Join us  

राहुल रॉयला रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज, पण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2021 1:04 PM

राहुलची तब्येत सुधारत असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देराहुलला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असले तरी त्याची तब्येत पूर्णपणे बरी व्हायला सहा ते सात महिन्यांचा वेळ लागेल.

काही दिवसांपूर्वी अभिनेता राहुल रॉयला ब्रेन स्ट्रोक आला होता त्यानंतर तातडीने त्याला मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली. राहुलला ब्रेन स्ट्रोक आल्यामुळे तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कारगिलमध्ये राहुल 'एल ए सी- लाइव्ह द बॅटल' चित्रपटाचे शूट करत होते. ब्रेन स्ट्रोकनंतर राहुलला तातडीने श्रीनगर, त्यानंतर मुंबईला आणण्यात आले. शस्त्रक्रिया झाल्यानंतर राहुलला नानावटी हॉस्पिटलमधून वॉकहार्ट हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले होते. पण आता त्याची तब्येत सुधारत असून त्याला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. 

टाईम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृ्त्तानुसार, राहुलला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले असले तरी त्याची तब्येत पूर्णपणे बरी व्हायला सहा ते सात महिन्यांचा वेळ लागेल. घरी आल्यामुळे राहुल प्रचंड खूश झाला आहे. त्याची फिजिओ थेरपी आणि स्पीच थेरपी सुरू आहे. गेले ४५ दिवस आमच्या कुटुंबासाठी खूपच कठीण होते. राहुलने आजारावर मात केली असून तो बरा होत आहे याचा आम्हाला आनंद होत आहे असे त्याच्या बहिणीच्या पतीने मीडियाशी बोलताना सांगितले.

'एल ए सी- लाइव्ह द बॅटल' या चित्रपटाची निर्माती निवेदिता बासूने मुंबई मिररशी बोलताना सांगितले की, कारगिलमध्ये उणे १२ ते १३ सेल्सियस तापमानात आम्ही काम करत होतो. प्रचंड थंडीमुळेच राहुलची तब्येत बिघडली. 

राहुल गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयातून त्याचे फोटो सोशल मीडीयावर शेअर करत आहे. या फोटोंमध्ये राहुल खूप बारीक झालेला दिसतायोत. वयाच्या ५२ व्या वर्षीही स्मार्ट आणि तंदुरुस्त दिसणारा राहुल या फोटोंमध्ये खूप थकलेला दिसतायेत.तसेच राहलने एक व्हिडिओ शेअर केला होता. यात राहुल बोलताना अडखळताना दिसतोय. जर तुम्ही काळजीपूर्वक ऐकले तर राहुल काय बोलतोय हे स्पष्टपणे समजेल. ब्रेन स्ट्रोकनंतर राहुलच्या बोलण्यावर परिणाम झाला आहे. राहुलच्या या स्थितीला एफेसिया असे म्हणतात. ज्यामध्ये व्यक्तीच्या बोलण्यावर, लिहिण्यावर आणि समजण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो.

राहुल रॉयने १९९० मध्ये 'आशिकी' सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं होतं. त्यावेळी तो लोकप्रियतेच्या शिखरावर होता.

टॅग्स :राहुल रॉय