही शंकाच नाही. आपल्या देशातील चांगल्या अभिनेत्यांपैकी एक मानल्या जाणार्‍या इरफानने निर्मलच्या व्यक्तिरेखेतला उग्रपणा आणि सौम्यपणा तितक्याच चांगल्यारीतीने पडद्यावर मांडला आहे. त्याचे दु:ख, त्याचा त्रागा, त्याच्या समस्या त्याने उघड केल्यानंतर लोकांना त्या खर्‍या आणि आपल्याशा वाटतात. त्याचे रोहनसोबतचे वाईट वागणे आणि त्याचवेळी रोहनचा निरागसपणा लोकांना प्रचंड आवडतो. रोहनच्या भूमिकेत असलेल्या विशेष बन्सलने खूपच चांगला अभिनय केलेला आहे. चित्रपटातील निर्मल आणि रोहनचे नाते ही या चित्रपटाची जमेची बाजू आहे. जिमी शेरीगलला या भूमिकेत तितकासा वाव मिळालेला नाही. केवळ काही ठिकाणी तो ओरडताना आणि सतत काही ना काही तरी करताना आपल्याला पाहायला मिळतो. तुषार दळवी आणि उदय टिकेकर यांनी आपल्या वाट्याला आलेल्या भूमिका चांगल्या पार पाडल्या आहेत. 
शेवटी एकच सांगेन, की वेळ लागत असला तरी मदारी आपल्याला एक खूप प्रभावी संदेश देऊन जातो. चित्रपटाची कथा अतिशय गुंतागुंतीची असल्याने ती शब्दांत मांडणे सोपे नाही. या चित्रपटात अनेक गोष्टी एकाचवेळी घडताना पाहायला मिळतात. चित्रपटाची सुरुवात चांगली होते, पण चित्रपट मध्यांतरापर्यंत अतिशय कंटाळवाणा होतो. चित्रपटात त्याच त्याच गोष्टी घडत असल्यासारखे वाटते. पण चित्रपटाचा उत्तरार्ध प्रेक्षकांना खिळवून ठेवतो.