- Suvarna Jain
विशाल भारद्वाजच्या २०१४मध्ये आलेल्या ‘हैदर’ सिनेमातील डॉ. मीर हिलाल असो किंवा ‘घायल रिटर्न्स’ सिनेमातील राज बन्सल ही भूमिका साकारणारा अभिनेता म्हणजे नरेंद्र झा. पुन्हा एकदा रईस सिनेमातून रसिकांच्या भेटीला येत आहे. याच निमित्ताने सीएनएक्स लोकमतने नरेंद्र झाशी साधलेला हा खास संवाद.सिनेमा स्वीकारताना कोणत्या गोष्टींचा विचार करतोस ?- सिनेमा साईन करण्यापूर्वी सिनेमा कोण बनवत आहे, सिनेमातील भूमिका आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सिनेमाची कथा कशी असणार या सगळ्या गोष्टींचा विचार करतो. या सगळ्या गोष्टींचे समाधान झाले, की सिनेमा स्वीकारतो. सिनेमात कलाकार जीव ओतून काम करीत असेल आणि ती भूमिका लोकांपर्यंत पोहोचलीच नाही, असे होण्यापेक्षा आपले काम रसिकांना कितपत आवडेल, याचा नेहमी विचार करतो.
आजवर साकारलेल्या कोणत्या भूमिका संस्मरणीय ठरल्या आहेत ?आतापर्यंत विविध प्रकारचे सिनेमा आणि विविध शेड असलेल्या भूमिका साकारल्या. 'हैदर' सिनेमातील डॉ. मीर हिलाल ही भूमिका मला चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देते. त्यामुळे माझ्यासाठी ही भूमिका सगळ्यात आवडती आहे. याव्यतिरिक्त काबील, श्याम बेनेगल यांच्या सिनेमात नेताजी सुभाषचंद्र बोस आणि संविधानमध्ये साकारलेली मोहंमद जीना ही भूमिका माझ्या कायम लक्षात राहील.
तू आजवर विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेत. काही निगेटिव्ह, तर काही पॉझिटिव्ह. वैयक्तिक कोणत्या प्रकारच्या भूमिका साकारायला आवडतात ?कोणतीही भूमिका साकारण्यासाठी कलाकाराची एक आवड असतेच. कुणाला निगेटिव्ह शेड असलेल्या भूमिका आवडतात, तर कुणाला पॉझिटिव्ह. मलाही पॉझिटिव्ह भूमिका करायला आवडतात. निगेटिव्ह भूमिकासुद्धा साकारल्या आहेत. ‘रईस’ सिनेमातील भूमिकेलाही निगेटिव्ह शेड आहे. आजपर्यंत कामात कोणताही चॉईस ठेवला नाही. कारण, कामे आपल्या चॉईसनुसार मिळत नाहीत. सिनेमामध्ये कामं मिळतायेत, तर मालिकांमध्ये काम करण्याच्या काही आॅफर आल्या आहेत का ?- सध्या देवाच्या कृपेने चांगल्या भूमिका मिळत आहेत. मालिकांसाठी बऱ्याचदा विचारणा झाली आहे. मात्र, सिनेमाच्या शूटिंगच्या बिझी शेड्युलमुळे मालिकांसाठी वेळ देणे खूप कठीण जाते. दुसरी गोष्ट, मालिकांमध्ये कथानकानुसारही कलाकारांचे शेड्युल ठरते. कलाकार शूट करण्यासाठी २० दिवस देतो. काही कारणास्तव ते शूट लांबणीवर पडते. या सगळ्यांना तांत्रिक गोष्टीसुद्धा कारणीभूत असतात. त्यामुळे सध्या जेवढे दिवस शक्य, तेवढे सिनेमातच बिझी राहायचे ठरवले आहे. भविष्यात चांगली संधी आल्यास नक्की विचार करीन.
पाकिस्तानी कलाकारांचा मुद्दा दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. याविषयी तुझे काय मत आहे?- आपल्या देशाप्रति प्रत्येकाची एक नैतिक जबाबदारी असते. भारतीयांच्या भावनांचा आदर करणे हेसुद्धा तितकेच गरजेचे आहे. मात्र, सध्या जे सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहेत, त्यांना मंजुरी देण्यात यावी. कारण, या सगळ्या गोष्टी पुन्हा रि-शूट करणे म्हणजे प्रचंड मेहनत आणि खर्चिक बाब असते. सिनेमा बनवताना लागणारे बजेट मोठे असते; त्यामुळे बनलेल्या सिनेमांचा विचार करून त्यांना हिरवा कंदील देण्यास हरकत नाही. मात्र, आगामी सिनेमात पाकिस्तानी कलाकार नसतील याची काळजी घेतली जाईल, असे वाटते. कारण अॅक्शन झाली, की रिएक्शन होतेच.