Join us  

बादशहा सांगतोय, सेक्समुळेच तर वंश वाढतो... तरीही त्याबद्दल का बोलायचे नाही?

By प्राजक्ता चिटणीस | Published: August 01, 2019 6:30 AM

बादशहाच्या खानदानी शफाखाना या चित्रपटात समाजात टॅबू मानल्या जाणाऱ्या सेक्स या विषयावर भाष्य करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसेक्स या विषयावर आपल्याकडे बोललेच जात नाही. पण यावर आता खुलेपणाने बोलण्याची गरज आहे.

प्रसिद्ध गायक बादशहाखानदानी शफाखाना या चित्रपटाद्वारे अभिनयक्षेत्रात पदार्पण करत आहे. त्याच्या या नव्या इनिंगबाबत त्याच्याशी मारलेल्या गप्पा...

गायनक्षेत्रात यश मिळत असतानाच अभिनयक्षेत्राकडे वळण्याचा कसा विचार केलास?खरं सांगू तर अभिनयक्षेत्रात करियर करायचे असे मी काहीच ठरवले नव्हते. मला या चित्रपटाची कथा आणि मला ऑफर करण्यात आलेली भूमिका प्रचंड आवडली आणि महत्त्वाचे म्हणजे सोनाक्षी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. ती माझी खूप चांगली मैत्रीण असून तिने मला फोन करून या चित्रपटात काम करण्याविषयी सुचवले होते. या सगळ्यामुळेच मी चित्रपटात काम करण्याचे ठरवले. मला याआधी देखील काही चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण त्यावेळी मी या क्षेत्रात येण्याचा विचार केला नव्हता. 

आपल्या समाजात टॅबू मानल्या जाणाऱ्या सेक्स या विषयावर या चित्रपटात भाष्य करण्यात आले आहे. त्याविषयी काय सांगशील?आपल्याकडे या विषयावर बोललेच जात नाही. पण यावर आता खुलेपणाने बोलण्याची गरज आहे. अनेकवेळा लैंगिक आजारांमुळे त्रस्त असणारे लोक या विषयाबाबत कसं बोलायचं असा विचार करून डॉक्टरकडे देखील जात नाहीत. इतर आजारांप्रमाणे या आजारांवर देखील लोकांनी उपचार घेण्याची गरज आहे. या चित्रपटाचा विषय ऐकल्यानंतर माझ्या आईची प्रतिक्रिया काय असेल असा मला प्रश्न पडला होता. पण या चित्रपटाची कथा ऐकल्यावर माझ्या आईने मला या चित्रपटात नक्कीच काम कर... असे सांगितले.

सेक्स एज्युकेशन हा विषय शाळांमध्ये सुरू करणे गरजेचे आहे असे तुला वाटते का?योग्य वयात मुलांना सेक्स एज्युकेशन दिलेच पाहिजे असे मला वाटते. कारण कोणत्या गोष्टी योग्य आहेत आणि कोणत्या चुकीच्या हे त्यांना कळलेच पाहिजे आणि याविषयी शिक्षण देण्यात आले नाही तर चुकीच्या पद्धतीने मुले याविषयी विविध वेबसाईटवर शोधतात आणि त्यांची दिशाभूल होते. तसेच आज तंत्रज्ञानामुळे मुलांच्या हातात मोबाईल आला आहे. मोबाईलमध्ये लहान मुले काय पाहात आहेत याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

अभिनय आणि गायन यामध्ये कोणती गोष्ट जास्त सोपी आहे असे तुला वाटते?गायन हे कधीही सोपे आहे असे मी सांगेन. अभिनय करणे खूपच कठीण आहे. चित्रीकरणाच्या पहिल्या दिवशी तर मी खूप नव्हर्स होतो. माझा शॉट ओके झाल्यानंतरही मला त्यावर विश्वास बसत नव्हता. मला या चित्रपटानंतरही अनेक अभिनयाच्या ऑफर येत आहेत. पण मी अद्याप त्याबाबत विचार केला नाही. माझ्या फॅन्सना माझा अभिनय आवडला तरच मी यापुढे चित्रपटात काम करेन.

टॅग्स :बादशहाखानदानी शफाखानासोनाक्षी सिन्हा