Join us  

"इंदू सरकार"मधील 14 सीन्स कट करा - सेन्सॉर बोर्ड

By admin | Published: July 11, 2017 5:02 PM

मधूर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या इंदू सरकार या चित्रपटातील 14 सीन्स कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या आहेत.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 11 - मधूर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या इंदू सरकार या चित्रपटातील 14 सीन्स कट करण्याच्या सूचना सेन्सॉर बोर्डाने दिल्या आहेत. दरम्यान, सेन्सॉर बोर्डाच्या या निर्णयाविरोधात मधूर भांडारकर रिवाइज कमिटीकडे जाणार असल्याचे समजते.
इंदू सरकार चित्रपटातील काही संवादांनाही काढून टाकण्याची सूचना सेन्सॉर बोर्डाने चित्रपट दिग्दर्शकाला केली असून यामध्ये "भारत की एक बेटी ने देश को बंदी बनाया हुआ है", "और तुम लोग जिंदगीभर मॉं-बेटे की गुलामी करते रहोगे", असे संवाद आहे. तर, प्राइम मिनिस्टर, इंटेलिजन्स ब्युरो, किशोर कुमार असे काही शब्द गाळण्याच्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी दिग्दर्शक मधूर भांडारकर यांना याबाबत विचारले असता, ते म्हणाले की सेन्सॉर बोर्डाने आपले काम केले. त्यांनी यामध्ये केलेल्या काही सूचना मला मान्य नाहीत. त्यामुळे मी रिवाइजल कमिटीपुढे जाणार असल्याचे  सांगितले. 
(‘इंदू सरकार’ प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा - विखे पाटील)
("इंदू सरकार" आधी आम्हाला दाखवा, काँग्रेसचं सेन्सॉर बोर्डाला पत्र)
(‘इंदू सरकार’चे प्रदर्शन लांबणीवर!)
दरम्यान, आणीबाणीवर आधारित या चित्रपटात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या भूमिका दाखवण्यात आल्या असल्याने काँग्रेसने आक्षेप घेतला असून काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून त्यांनी चित्रपट रिलीज होण्याआधी आम्हाला दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे. याचबरोबर या चित्रपटाची कथा दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते स्व. संजय गांधी यांच्या जीवनाशी संबंधीत असल्याचे दिसून येते. परंतु, सदरहू चित्रपटामध्ये वस्तुस्थितीशी विसंगत अशा पद्धतीने काही घटनांचे सादरीकरण असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात इतिहासाचा विपर्यास करण्याची शंका खरी ठरली तर प्रेक्षकांच्या भावना दुखावून तीव्र प्रतिक्रिया उमटू शकतात, असे म्हणत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे.
इंदू सरकार हा चित्रपट 1975 च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. या चित्रपटात कीर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. कीर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटामध्ये सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात 21 महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या चित्रपटात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे.
याचबरोबर इंदू सरकार हा चित्रपट 28 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे.