Join us

कॉन्ट्रोवर्सी किंग

By admin | Updated: September 10, 2016 23:25 IST

बॉलिवूडमध्ये काही आपल्या कामाने, तर काही आपल्या वाणीने रातोरात स्टार झाले आहेत. असाच एक स्टार केआरके ऊर्फ कमाल रशिद खान हा आहे.

सतीश डोंगरे

बॉलिवूडमध्ये काही आपल्या कामाने, तर काही आपल्या वाणीने रातोरात स्टार झाले आहेत. असाच एक स्टार केआरके ऊर्फ कमाल रशिद खान हा आहे. बॉलिवूडचा कितीही मोठा स्टार असो, त्याच्यावर आक्षेपार्ह कमेंट करून कॉन्ट्रोव्हर्सी निर्माण करण्यात केआरकेचा हातखंडा आहे. आघाडीची अभिनेत्री दीपिका पादुकोण असो व सोनाक्षी सिन्हा असो अशा कित्येक स्टार्संना टारगेट करून स्वत:ची ओळख निर्माण केलेला केआरके सध्या भलताच चर्चेत आहे. यावेळेस त्याने थेट बॉलिवूडचा सिंघम अर्थात अजय देवगण याच्याशी पंगा घेतला आहे. अजयच्या आगामी ‘शिवाय’ या चित्रपटाची निगेटिव्ह पब्लिसिटी करून निर्माता करण जोहर याच्या ‘ये दिल है मुश्किल’ या चित्रपटाला पाठिंबा द्यावा यासाठी केआरकेला २५ लाखांची आॅफर देण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असली तरी, केआरकेचे महत्त्वही यानिमित्त अधोरेखित झाले आहे. मात्र केआरके प्रकरणाची ही पहिलीच वेळ नसून यापूर्वीदेखील बऱ्याचशा वादग्रस्त प्रकरणात त्याचे नाव पुढे आले आहे.

लेडी शॉटगनशी पंगाकेआरकेच्या निशान्यावर कोणी आला नसेल असा स्टार क्वचितच म्हणावा लागेल. शाहरूखपासून, दीपिकाला आपल्याला अभद्र वाणीचा शिकार केलेल्या केआरकेने ‘लेडी शॉटगन’शीदेखील पंगा घेतला आहे. नुकत्याच रिलिज झालेल्या ‘अकिरा’ या सोनाक्षीच्या चित्रपटाला ‘थंडगार’, तर अ‍ॅक्ंिटगमध्ये सोनाक्षी ‘कमजोर’ असल्याची टीका केआरकेने ट्विटवरून केली होती. यानंतर भडकलेल्या सोनाक्षीने केआरकेला उलटं टांगूण फटके मारायला हवेत, अशी तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली होती. यापूर्वीदेखील सोनाक्षी, कॅटरिना कैफ अन् दीपिका पादुकोण यांच्यावरून सोनाक्षीला डिवचण्याचा प्रयत्न केला होता.

किंग खानवरही टीकास्त्रबॉलिवूडचा किंग शाहरूख खानवरही केआरकेने टीकास्त्र सोडले होते. त्याच्या ‘रा-वन’ या चित्रपटातील ‘छम्मक छल्लो’ या गाण्यावरून शाहरूखवर त्याने टीका केली होती. तो म्हणाला होता की, ‘आपणा सगळ्यांना माहीत आहे की, शाहरूख अतिशय खराब डान्सर आहे. त्यात ‘छम्मक छल्लो’ या गाण्यावर डान्स करून त्याने जणू काही पोचपावतीच दिली. एवढ्या वयात काय गरज होती डान्स करण्याची!’ केआरकेच्या या वक्तव्यामुळे बॉलिवूडमध्ये शाहरूखविरुद्ध केआरके असा सामना रंगला होता.

परफेक्टनिस्टला केले टार्गेटप्रत्येक कामात परफेक्टपणा असल्याकारणाने मिस्टर पेरफेक्टनिस्ट अशी ओळख निर्माण करणाऱ्या आमिर खानलाही केआरकेने टार्गेट केले होते. दुसऱ्या पत्नीवरून टीका करताना केआरके म्हणाला होता की, आमिरने पहिल्या पत्नीला त्याच्या शोमध्ये बोलवायला हवे होते, ज्यांना किरण रावमुळे आमिरने सोडचिठ्ठी दिली. केआरकेच्या या वक्तव्यावर मात्र आमिरने कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणे टाळले होते.

डिंपल गर्ल...माय चॉइसडिंपल गर्ल दीपिका पादुकोण हिच्या ‘माय चॉइस’ व्हिडीओवर केआरकेने कडाडून टीका केली होती. मुळात त्याने हा व्हिडीओच वादग्रस्त असल्याचे म्हटले होते. यासाठी त्याने अनेक उदाहरणदेखील दिले होते. जसे की, जर एखाद्या ६० वर्षांच्या म्हाताऱ्याला एका १६ वर्षांच्या मुलीने पळवून नेले, तर तिच्यावर आपण गुन्हा दाखल करू शकत नाही. कारण ती तिची ‘चॉइस’ असू शकते. केआरकेच्या या वादग्रस्त विधानानंतर दीपिका चांगलीच भडकली होती, परंतु तिने वादात भर न घालता आचरट व्यक्तीवर भाष्य न करण्याचे म्हटले होते.

लीजा हेडेनची उडवली खिल्लीअभिनेत्री लीजा हेडेन हिने ‘बास्केटबॉल’ला लटकलेला एक व्हिडीओ पोस्ट केला होता. हा व्हिडीओ बघून केआरकेने ट्विट केले होते. त्यामध्ये म्हटले होते की, ‘लीजा मी तुला अशा स्थितीत खाली बसून बघू शकतो का?’ यानंतर लीजानेदेखील केआरकेच्या स्टाइलमध्येच उत्तर देत म्हटले होते की, मला माहीत आहे की, तू अगोदरच निर्लज्जपणामुळे खाली पडलेला आहेस आणखी किती खाली पडणार? लीजा आणि केआरकेमधील ही जुगलबंदी त्यावेळेस चर्चेचा विषय ठरली होती.

मास्टर-ब्लास्टरवरही निशानाकेआरके केवळ बॉलिवूड कलाकारांवरच निशाणा साधतो असे नाही तर त्याला राजकारण तसेच क्रीडाक्षेत्रही वर्ज्य नाही. त्याने राजकारणातील अनेक बड्या व्यक्तींवर अतिशय अभद्र भाषेत टीका करून वाद निर्माण केला होता. अशीच टीका त्याने मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरवरही केली होती. तो म्हटला होता की, जर बीसीसीआय सरकारच्या आधीन असते तर त्याचा सर्वाधिक आनंद सचिनला झाला असता. कारण त्याला ६५व्या वर्षी रिटार्यमेंट घोषित करणे शक्य झाले असते. केआरकेच्या या वक्तव्यानंतर वाद चिघळण्याची शक्यता होती. मात्र मास्टर-ब्लास्टर याने स्वत:च या विषयावर प्रतिक्रिया देणे टाळत वादावर पडदा टाकला होता.

कपिलचीही उडवली टर्रर्र...कॉमेडियन कपिल शर्मा नेहमीच इतरांची चेष्टा-मस्करी करीत असतो. मात्र त्याची टर्रर्र केआरके याने ट्विटवर उडवली होती. त्यात त्याने लिहिले होते की, ‘नर्गिस फाखरी हिचा एसएमएस : यशराज फिल्म्सची आॅफर ऐकून धक्काच बसला, कारण त्यांची इच्छा होती की मी कॉमेडियन कपिल शर्मा याच्यासोबत काम करावं. कदाचित ते विसरले असतील की मी पहिला चित्रपट रणबीर कपूर याच्यासोबत केला होता’ या ट्विटला कपिलने उत्तर देताना म्हटले होते की, काही लोक दारू पिल्यानंतर सिंहासारखे वागतात. उतरल्यानंतर पुन्हा उंदिराच्या अवतारात येतात.