Join us  

संस्कारी बाबुजीने दिले आहेत बोल्ड सीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2018 2:14 PM

संस्कारी बाबूजी अशी त्यांची छबी असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नायक अथवा नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आलोक नाथ यांनी एका चित्रपटात बोल्ड सीन देखील दिला होता.

आलोक नाथ गेल्या अनेक वर्षांपासून हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करत आहेत. संस्कारी बाबूजी अशी त्यांची छबी असून त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये नायक अथवा नायिकेच्या वडिलांची भूमिका साकारली आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, आलोक नाथ यांनी एका चित्रपटात बोल्ड सीन देखील दिला होता. 1987 साली प्रदर्शित झालेल्या कामाग्नि या चित्रपटात आलोक नाथ आणि टीना मुनीम यांच्यावर काही बोल्ड दृश्य चित्रीत करण्यात आले होते. या चित्रपटाची चांगलीच चर्चा त्या काळात झाली होती.आलोक नाथ यांचा 10 जुलैला म्हणजेच आज वाढदिवस असून त्यांनी 62 वर्षांत पदार्पण केले. बिहारमधील खागरिया जिल्ह्यात त्यांचे बालपण गेले. गांधी या चित्रपटापासून 1982 साली त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांना पहिल्याच चित्रपटासाठी अनेक पुरस्कार मिळाले. त्यांच्या या भूमिकेचे कौतुक झाले असले तरी त्यांना त्यानंतर पाच वर्षं एकही चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली नाही. त्यांनी त्या दरम्यान नादिरा बब्बर यांच्या काही लघुपटात काम केले. त्यांना जवळजवळ पाच वर्षांनंतर मशाल या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटानंतर देखील त्यांना तितकीशी लोकप्रियता मिळाली नाही. पण कयामत से कयामत तक या चित्रपटानंतर त्यांचे करियरच बदलले. या चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच आवडली. या चित्रपटाचे वैशिष्ट्य म्हणजे वयाच्या केवळ 32 व्या वर्षी त्यांनी आमिर खानच्या काकाची भूमिका या चित्रपटात साकारली होती. आलोक नाथ यांनी त्यांच्या करियरमध्ये हम आपके है कौन, हम साथ साथ है, मैंने प्यार किया, जमाई राजा, शोला और शबनम यांसारख्या चित्रपटांमध्ये तर बिदाई, बुनियाद, इम्तिहान, अस्तित्व यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांनी संस्कारी बाबू या त्यांच्या इमेजला छेद देत बोल राधा बोल, षड्यंत्र, विनाशक या चित्रपटांमध्ये नकारात्मक भूमिका देखील साकारल्या आहेत. 2013 साली एका वेगळ्याच कारणामुळे आलोक नाथ चर्चेत आले होते. त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांवर अनेक जोक्स सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. यामुळे आलोक नाथ जगभरात प्रसिद्ध झाले होते. माझ्या चित्रपटांपेक्षा जास्त लोकप्रियता मला सोशल मीडियाने मिळवून दिली असे त्यांनी त्यांच्या मुलाखतींमध्ये सांगितले होते. 

टॅग्स :आलोकनाथ