Join us  

Birthday Special: वयाच्या ४९ व्या वर्षी गोविंदाने केले होते दुसरे लग्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2020 6:49 PM

गोविंदाने धुमधडाक्यात दुसरे लग्न केले होते. त्याच्या लग्नाला बॉलिवूडमधील अनेकजण उपस्थित होते.

ठळक मुद्देगोविंदाचे लग्न सुनीतासोबत ११ मार्च १९८७ ला झाले होते. सुनीता आणि गोविंदा यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. गोविंदा आणि सुनीता यांना आजही अनेकवेळा एकत्र पाहायला मिळते.

बॉलीवुडचा हिरो नंबर वन म्हणजे गोविंदा. आपला डान्स, कॉमेडी टायमिंग आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे अभिनय याने गोविंदाने रसिकांवर जादू केली आहे. गोविंदाचा आज म्हणजेच २१ डिसेंबरला वाढदिवस आहे. विरारचा छोरा अशी ओळख असणाऱ्या गोविंदाचे आयुष्य मुंबापुरीतच गेलंय. इतक्या वर्षांनंतरही गोविंदाचे रसिकांच्या मनातील अढळ स्थान कायम आहे. विविध सिनेमात नंबर वन बनत त्याने रसिकांना खळखळून हसवलं, कधी संवेदनशील भूमिका साकारत रसिकांना रडवलंही तर कधी कधी रोमँटिक अंदाजात त्याने साऱ्यांची मनं जिंकली. त्यामुळे गोविंदा रसिकांचा लाडका चिची बनला. 

तुम्हाला माहीत आहे का, गोविंदाने वयाच्या ४९ व्या वर्षी दुसरे लग्न केले होते... हे वाचून तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसला असेल ना... पण गोविंदाने दुसरे लग्न दुसरे कोणासोबत नव्हे तर त्याच्या पत्नीसोबतच केले होते. या वयात पुन्हा एकदा पत्नीसोबत गोविंदाने लग्न करण्यामागे एक खास कारण होते.

गोविंदाचे लग्न सुनीतासोबत ११ मार्च १९८७ ला झाले होते. सुनीता आणि गोविंदा यांनी अनेक वर्षांच्या अफेअरनंतर लग्न केले होते. गोविंदा आणि सुनीता यांना आजही अनेकवेळा एकत्र पाहायला मिळते. गोविंदाच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर आपल्याला सुनीताचे अनेक फोटो पाहायला मिळतात. सुनीता आणि गोविंदा यांनी पुन्हा लग्न का करण्याचा विचार केला हे खूपच इंटरेस्टिंग आहे.

सुनीता आणि गोविंदा यांनी १९८७ मध्ये घरातील अगदी जवळच्या लोकांच्या उपस्थितीत मंदिरात लग्न केले होते. हे लग्न त्यांनी सगळ्यांपासून वर्षभर लपवले होते. गोविंदा त्याकाळात अभिनेता म्हणून नुकतेच आपले स्थान निर्माण करत होता. त्यामुळे त्याच्या लग्नाबद्दल त्याच्या फॅन्सला कळले तर त्याच्या महिला चाहत्यांचे प्रमाण कमी होईल असे त्याला वाटत होते. त्यामुळेच त्यांची मोठी मुलगी नम्रताच्या जन्मापर्यंत त्यांनी ही गोष्ट कोणालाच सांगितली नव्हती. गोविंदा आणि सुनीता यांनी लपूनछपून लग्न केले ही गोष्ट गोविंदाला पटली नव्हती. त्यामुळेच लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाला त्यांनी धुमधडाक्यात सगळ्यांच्या उपस्थितीत पुन्हा लग्न केले होते.

टॅग्स :गोविंदा