ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - प्रख्यात चित्रपट दिग्दर्शक राजकुमार हिरानी सध्या अभिनेता संजय दत्तच्या आयुष्यावर आधारित चित्रपट बनवण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. अभिनेता रणबीर कपूर संजय दत्तची भूमिका करणार आहे, हे तर सर्वांनाच माहित आहे, मात्र संजयचे वडील, ज्येष्ठ अभिनेते सुनिल दत्त यांची भूमिका कोण करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. मात्र नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार, बॉलिवूडमध्ये मि. पर्फेक्शनिस्ट नावाने ओळखला जाणारा अभिनेता आमिऱ खानची या भूमिकेसाठी निवड झाल्याचे समजते.
संजय दत्त आणि आमिर हे एकमेकांचे खूप जवळचे मित्र असून घरच्यासारखेच आहेत, हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र आमिरची पर्सनॅलिटी आणि चेहरामोहरा सुनील दत्त यांच्याशी मेळ खात नाही, याकडेही दुर्लक्ष करता येणार नाही. असे असतानाही जर आमिरची सुनील दत्त याच्या भूमिकेसाठी निवड झाली असेल तर मात्र त्या भूमिकेसाठी आमिर सर्वस्व ओतून काम करेल यात काही शंकाच नाही. पण असे असले तरी प्रेक्षक आमिरला सुनील दत्त म्हणून स्वीकारतील का आणि आमिरसारखा अभिनेता मोठ्या पडद्यावर रणबीर कपूरच्या वडिलांची भूमिका करण्यास तयार होईल का? हे मुख्य प्रश्न आहेत... मात्र या सर्वांची उत्तरं आपल्याला लवकरच मिळतील.