Join us  

कलाकाराला भाषेचं बंधन नसतं - अभिनेत्री मंजिरी फडणीस

By अबोली कुलकर्णी | Published: November 04, 2018 6:23 PM

चंद्रमुखी हे पात्र मी अत्यंत उत्साहाने आणि संपूर्ण माहिती घेऊनच करणार आहे. देवदासच्या मृत्यूनंतरही  तिने स्वत:चे आयुष्य त्याच्यासाठी समर्पित केले. या नाटकाचा प्रयोग १६ ते २५ नोव्हेंबरदरम्यान जमशेद भाभा थिएटर,एनसीपीए येथे होणार आहे.

अबोली कुलकर्णी

 ‘जाने तू या जाने ना’ या हिंदी चित्रपटातून अभिनेत्री मंजिरी फडणीसला ओळख मिळाली. जवळपास सर्व भाषांमध्ये तिने अभिनय साकारला आहे. आता ती ‘देवदास’ या नाटकात चंद्रमुखीच्या भूमिकेत दिसणार आहे. यानिमित्ताने तिच्यासोबत केलेली ही हितगुज...    

* ‘देवदास’ या नाटकांतील तुझ्या भूमिकेविषयी काय सांगशील?  - मी चंद्रमुखीची भूमिका साकारत आहे. मला जेव्हा स्क्रिप्ट मिळाली तेव्हा मी या स्क्रिप्टच्या प्रेमातच पडले. देवदासच्या मृत्यूनंतर पारो आणि चंद्रमुखीचे काय झाले? हे अतिशय उत्कृष्टरित्या यात दाखवण्यात येणार आहे. चंद्रमुखी हे पात्र मी अत्यंत उत्साहाने आणि संपूर्ण माहिती घेऊनच करणार आहे. देवदासच्या मृत्यूनंतरही  तिने स्वत:चे आयुष्य त्याच्यासाठी समर्पित केले. या नाटकाचा प्रयोग १६ ते २५ नोव्हेंबरदरम्यान जमशेद भाभा थिएटर,एनसीपीए येथे होणार आहे.

* तुला या नाटकाची आॅफर आली तेव्हा तुझी रिअ‍ॅक्शन काय होती? - मी प्रचंड खूश आहे की, मला हे नाटक करायला मिळणार आहे. हे नाटक क्लासिक असून यात काम करणं कुणाचंही स्वप्न असेल असं हे नाटक आहे. या नाटकाची स्क्रिप्ट खूपच चांगल्या पद्धतीने लिहिलेली आहे. नाटकाचे दिग्दर्शन अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केले आहे. संपूर्ण टीमचेच यात मोठे श्रेय आहे.

* रंगमंचावर प्रथमच ‘देवदास’ नाटक येत आहे. संपूर्ण टीम किती उत्सुक आहे?  - आमची संपूर्ण टीम प्रचंड उत्सुक आहे. जवळपास १३ घंटे आम्ही रिहर्सल करत आहोत. आम्हाला देवदास हे नाटक रंगमंचावर पाहताना खरंच खूप आनंद होणार आहे.  यामागे संपूर्ण टीमचीच मेहनत आहे.

* २००८ च्या ‘जाने तू या जाने ना’ या हिंदी चित्रपटातून तुला ब्रेक मिळाला. त्यानंतर तुझ्या प्रवासाला सुरूवात झाली. कसा होता आत्तापर्यंतचा प्रवास?  - आत्तापर्यंतचा प्रवास खूपच चांगला होता. अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. अनुभवी लोकांसोबत काम करायला मिळाले. सर्वांना आवडणाऱ्या  क्षेत्रात मी काम करते आहे, याचा मला आनंद आहे. यापुढेही मला याच क्षेत्रात अनेक वेगवेगळया गोष्टी करायला आवडतील.

 * चित्रपट, शॉर्टफिल्म्स या प्रकारात तू काम केलं आहेस. कोणत्या प्रकारात तू स्वत:ला कम्फर्टेबल मानतेस? - तसं अगदीच काही नाही. मी आत्तापर्यंत विविध भाषा, प्रकारांत काम केलं आहे. पण, मी स्वत:ला चित्रपटांमध्ये कम्फर्टेबल मानते. मला फक्त काम चांगले करायचे आहे. मग प्रकार कुठलाही असो.

* आगामी ५ वर्षांत तू स्वत:ला कुठे बघतेस?- तसा कुठलाही विचार मी अद्याप केलेला नाही. मात्र, मी ५ वर्षांनंतर स्वत:ला अजून जास्त समृद्ध झालेली पाहिन. मला जास्तीत जास्त अनुभवी कलाकार झालेलं स्वत:ला पाहायचं आहे.

टॅग्स :देवदास नाटक