Join us  

#MeToo : हम साथ साथ है चित्रपटातील महिला सदस्यासमोरच आलोक नाथ यांनी काढले होते कपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2018 12:52 PM

हम साथ साथ है या चित्रपटाच्या टीममधील एका महिला क्रू सदस्याने आलोक नाथ यांच्या वागणुकीमुळे तिला आलेल्या वाईट अनुभवाविषयी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

टीव्ही आणि बॉलिवूडच्या जगात ‘संस्कारी बाबू’ अशी प्रतिमा असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर ‘तारा’ या गाजलेल्या मालिकेच्या निर्मात्या आणि लेखिका विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. मद्यात काहीतरी मिसळून आलोक नाथ यांनी आपल्यावर बलात्कार केला होता, असा विनता नंदा यांचा आरोप आहे. या वादानंतर याच मालिकेत काम करणाऱ्या नवनीत निशानने देखील आलोक नाथ यांच्या वागण्याला कंटाळून मी त्यांच्या कानफटात लगावली होती असे नुकत्याच एका मुलाखतीत सांगितले आहे. आता या दोघींनंतर हम साथ साथ है या चित्रपटाच्या टीममधील एका महिला क्रू सदस्याने आलोक नाथ यांच्या वागणुकीमुळे तिला आलेल्या वाईट अनुभवाविषयी एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

हम साथ साथ है या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या अनुभवाविषयी या महिलेने एका मुलाखतीत सांगितले आहे की, आम्ही रात्रीच्या वेळात चित्रीकरण करत होतो आणि कलाकारांच्या कॉश्च्युमची जबाबदारी माझ्यावर होती. मी त्यांच्या हातात कपडे दिल्यानंतर ते माझ्या समोरच कपडे बदलायला लागले. मला काय करू हे कळतच नव्हते. त्यामुळे मी लगेचच त्या खोलीतून निघाले. मी अक्षरशः धावतच खोलीच्या बाहेर जात होते. पण त्यांनी माझा हात पकडला. मी अक्षरशः त्यांचा हात झटकून रूमच्या बाहेर पळ काढला. या गोष्टीमुळे मला चांगलाच धक्का बसला होता. पण आलोक नाथ यांच्या या वागणुकीबद्दल कोणाला सांगायची माझ्यात हिंमत नव्हती. ते सुरज बडजात्या यांच्या खूपच जवळचे असल्याने मी गप्पच बसले. मी कसेबसे चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. मी त्या घटनेमुळे चित्रपटसृष्टीपासून दूरच राहिले. त्या गोष्टीमुळे माझे करियरच या क्षेत्रात न करण्याचे मी ठरवले. पण विनता यांच्यामुळे मला हे सगळे सांगायची आज हिंमत झाली.  

विनता नंदा यांनी आलोक नाथ यांच्यावर केलेल्या आरोपांनंतर सिने अ‍ॅण्ड आर्टिस्ट असोसिएशन अर्थात सीआयएनटीएएने (सिंटा) या प्रकरणाची स्वत:हून दखल घेत, आलोक नाथ यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. 

टॅग्स :आलोकनाथ