Join us

अभिनेत्री साधना काळाच्या पडद्याआड

By admin | Updated: December 26, 2015 03:31 IST

मेरा साया, वह कौन थी यांसारख्या अजरामर चित्रपटांतून अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ गुणी अभिनेत्री साधना शिवदासानी (७४) यांचे दीर्घ आजाराने मुंबईत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये

मुंबई : मेरा साया, वह कौन थी यांसारख्या अजरामर चित्रपटांतून अभिनयाचा वेगळा ठसा उमटविणाऱ्या ज्येष्ठ गुणी अभिनेत्री साधना शिवदासानी (७४) यांचे दीर्घ आजाराने मुंबईत हिंदुजा हॉस्पिटलमध्ये शुक्रवारी सकाळी निधन झाले. शनिवारी सकाळी सांताक्रुझ येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. आपल्या हेअर कटने तरुणाईत विशेष लोकप्रिय झालेल्या साधना या १९६० ते ७०च्या दशकातील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक होत्या. कारकिर्दीत १५ वर्षांत ३४ चित्रपटांतून त्यांनी विविध भूमिका केल्या. गत काही वर्षांपासून त्या आजारी होत्या. मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. सकाळी ११च्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. साधना यांचा विवाह चित्रपट दिग्दर्शक आर.के. नय्यर यांच्याशी झाला होता. या दाम्पत्याला मूल नाही. १९९५मध्ये आर.के. नय्यर यांचे निधन झाले. साधना यांनी त्या काळात हिंदी चित्रपटात अभिनय केला जेव्हा संगीतमय चित्रपटांना मोठे यश मिळत होते. १९६०मध्ये लव्ह इन सिमला या चित्रपटातून सुरू झालेला त्यांचा अभिनय प्रवास यशस्वीच राहिला. एक हसिना, राजकुमार, आरजू, वो कौन थी, मेरा साया, एक फूल दो माली, मेरे मेहबूब, असली-नकली, वक्त, इंतकाम यांसारख्या संगीतमय हिट चित्रपटांतून त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या यशस्वी कारकिर्दीत राज खोसला यांच्या चित्रपटांचे मोठे योगदान राहिले. हेअर स्टाईलशिवाय त्यांचा चुडीदार पैजामाचा ड्रेसही विशेष लोकप्रिय झाला. १९७५नंतर साधनायांनी चित्रपटात काम केले नाही. ९० च्या दशकात एका फ्लॅटच्या वादामुळे त्या पुन्हा चर्चेत आल्या होत्या. आपल्या सहजसुंदर अभिनयाने प्रेक्षकांवर अधिराज्य करणाऱ्या साधना यांच्या निधनाने दु:ख व्यक्त होत आहे. त्यांच्या आरजू या चित्रपटातील हे गीत म्हणूनच आज ओठांवर येत आहे... अजी रूठकर अब कहा जाईएगाजहा जाईएगा, हमें पाईएगानिगाहों से छूपकर दिखाओ तो जानेखÞयालों में भी तुम ना आओ तो जानेअजी लाख परदों में छूप जाईयेगानज़र आईएगा, नज़र आईएगा ....